झळा सोसवेना!

राजीव मुळ्ये, पर्यावरण अभ्यासक

पृथ्वीवरचे ऋतुचक्रही बाधित झाले आहे. याचा प्रत्यय आपण अलीकडील काळात अनेकदा घेतला आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यात गेल्या 122 वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी देशाने गाठला. या उष्णतेच्या लाटेची जवळपास 15 राज्यांना झळ बसली. राजस्थानसारख्या राज्यांमध्ये उन्हाळा कडक असणे ही बाब नवी नाही, पण यंदाच्या वर्षी उन्हाळ्याने काहिली होणार्‍या राज्यांच्या यादीत बर्फाच्छादित हिमाचल प्रदेशचाही समावेश होता. उष्णतेच्या लाटेचा विचार करता नवीन हिट कोड तयार करायला हवा.

यंदा देशात रेकॉर्डब्रेक तापमान आहे. दरवर्षी वाढत चाललेले उन्हाळ्यातील तापमान चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाते. यालाच आपण उष्मा लाट किंवा हिट वेव असे म्हणतो. मराठी महिन्यांनुसार वैशाख महिना सुरू झाला की पारा वेगाने वर सरकू लागतो आणि एरवी गर्दीने ओसंडून वाहणारे रस्तेही सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत सुनेसुने वाटू लागतात. वर्षानुवर्षांचा हा कालक्रम, निसर्गक्रम राहिला आहे. परंतु जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे झालेला हवामान बदल यामुळे पृथ्वीवरचे ऋतुचक्रही बाधित झाले आहे. त्यांची तीव्रता, लहरीपणा वाढला आहे. याचा प्रत्यय आपण अलीकडील काळात अनेकदा घेतला आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. गेल्या 122 वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात देशाने गाठला. मार्च महिन्यातील उष्णतेच्या लाटेने जवळपास 15 राज्यांना उन्हाची झळ बसली. राजस्थानसारख्या राज्यांमध्ये उन्हाळा कडक असणे ही बाब नवी नाही, पण यंदाच्या वर्षी उन्हाळ्याने काहिली होणार्‍या राज्यांच्या यादीत बर्फाच्छादित हिमाचल प्रदेशचाही समावेश होता.

उष्णतेची लाट लवकर का आली? यासाठी विविध घटक कारणीभूत असतात. पण मुख्य कारण आहे ते म्हणजे जागतिक तापमानवाढ. वाढते शहरीकरण, कमालीचे प्रदूषण आणि बेसुमार जंगलतोडीमुळे उष्णता वाढत आहे. वाढते तापमान आणि उष्णतेमुळे जनजीवन आणि निसर्गचक्र विस्कळीत झाले आहे. माणसेच नाही तर प्राणी, पक्षीदेखील यामुळे हैराण झाले आहेत.

सखल भागात असणारे ऊन आपण समजू शकतो. परंतु पर्वतीय भागात, थंड हवेच्या ठिकाणीदेखील पंखे लावावे लागत असतील तर प्रकरण गंभीर पातळीच्या पुढे गेले आहे, असे समजले पाहिजे. सिमलासारख्या भागातील पाणीटंचाईही कोणापासून लपून राहिलेली नाही. पर्वतीय भागातील वातावरण वेगाने बदलत आहे. जागतिक पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, ग्लेशियर वितळत असल्याने पर्वतातून वाहणार्‍या नद्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लहान नद्यांत तर ग्रीष्म ऋतूपर्यंत चिखलदेखील राहत नाही. पाणीपातळी घसरत चालल्याने मानवनिर्मित तलाव आणि विहिरीतील पाणीदेखील कमी होते आणि आटते. आजही उन्हाळ्याच्या दिवसांत देशभरात पाणी संकट निर्माण झाले असून त्याच्या झळा लोकांना बसू लागल्या आहेत.

देशात ऋतूंमध्ये संतुलन होते तेव्हा सर्वजण निसर्गाचा आनंद लुटत होते. प्रत्येक मोसमाची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहावयास मिळत होती. परंतु निसर्गावर मानवाकडून होणार्‍या हल्ल्यांमुळे सर्व चक्र बिघडले आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. वीज आणि पाणीटंचाईचा सामना करताना वाढत्या उष्णतेने लोकांची स्थिती शोचनिय झाली आहे.

