जिवाशी खेळ!

जिवाशी खेळ!
Amorn Suriyan

सूर्यकांत पाठक कार्याध्यक्ष, अ.भा.ग्राहक पंचायत

आजारांपासून सुटका करून देणारी औषधे (Medications) रुग्णासाठी अमृतासमान असतात. परंतु ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असे आरोग्यशास्र सांगते. असे असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वमर्जीने औषधे (Medications) घेणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. अलीकडील काळात ऑनलाईन औषधे (Medications) मिळू लागल्यामुळे त्यांचे फावले आहे. कारण या ऑनलाईन (Online) व्यासपीठावरून प्रिस्क्रिप्शनशिवाय अगदी गर्भपातासाठीची औषधेही सर्रास विकली जात आहेत. केवळ प्रिस्क्रिप्शन (Prescription) हाच मुद्दा नसून ऑनलाईन माध्यमातून बनावट औषधांचाही सुळसुळाट झाला आहे.

आपले बुद्धिचातुर्य वापरून नवीन काही घडवू पाहणारे जसे असतात तसेच मागणी असलेल्या वस्तूंची नक्कल करून कमाई करण्यासाठी बुद्धी वापरणारेही असतात. त्यामुळे प्रत्येक वस्तूची बेमालूम नक्कल करून बाजारात आल्याचे पाहायला मिळते. बनावट वस्तूंमुळे ग्राहकाची हातोहात फसवणूक तर होतेच; परंतु हेच ‘कौशल्य’ जेव्हा औषधनिर्मितीच्या क्षेत्रात वापरले जाते तेव्हा रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू होतात. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अनेकदा गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

पाच वर्षांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार, जगभरात तब्बल 20 लाख कोटी रुपयांची बनावट औषधे विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. बनावट औषधांचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांतील रुग्णांना बसत असून अशा देशांमध्ये विकल्या जाणार्‍या एकंदर औषधांपैकी 10 ते 20 टक्के औषधे बनावट असतात, असे दिसून आले आहे.

सध्या या विषयाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे ऑनलाईन माध्यमातून होणार्‍या औषध विक्रीमध्ये बनावट औषधांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. दुसरीकडे, ऑनलाईन संकेतस्थळावर डॉक्टरांची चिठ्ठी नसली तरी सर्रास औषधे दिली जात आहेत. गर्भपातासारखी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये, असा अन्न आणि औषध प्रशासनाचा कायदा सांगतो. मात्र ऑनलाईनच्या पळवाटेने ही औषधे सर्रास उपलब्ध होत आहेत. काही ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्या तर डॉक्टरांची चिठ्ठीदेखील तयार करत असल्याचे सांगितले जाते.

इतकेच नव्हे तर ऑनलाईन कंपनीद्वारे मागवण्यात आलेली औषधे मुदतबाह्य असल्याचे प्रकारही घडले आहेत. तसेच औषधासोबत दिलेल्या बिलावरही मुदत संपल्याच्या तारखेचा उल्लेख नसल्याचे आढळून आले आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकल्या जाणार्‍या दहापैकी एक औषध बनावट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. अशा देशांमध्ये बनावट औषधांचा व्यापार तब्बल दोन लाख कोटी रुपयांचा आहे.

वस्तूतः आजार झाल्यानंतर रुग्ण बरा व्हावा म्हणून त्याला औषधे दिली जातात. तथापि बनावट औषधांच्या वापरामुळे रुग्ण अधिक आजारी पडत आहेत. आज असंख्य रुग्ण अशा प्रकारची औषधे घेत आहेत जी खाल्ल्याने आजारापासून बचाव किंवा उपचार होत नाही. अशी औषधे बनवणार्‍या आणि विकणार्‍यांकडून केवळ रुग्णांची आर्थिक लूटच केली जात आहे असे नाही, तर त्यांच्या जिवाशी खेळ केले जात आहेत.

बनावट औषधांचे उत्पादन एखाद्या देशात होते आणि त्याचे पॅकिंग कोणत्या तरी दुसर्‍याच देशात होते. मग त्याचे वितरण तिसर्‍याच देशात करण्यात येते. त्यामुळेच बनावट औषधांच्या विक्रीवर बंदी घालणे अवघड होऊन बसते. या बनावट औषधांच्या व्यापारामुळे रुग्णांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. सर्वाधिक परिणाम अशा रुग्णांवर होतो ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे.

