आठवणींचा ‘मे’ ठेवा...

आठवणींचा ‘मे’ ठेवा...

स्वाती पेशवे

काळ पुढे सरकतो, पिढी बदलते, जगण्याच्या आणि आनंद साजरा करण्याच्या संकल्पना बदलतात तसा साजरीकरणातही फरक पडत जातोच. हे तथ्य नाकारण्यात अथवा नवे ते सगळे वाईट, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. पण नव्यात काय नकोसे आहे आणि जुन्यातले अजूनही काय जपून ठेवावे याचा कुठे तरी विचार होणे गरजेचे आहे. मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर हा विचार अवश्य व्हायला हवा.

वाढत्या उन्हाची, कशाबशा आटोपलेल्या शाळा-कॉलेजच्या परीक्षांची, तब्बल दोन वर्षांनंतर मिळालेल्या निवांत सुट्टीची आणि सुट्टीतल्या भटकंतीची चर्चा घरोघर सुरू आहे. बरेच दिवस मागे पडलेले बेत प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आता अनेकांना मिळत आहे. चार पैसे बाळगून असणारे मनाजोग्या ठिकाणी आरामाचे दिवस हौसेमौजेत घालवू शकतील, अशी आजची स्थिती आहे. एकूण काय तर हा काळ मज्जा करण्याचा, एन्जॉय करण्याचा आहे आणि मौका भी है, दस्तुर भी है... या तत्त्वाने अनेकजण याकाळात यथायोग्य उपयोग करून घेत आहेत. पण घरोघरी हे वातावरण असताना, एन्जॉयमेंटच्या नव्या व्याख्या समजून घेत असताना मागचा काळ आठवल्याशिवाय राहत नाही.

नव्या-जुन्याचा संगम साधत असताना संघर्ष अपेक्षित नाही तर सामंजस्य गरजेचे आहे. आज सुखाच्या, ‘मज्जा’ करण्याच्या, एन्जॉयमेंटच्या बहुतांश कल्पना आर्थिक लोलुपता, भरपूर खरेदी, चंगळवाद याच्याशी संबंधित आहेत. खरे पाहता सुट्टी हा कुटुंबाने एकत्र येण्याचा, परस्परांमधले संबंध दृढ करण्याचा, थोरामोठ्यांच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा काळ असतो. विशेषत: एरवीच्या धकाधकीत मागे पडलेल्या या सगळ्यासाठी वापरावा असा हा हक्काचा काळ असतो.

प्रत्येक ऋतूची वेगळी ओळख असते, प्रत्येक ऋतूला वेगळा सुगंध असतो. जसा की पावसाळा कुंद असतो, हिवाळा आल्हाददायी असतो तसा उन्हाळा आणि त्यातही मे महिला स्नेहार्द्र असतो. या महिन्याला प्रेमाची परिभाषा नेमकी समजते, असे नेहमी वाटते. मी अनुभवला तो काळ अगदी मामाने बैलगाडी घेऊन भाचे कंपनीला आजोळी नेण्याचा नव्हता, तरीदेखील तेव्हाचे वातावरण नक्कीच आजच्यासारखे नव्हते.

सुट्टी लागली की उपलब्ध असेल त्या वाहनाने मामा आम्हाला न्यायला यायचा. शहरात वाढलेल्या आम्हा भावंडांना आडगावच्या त्या आजोळच्या घराची ओढ लागायची. मामाचा तो चौसोपी वाडा, भरलेल्या गोकुळासारखे घर, घरी दुधदुभत्याची रेलचेल, मोजकेच पण चविष्ट पदार्थ, हुंदडायला मुबलक जागा, गावाजवळून वाहणारी छोटीशी नदी आणि ऐसपैस पसरलेल्या पारावर मनसोक्त खेळण्याची मुभा हीच आमची सुट्टीतली ‘मज्जा’ होती. आजीने केलेले वाळवण पळवणे, मामीच्या आगेमागे करणे, आजोबांकडून छान छान गोष्टी ऐकत बसणे, शेजारपाजारच्या मैत्रिणींशी खेळणे, कधीमधी मळ्यातल्या झाडाच्या सावलीत अंगतपंगत करणे आणि टिपूर रात्री चांदण्या मोजत निद्रादेवीला शरण जाणे इतकी निखळ आणि सहज होती ती कालची सुट्टी... आम्हाला एन्जॉय करायचे म्हणजे काय करायचे हे माहीत नव्हते, पण झाडावरच्या झोक्यावर झुलताना मन आनंदच्या हिंदोळ्यावर झुलणार हे माहीत होते. आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स माहीत नव्हते पण बांधून ठेवलेल्या चक्क्यामध्ये वेलदोडा आणि जायफळाची पूड घातली की येणारा सुगंध आम्हाला वेडावून टाकत असे. बोटावर घेऊन श्रीखंडाची ती गोडी बराच काळ अनुभवावी, असे वाटायचे.

तेव्हाचा मे महिनाही भरपूर तापायचा. एसी अथवा कूलर नसणार्‍या त्याकाळात उन्हाच्या झळांनी दुपारी काहिली व्हायची. पण एकदा पत्त्याचा डाव रंगला, सागरगोटे हाताच्या पन्हाळीत यायला लागले, नेमक्या हव्या त्या चौकोनात टिपर्‍या पडायला लागल्या आणि दोरीवरच्या उड्यांची लय जमली की उन्हाचा लवलेशही जाणवत नसे. त्यातच कधी भेंड्यांचा खेळ रंगायचा, कधी गाण्यांच्या तर कधी मुला-मुलींच्या नावाच्या. कधी शहरांच्या नावाच्या तर कधी आणखी कशाच्या. या सगळ्यात दुपार अशीच सरून जाई. उन्हं उतरली की आजी अंगणात पाणी शिंपडायची. सकाळचा सडा वेगळा आणि संध्याकाळी तापलेली जमीन थंड होण्यासाठी शिंपडलेले पाणी वेगळे... पाण्याच्या दोन-चार तपेल्या पडताच तापलेल्या मातीचा असा काही सुगंध येई की त्यासमोर कस्तुरी फिकी पडावी!