उन्हाळा येताच लोकांचे निसर्गप्रेम जागे होते आणि ढासळत्या पर्यावरणाला मानवच कसा जबाबदार आहे, हे सांगितले जाते. परंतु उन्हाळा संपताच हा विषय बाजूला पडतो. सध्या जगभरात पृथ्वीला वाचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी करार केले जात आहेत. ऊर्जेसाठी पर्यायी स्रोत शोधले जात आहेत. या आधारावर तापमान कमी कसे राहील, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

नद्यांबरोबरच तलावांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारी पातळीवर घेतलेला पुढाकारदेखील दिसत आहे. भावी पिढीसाठी स्वच्छ हवा आणि पाण्याची सोय कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक ऊर्जा वापरामध्ये 80 टक्के ऊर्जा ही जिवाश्म इंधनातून म्हणजे कोळसा, तेल आणि नैसर्गिक गॅस यांच्यापासून तयार होते. आज ही ऊर्जाच विकासासाठी, प्रगतीसाठी गरजेची बनली आहे. पण त्यातूनच मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होत आहे. अशावेळी कार्बन उत्सर्जन रोखणार कसे? याचे उत्तर आपल्याला गेल्या दोन वर्षांत मिळाले. लॉकडाऊनमुळे लोक घरात बसल्यानंतर निसर्गाने आपले मूळ रूप धारण केल्याचे दिसून आले. याचा अर्थ पुन्हा लॉकडाऊन करावा असे नाही, तर त्यासदृश मानवाची कृती आणि सामाजिक सामूहिक वर्तन असले पाहिजे आणि ध्येयधोरणे असली पाहिजेत. तरच निसर्ग वाचेल. परंतु व्यावहारिक पातळीवर ही बाब शक्य होत नाही.

दरवर्षी कोट्यवधी रोपांची लागवड केली जाते. परंतु कालांतराने त्याचे अस्तित्व कोठेच दिसून येत नाही. समाजसेवी संघटनांकडून पर्यावरणवादी उपक्रम राबवले जातात. परंतु हे प्रयत्न अजूनही अपुरे पडत आहेत. आज शहरांबरोबरच ग्रामीण भागदेखील ओसाड झाला आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे गरजेनुसार झाडांची लागवड केली जात नाही. परिणामी तापमान वाढत चालले आहे. एका ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत भारतात उष्ण दिवस आणि उष्ण रात्रींची संख्या 1976 ते 2005 या कालावधीच्या तुलनेत 55 ते 70 टक्क्यांनी वाढलेली असेल. चालू शतक समाप्त होईपर्यंत देशाच्या सरासरी तापमानात 4.4 अंशांची वाढ होणार आहे. त्यावेळेपर्यंत समुद्राचा स्तरही 30 सेंटीमीटरने वाढलेला असेल.

मानवी विकासाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे निसर्गाचे झालेले नुकसान भरून काढणे सोपे नाही. परंतु सर्वच संपले आहे असे नाही. आपण जीवनशैलीत थोडा बदल केला आणि काही भौतिक सुविधा कमी केल्या तर शिल्लक राहिलेली वनसंपदा नष्ट होण्यापासून वाचू शकेल आणि भविष्यात सुधारण्याची संधी मिळू शकेल. हवामान बदलाची ही समस्या जागतिक स्वरुपाची आहे आणि जगातील सर्वच देश आपापल्या पद्धतीने या समस्येवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या बाबतीत एकटा भारत फारसे काही करू शकत नाही.

अशा स्थितीत या आघाडीवर शक्य तितके प्रयत्न करून आपल्याला दुसर्‍याही आघाडीकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. ही दुसरी आघाडी म्हणजे, हे बदल अटळ आहेत असे गृहीत धरून आपल्या गरजा आणि त्यांची पूर्तता त्यानुरूप बदलण्याचा प्रयत्न करणे. यासंदर्भात भारताच्या दृष्टीने सर्वात चांगली बाब अशी की, आपल्याकडे उष्ण आणि थंड अशा दोन्ही प्रकारचे हवामान असणारे प्रदेश आहेत आणि प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या तापमानाशी सुसंगत पिके घेण्याचा अनुभव आपल्याकडे आहे.

यापुढील जबाबदारी बर्‍याच अंशी शेतीतज्ज्ञांची आहे. त्यांनी आता गव्हासारख्या थंड हवामान आणि अधिक पाणी लागणार्‍या पिकाच्या अशा जाती विकसित करायला हव्यात ज्या अधिक तापमान आणि कमी पाण्यावर तग धरू शकतील. त्याचप्रमाणे ज्वारी, बाजरीसारख्या आपल्या नैसर्गिक चवीला अनुसरून असणार्‍या पिकांच्या अधिक उत्पादन देणार्‍या प्रजातीही त्यांनी विकसित करायला हव्यात. दुसरीकडे, जिवाश्म इंधनाचा वापर कमीत कमी करण्यावर भर द्यायला हवा. यासाठी सौरऊर्जेला चालना द्यायला हवी. तसेच जीवनशैलीतही बदल करायला हवेत.

चोवीस तास एसीमध्ये राहणार्‍या मंडळींनी काही तास सामान्य वातावरणात राहण्याचा सराव करावा. आठवड्यात एक दिवस वाहने बंद ठेऊन प्रदूषण कमी करण्यास मदत करायला हवी. अशा लहानसहान कृतीतून पर्यावरणपूक गोष्टी आपल्या हातून घडतील आणि सामूहिक सातत्यपूर्ण प्रयत्नांतून निश्चितच शाश्वत सुपरिणाम दिसून आल्यावाचून राहणार नाहीत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *