शब्दगंध : गरजांचे कोडे सुटले!

शब्दगंध : गरजांचे कोडे सुटले!

नाशिक | दिनेश सोनवणे

कितीही पैसे कमावले तरी ते कमीच पडतात, अशीच अनेकांची तक्रार होती. अधिकाधिक पैसे कमावण्यासाठी माणसांनी स्वतःला घड्याळाशी जुंपून घेतले. गरजा का आणि कशा वाढल्या, हे लक्षातच येईनासे झाले होते. करोनाने गरजांकडे बघण्याचा चष्माच बदलला. कितीतरी गरजा अनावश्यक होत्या, हे बहुतेकांच्या लक्षात आले आणि गरज आणि पैसे यांचे कोडे सुटले.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या खिशाला कात्री लागली. अनेकांचे व्यवसाय थांबले, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेकजन वर्ष झाले तरी स्थिरस्थावर होऊ शकले नाहीत. तरीही अनेकांनी खर्चाचे नियोजन करून आपल्या गरजा कमी केल्या.

आपण आरोग्यपूर्ण आणि जिवंत राहणे हीच प्राथमिकता आहे, हे या करोनाने आपल्याला शिकवले.

करोनाच्या भयंकर काळाने खूप शिकवले. भौतिक आणि चंगळवादी सुख निसर्गापुढे खूप क्षुल्लक आहेत, हेदेखील दाखवून दिले. आयुष्याचे नवीन पदर याच काळात उलगडले. सुख म्हणजे नक्की काय असते? याचीही खरी व्याख्या करोनानेच करून दिली. कुटुंबासोबतचा रोजचा संवाद हा कोणत्याही सुखाच्या व्याख्येत बसवता नाही येणार नाही हे तितकेच खरे.लॉकडाऊन नसताना प्रत्येकाच्या गरजा आपण महिन्याला कमविणार्‍या पगारावर निश्चित केलेल्या होत्या.

परिणामी असे लक्षात आले की, उगाचच आपण एवढा खर्च करायचो. आपल्या गरजा तर फार कमी आहेत. एवढ्या कमी खर्चातही आणि कमी मेहनतीतही आपण उत्कृष्ट लाईफ स्टाईल जगू शकतो.

यामध्ये गरजेनुसार दरवर्षी मोठी पार्टी आयोजित करणे, परदेशवारीला जाऊन एन्जॉय करणे, मोठमोठाली लग्न समारंभांचे आयोजन करणे, अमाप पैसा खर्च करून स्वतःची वाहवा करून घेणे या गोष्टींचा समावेश होता.

सुरुवातीला अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या प्राथमिक गरजा होत्या. यानंतर हळूहळू आपल्या गरजा वाढून आसमंतातच जणू जाऊन बसल्या होत्या. आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर चंगळवाद आपल्याला झोप लागू देत नाही. हजारो, लाखो रुपये खर्च करून अनेकजन जीवाची हौसमौस करत असतात.

या लाईफस्टाईलची गरज निर्माण आपणच केली. मात्र, करोनाच्या महामारीत अनेकांचे अर्थकारण थांबले, कर्जाचा डोंगर उभा राहिला. या काळात आर्थिक चणचण भासण्यास सुरुवात झाली. याला आपल्या वाढवलेल्या गरजा गरजेच्या नाहीत हे अनेकांना उमगले. अनेकांनी सुयोग्य नियोजन करत या महामारीशी दोन हात करण्यास सुरुवात केली.

यातील सर्वात कळीचा मुद्दा असलेल्या गरज कमी करणे हे आवाहन त्यांच्यापुढे होते. अनेकजन हौसमौजेपासून दुर राहिले. लग्नसोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरी झाले. पार्टीचा विचारही त्यांनी याकाळात केला नाही. अनेकांनी परदेशवारीचे स्वप्न देखील बधितले नाही. यामुळे आपोआपच अनावश्यक खर्चाला चाप लागला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com