थंडगार पाणी प्यायल्यावर जमीन थोडी निवली की त्यावरच सतरंजी अंथरून गप्पांचे पुढचे चरण सुरू होत असे. हे चरण गावातल्या लोकांच्या, येणार्‍या-जाणार्‍यांच्या साक्षीने रंगे. जणू ती आमची ओळख परेडच असे. पण त्यानिमित्त गावातल्या सगळ्यांचा परिचय होई. पुढच्या वेळी आल्यानंतर चेहर्‍यानिशी आम्ही त्यांना ओळखत असू, प्रेमाने बिलगत असू. त्यांचे मायेचे हात डोक्यावर फिरले की मणभर आनंद होत असे. ही आमच्या काळातली सुट्टी होती. आजोळचे घर सोडताना कंठ दाटून का येतो हे समजण्याचे वयही नव्हते तेव्हा. हातून काही तरी सुटतेय, काही तरी लांब जातेय, काही तरी हरवतेय एवढेच फक्त जाणवत असे. वाड्याच्या त्या दगडी पायरीत पाय अडखळत असत. आजी, मामी डोळे का पुसतात हे समजत नसे पण आपणही डोळे पुसावे, असे वाटून जात असे.

एसटीने गावाची वेस ओलांडली तरी मन मागे धाव घेत असे. आज इतकी वर्षे उलटली, बालवय सरूनही काळ लोटला तरी मे महिना येताच या सगळ्या आठवणी पाचोळ्यासारख्या मनाच्या तळाशी गोळा होतात. ते वासे, त्या तुळया घरालाच नव्हे तर आमच्या बालपणाला आधार देणार्‍या होत्या हे जाणवते. बागेत पाणी घातल्यानंतर मातीचा वास आला की त्या स्मृती दरवळून जातात. बाल्यावस्था सरली तरी बालपण उरल्याचे प्रकर्षाने जाणवते. आताच्या मज्जा करण्याच्या, एन्जॉय करण्याच्या संकल्पना मानणार्‍यांना हा सगळा ‘एमोशनल फूल’चा प्रकार वाटेल. कारण आज भावंडष नसतात तर कजिन्स असतात.

काका-काकूंनाही अंकल आणि आंटी म्हणण्याचा हा काळ आहे. सध्याही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी चार टाळकी लागतात पण त्यात ‘शो ऑफ’ कोण किती करतो याचीच अधिक चर्चा होते. मुलांच्या हातात मोबाईलरुपी खेळणे असतेच. ते काढून घेतले तर त्यांना लगेच बोअर व्हायला होते. त्यांच्या हातून आईने मोबाईल काढून घेतला तर वडील डाफरतात आणि वडिलांनी काढून घेतला तर गप्पांमध्ये व्यत्यय येतो म्हणून आईचा मूड जातो. एकूण काय तर मे महिन्यात अनेकांच्या भेटीगाठी, प्रवास, गेट टूगेदर होत असली तरी हल्ली त्यातून नेमके काय मिळते हा खरेच विचारात घेण्याजोगा प्रश्न आहे.

खरे तर मे महिन्याची सुट्टी आत्मानंदासाठी असावी, आत्मशोधासाठी असावी. काही मिळवण्याचा हव्यास न धरता मिळेल ते साठवण्याची, संचयी वृत्ती याकाळात बाणवावी. भरपूर वाचावे, भरपूर ऐकावे, भरपूर फिरावे आणि डोळे भरून बघावे. त्यासाठी महागड्या कॅमेर्‍याची लेन्स लागतेच असे नाही. देवाने दिलेल्या दोन डोळ्यांच्या लेन्स समस्त चराचरातले सौंदर्य आणि मांगल्य दाखवण्यास पुरेशा सक्षम आहेत. बाहेर वैशाख पेटलेला असला तरी मनात चांदणे फुलण्याचा हा काळ आहे. कारण धग निवते मात्र मेच्या रणरणीत उन्हाचे वृत्तीच्या तळापर्यंत पडलेले कवडसे नेहमीच चकाकत राहतात.

याकाळात जुळलेली नाती, जमलेले मैत्र, वाचलेले साहित्य, डोळ्याखालून गेलेल्या कविता, ऐकलेले संगीत पदराला बांधलेल्या गाठीसारखे घट्ट साथ देते. जो आनंद लाखो रुपये खर्चून मिळत नाही तो एखादी कविता वाचून आणि त्याचा अर्थ समजल्यानंतर होतो. एखाद्या प्रसंगी शांताबाईंच्या ओळी आठवून जातात. कधी रात्री झोप लागत नसताना आठवणींच्या पडद्याआडून गावातल्या मंदिरात रंगलेल्या भजनाचे सूर कानात घुमल्याचा भास होतो. मे महिन्यातल्या एखाद्या दुपारी प्रवासात एखाद्या गावातला निवांत पार दिसला की क्षणभर तिथे टेकावेसे वाटते. त्या झाडाला स्पर्श करावासा वाटतो. ही खरी मे महिन्याची देणगी असते. म्हणूनच एकदा या निवांत महिन्याकडे बघा. खर्‍या अर्थाने तुम्ही समृद्ध व्हाल...

Related Stories

No stories found.