साकारा नवविचारांची गुढी!

साकारा नवविचारांची गुढी!

कोरोनाने समाजातले लहान-थोर, श्रीमंत-गरीब, मागास-सक्षम असे अनेक भेद मिटवले. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तर काहीही अशक्य नाही हा वस्तुपाठ या व्याधीने गिरवायला लावला. खरं सांगायचं तर गुढीपाडव्याच्या आधीच आपल्या सर्वांच्या मनात या नव्या विचारांची गुढी उभारली गेली आहे. आता तिला वास्तवात आणणं, साकार करणं एवढंच आपल्याला करायचं आहे.

मराठी मुलखातील नववर्ष सुरू होत आहे. एका त्रासदायक पर्वाचा अंत आणि आशादायी काळाचा आरंभ यातली सांधेजोड म्हणूनच आपण या दिवसाकडे पहात आहोत. त्यामुळेच गुढीपाडव्याकडे आणि त्यानंतरच्या पर्वाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीकोनातून पहायला हवं. यामागचं कारण म्हणजे आता आपण सगळेच खूप मोठ्या संकटातून बाहेर येत आहोत. या काळात संपूर्ण देशाने अपार संयम दाखवला. प्रचंड लोकसंख्या असणार्‍या देशात लसीकरणाचं महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि लशीच्या दोन मात्रा घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेपर्यंत आणणं हे निश्चितच सोपं काम नव्हतं. देशातल्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी आणि प्रत्यक्षात लस टोचण्यासाठीही प्रचंड मोठी यंत्रणा राबवणं गरजेचं होतं. अभिमानाची बाब म्हणजे देशानं लसीकरणातले हे सगळे टप्पे वेळेत पूर्ण केले. त्यामुळेच आज बहुसंख्य नागरिकांचं लसीकरण पूर्ण होत आलं आहे. योग्य पद्धतीने लोकांना समजावलं तर ते नव्या गोष्टींची गुढीही सहज उभारतात हेच या सगळ्यातून दिसून आलं. या अडचणीच्या काळात देशातले सगळे नागरिक एकत्र होते. भेदभाव आणि जात-पात विसरुन एका पातळीवर येत सगळ्यांनी मनापासून काम केलं. या रोगानं लोकांना एकत्र आणलं ही चांगली बाब. या आजाराने समाजातले लहान-थोर, श्रीमंत-गरीब, मागास-सक्षम असे अनेक भेद मिटवले आणि सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तर काहीही अशक्य नाही हा वस्तुपाठ घालून दिला. खरं सांगायचं तर, आपल्या सर्वांच्या मनात या नव्या विचारांची गुढी उभारली गेली आहे. आता तिला वास्तवात आणणं, साकार करणं एवढंच आपल्याला करायचं आहे.

विचारांमध्ये झालेला हा बदल कायम टिकून रहायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण अंतरंगात डोकावण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे. बरेचदा आपण स्वत:पेक्षा दुसर्याच्या घरांमध्ये, आयुष्यामध्ये काय चाललंय हे बघण्यात समाधान मानतो. आपल्या प्रगतीकडे लक्ष न देता अन्य निरर्थक कामांमध्ये वेळ दवडतो. दुसर्यांच्या चुका काढणं, उखाळ्या-पाखाळ्या यात आपला किती मौल्यवान वेळ खर्ची पडतो हे अनेकांना समजतही नाही. या सगळ्यानं आपली, पर्यायानं देशाचीही प्रगती खुंटते. म्हणूनच सक्षमतेनं उभं राहण्याच्या प्रयत्नात असणार्या प्रत्येकाने आधी स्वत:वर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. एकदा स्वबळावर उभं राहणं जमलं की स्वत:पुरतं न जगता आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या कामात सामील करुन घेत त्यांच्या उन्नतीसाठीही प्रयत्न करावेत आणि चांगल्या विचारधारांची आणि कामाची ही माळ गुंफत रहावी. म्हणजेच दुसर्याला सामावून घेत पुढे जाण्याची वृत्ती अंगिकारणं हे आपलं ध्येय असण्याची गरज आहे. स्वत:पुरतं सगळेच जगतात पण आता दुर्बल, कमकुवत घटकांसाठी जगण्याची वेळ आली आहे हे आपण समजून घ्यायला हवं. या नव्या विचारांचा अवलंब केला तर आयुष्यात कोणीच एकटं पडणार नाही. या विचारांची गुढी आपल्याला यथोचित मार्गावर घेऊन जाईल यात शंका नाही.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे कोरोना साथीने सगळ्यांनाच एका पातळीवर आणून ठेवलं. त्यामुळे किमान आता तरी आपण केवळ ङ्गभारतीयफ ही ओळख जपण्याची गरज सगळ्यांना जाणवायला हवी. ही एकसंधता, एकरुपता आपल्या विचारांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. म्हणूनच कोरोनामध्ये होरपळल्यानंतर नव्यानं जगण्याची सुरूवात करताना हे विचार अंगिकारणं हेच समतेची गुढी उभारणं असेल.

मला आमच्या क्षेत्राविषयीही बोलायला आवडेल. तब्बल दोन-अडीच वर्षांच्या सक्तीच्या विरामानंतर प्रेक्षक आणि कलाकार आता समोरासमोर येत आहेत. मैफिली पुन्हा रंगू लागलेल्या आहेत. मधल्या काळानं समोरासमोरच्या सादरीकरणाला पर्याय नाही हे पुन्हा एकदा ठोसपणे समोर आलं. तांत्रिकदृष्ट्या कितीही पुढे गेलो तरी कलाकारांचा थेट आविष्कार आणि रसिकांकडून मिळणारी थेट दाद याला पर्याय असू शकत नाही हे सगळ्यांनाच समजलं.

आता कलेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची मदत होत असली तरी त्याच्या सीमा या काळानं दाखवून दिल्या. आम्हीही या काळात ऑनलाईन कार्यक्रम करत होतो. पण नंतर त्याचाही कंटाळा येऊ लागला. कारण त्यात जिवंतपणाच नव्हता. कलाकाराला दादही वाचून मिळणार असेल तर तिथेच सगळं संपलेलं असतं, पण काळाची गरज म्हणून ते सुरू राहिलं इतकंच! मात्र इतक्या महाभयंकर काळातही शास्त्रीय संगीत किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं हे सगळ्यांनाच समजलं आणि पटलं. या काळात लोक केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आजारांनीही बाधित होत होते. त्यांच्या मनावर वेगवेगळे आघात होत होते.

या आघातांमधून, भयग्रस्ततेतून बाहेर निघण्यासाठी त्यांना शास्त्रीय संगीताची मदत घ्यावीशी वाटली. आम्ही असे अनेक कार्यक्रम केले, जे मनोरंजनासाठी नव्हते तर मन:शांतीसाठी होते. मी केलेल्या अशा कार्यक्रमाचं नावच ङ्गहिलिंग ऑफ द माईंड अँड बॉडीफ असं होतं. यामध्ये आम्ही रागांच्या आधारे गीतेतले श्लोक लोकांसमोर आणले. या प्रयत्नात एक डॉक्टर आमच्याबरोबर होते. हे श्लोक दैनंदिन आयुष्यात मनोबल कसं वाढवतात, हुरुप कसा देतात आणि सकारात्मकता कशी निर्माण करतात, हे त्यांनी समजावून सांगितलं. गेल्या दोन वर्षांच्या तणावग्रस्त काळात मी अशा प्रकारे समाजाला मदत करु शकले याचाच खूप आनंद आहे. पण असे प्रयोग इथेच थांबता कामा नयेत. कारण शास्त्रीय संगीत हा आपला मौल्यवान ठेवा आहे. हे आपलं संचित आहे. हे समृद्ध झरे आपल्या आयुष्यात पाझरत रहायला हवेत.

सध्या ताणतणाव, डिप्रेशन, स्वमग्नता यासारखे आजार वाढत आहेत. आयुष्यातले धकाधकीचे क्षण अमाप आहेत. त्याचा सामना करण्यासाठी, त्यापासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी आणि आत्मिक आनंदासाठी शास्त्रीय संगीत जाणून घेण्याची अतिव आवश्यकता आहे. कारण केवळ मनोरंजन हा या संगीताचा भाग नाही तर संगीत तुमच्या आत्म्याला सुखावतं. ते तुम्हाला अंजारतं-गोंजारतं. मनाला एखादी खोलवर ठेच लागली असेल तर फुंकर घालतं. संगीतात वेगळी ऊर्जा आहे, वेगळी सकारात्मकता आहे. म्हणूनच ते तुम्हाला मनानेही कधी खाली पडू देत नाही. हे संगीत खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला शांतही ठेवतं आणि त्याच वेळी हा गानप्रकार तुम्हाला उत्साहीदेखील ठेवतो. थोडक्यात, आयुष्याचं संतुलन साधण्यासाठी शास्त्रीय संगीताचा व्यासंग महत्त्वाची भूमिका बजावतो. अर्थात प्रत्येकाने स्टेजवर जाऊन गावं असा त्याचा अर्थ नाही. पण या गानप्रकाराची आवड ठेवली तरी तुमचं शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते. तुम्ही मनानं शांत असाल तर कुठलीही आव्हानं पेलण्यास तयार असता.

संगीत खूप गहन आहे, ते आपल्याला समजत नाही असं समजण्याची काहीही गरज नाही. तुम्ही त्यात रमता, त्याचा आस्वाद घेऊ लागता तेव्हा आपल्या नकळत ते तुमच्या वृत्तींमध्ये झिरपू लागतं. तो पाझर तुमची रुची वाढवतो आणि तुमची वाटचाल आत्मानंदाकडे सुरू होते. मी इतकच सांगेन की कळलं नसलं तरी संगीताचा आनंद घ्यायला शिका. कालांतरानं तुम्हालाच जाणवेल की यामुळे आपल्या मनाची बैठक स्थिर झाली आहे. म्हणूनच यंदा गुढी उभारताना ऐहिक सुखांबरोबर मन:शांती उंचावण्याचाही निर्धार करत नव्या उमेदीने नववर्षाचं स्वागत करायला हवं.

Related Stories

No stories found.