ऑनलाईन औषध विक्रीमध्ये नशेच्या गोळ्या तसेच गर्भपाताच्या किटस्ना अधिक मागणी आहे. हा प्रकार केवळ अनधिकृत नसून असुरक्षितही आहे. अलीकडेच इ-कॉमर्सच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध असणार्‍या एका बहुराष्ट्रीय कंपनीला अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. औषधांच्या ऑनलाईन विक्रीसाठी ठोस नियमावली नसल्यामुळेच ऑनलाईन औषध विक्री वेबसाईयस्वर अनेक कंपन्यांची औषधे सर्रासपणे विकली जातात. साध्या आजारांपासून गंभीर आजरांपर्यंत सगळ्या औषधांची विक्री केली जाते.

यामध्ये अगदी सगळे नियम धाब्यावर बांधून गर्भपात तसेच इतर अनेक औषधांची विक्री होत आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आणणारी जनहित याचिका 2019 मध्ये न्यायालयात सादर करण्यात आली असता ऑनलाईन औषध खरेदी करताना व्हॉटस्अ‍ॅपवरून डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पाठवणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्यांनीही केंद्र सरकारच्या इ-पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने मांडले होते. परंतु याबाबतचा भोंगळ कारभार आजही कायम असल्याचे ताज्या प्रकरणातून स्पष्ट होते.

लोकांच्या जिवाशी निगडीत असणार्‍या या विषयाबाबत शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहेच, पण आपल्याकडे कायदे-नियम कितीही बनवले तरी ते मोडणारे, वाकवणारे, पळवाटा काढणारे महाभाग असतातच. त्यामुळे याबाबत नागरिकांनी-ग्राहकांनी सजग राहण्याची गरज आहे. सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे लोकांचा कल वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे मिळणारी भरभक्कम सवलत आणि घरपोच सेवा. औषधांबाबतही हेच प्रमुख कारण दिसून येते. परंतु अशा सवलतींच्या आड आपली फसवणूक तर होत नाहीयेना याबाबत ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

ऑनलाईन माध्यमातून औषधे मागवल्यास डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार ती आहेत का याची खातरजमा करा. खरेदी केलेली औषधे बनावट आहेत की नाही, याची माहिती मिळू शकत नाही. मात्र विश्वसनीय वेबसाईटवरून औषधे खरेदी केल्यास योग्य औषधे मिळू शकतात. ऑनलाईन असो वा ऑफलाईन; औषधे घेतल्यानंतर आपण आपल्या डॉक्टरांशी बोलणे आवश्यक असते. त्यांना ती औषधे दाखवणे गरजेचे असते; परंतु 90 टक्के लोक याबाबत कंटाळा तरी करतात किंवा संकोच तरी बाळगतात. पण याचाच गैरफायदा घेतला जातो, हे लक्षात ठेवा. विशेषतः औषधांची एक्स्पायरी डेट पाहणे गरजेचे असते. कारण ती मुदत उलटून गेलेली औषधे आपला आजार बरा करण्याऐवजी जिवास हानिकारक ठरतात. ऑनलाईन माध्यमातून अशी ‘एक्स्पायर’ झालेली औषधे मोठ्या प्रमाणावर वितरित होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत सावध राहणे गरजेचे आहे.

वाढते ताणतणाव, बदललेली जीवनशैली, आहारातील पोषकतत्त्वांचा अभाव, वाढते प्रदूषण आदी अनेक कारणांमुळे व्याधी-आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेह, रक्तदाब, निद्रानाश, हृदयविकार यांसारख्या आजाराने ग्रस्त असणार्‍यांना दिलासा देण्यासाठी असंख्य औषधांची सद्दी ऑनलाईन व्यासपीठावर दिसते. व्याधीचा मुकाबला करताना ग्रासलेले रुग्ण त्यांना सहजगत्या बळी पडतात. परंतु अशा औषधांमागे धावताना वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते. सेल्फ मेडिकेशन हा आजच्या काळात एक धोका म्हणून पुढे आला आहे. स्वतःच्या मनाने औषधे घेण्याने आजार बरा होण्याऐवजी नव्या आजारांना जन्म दिला जाऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार सांगत असतात. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

Related Stories

No stories found.