खेलो इंडिया

खेलो इंडिया

ऑलिम्पिक (Olympic) आणि पॅरालिम्पिक (Paralympic) स्पर्धांमधल्या यशानंतर आता खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. नीरज चोप्राचे (Neeraj Chopra)यश अनेकांना खेळाकडे वळवू शकते. आज क्रिकेटपटूंइतकीच लोकप्रियता पदकविजेत्या खेळाडूंना मिळते आहे. नीरज चोप्राला जाहिरातीत (In advertising) घेण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. मात्र असे असले तरी भारतात क्रीडासंस्कृती (Sports culture) रूजली तरच येत्या काळात पदकांची लयलूट (Loot of medals )होऊ शकेल.

आज हा लेख वाचणार्‍यांना खेळ या प्रकारातला तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कोणता, असा प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर त्याने ‘1983 मध्ये भारताने एकदिवसीय क्रिकेटचा जिंकलेला विश्वचषक’ असे दिले तर त्याचा अर्थ तो वाचक चाळीशीचा असेल. हाच प्रश्न काही वर्षांनी पुन्हा विचारला तर मला खात्री आहे त्याचे उत्तर नीरज चोप्राचे टोकियो ऑलिम्पिकमधले सुवर्णपदक हे असणार आहे. कारण या सुवर्णक्षणाचा या शतकात जन्माला आलेल्या तरुण भारतीयांवर मोठा परिणाम झाला आहे. विराट कोहली सोबतच नीरज चोप्राची पोस्टर्स मुलांच्या खोलीत दिमाखाने मिरवत आहेत आणि नीरज चोप्रा हा क्रिकेटपटू नाही, या बदलाची नोंद घेण्याची गरज आहे!

आज नीरज चोप्राला इन्स्टाग्रामवर फॉलो करणार्‍यांची संख्या चाळीस लाखांहून अधिक आणि ट्विटरवर फॉलो करणार्‍यांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरज चोप्रा एका रात्रीत स्टार बनला. त्यामुळेच हे शक्य झाले. आज टाटांसारखे मोठे ब्रँड्स नीरजला आपला ब्रँड अँबेसेडर नेमायला उत्सुक आहेत. पाच ते सहा ब्रँड्सबरोबर नीरज करारबद्ध झाला देखील असेल.

टोकियो ऑलिम्पिकनंतर अ‍ॅथलिट्सच्या एन्डॉर्समेंट फीमध्ये तब्बल दहापट वाढ झालेली दिसते तर नायके, एक्सॉन मोबिलसारख्या कंपन्यांना आपला करार वाढवून घेण्यासाठी आता अ‍ॅथलिट्सना कित्येक पटीत पैसे द्यावे लागत आहेत. हे सर्व करार केवळ एक-दोन वर्षांचे नाहीत तर पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आले आहेत. आज भारत आणि जगातल्या आघाडीच्या जाहिरात कंपन्या पदकविजेत्या भारतीय अ‍ॅथलिट्सच्या मागे धावत आहेत.

त्यात ऑटोमोबाईल, तयार कपडे आणि फार्मा कंपन्या आघाडीवर आहेत. हे आत्तापर्यंत भारतात क्रिकेटपटूंच्या बाबतीत घडायचे ते आता अ‍ॅथलिट्सच्या बाबतीत घडायला सुरुवात झाली आहे. एकट्या नीरज चोप्राला करारबद्ध करण्यासाठी सुमारे 80-90 कंपन्या रांगेत उभ्या असल्याची माहिती या क्षेत्रातले जाणकार सांगतात. तरी कोणत्याही परिस्थितीत मद्य, सिगारेट, तंबाखूच्या कोणत्याही ब्रँडची जाहिरात नीरज करणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.

नीरज चोप्रावर आणि इतर पदक विजेत्यांवर सध्या कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे. ‘इंडिगो’ या भारतीय विमान कंपनीने नीरज चोप्रासाठी एक वर्षभरासाठी मोफत विमान प्रवास जाहीर केला आहे तर महिंद्रा कंपनीने आपली एक्सयूव्ही 700 गाडी त्याला भेट म्हणून दिली आहे.

या व्यतिरिक्त रोज बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. काल-परवापर्यंत 10 ते 15 लाख रुपये वार्षिक फीवर काम करणारे अ‍ॅथलिट्स आता त्याच्या कित्येक पटीत पैसे फी म्हणून गोळा करत आहेत. नीरज चोप्राचे पाय मात्र जमिनीवर आहेत, असे दिसतेय. त्याने पुढच्या वर्षभरासाठी सराव आणि स्पर्धेचे काटेकोर नियोजन केले आहे.

त्यामुळे ब्रँड प्रमोशनसाठी त्याने मोजकेच दिवस ठेवले आहेत. यातून त्याची खेळावरची निष्ठा दिसते. काहींनी नीरजला करारबद्ध न करताच खुशाल त्याच्या जाहिराती छापल्या. या प्रकरणावरून आता कोर्टबाजी सुरू झाली आहे.

कालपर्यंत जिल्ह्यात आणि त्या क्रीडाप्रकाराव्यतिरिक्त माहीत नसणारे अ‍ॅथलिट्स आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयकॉन बनत आहेत. ते ज्या मागास खेडेगावातून येतात, त्या गावात पत्रकार आणि ओबी व्हॅन्स दिसू लागल्या आहेत. इतकेच काय, तर ज्यांचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले अथवा कांस्य किंवा रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, त्यांच्या कौतुकातही कोणतीही कसूर दिसून येत नाही. हे सगळे विलक्षण आहे आणि पहिल्यांदा घडत आहे.

आनंदाच्या, कौतुकाच्या सोहळ्याचा धुरळा खाली बसला की कधी तरी टोकियो ऑलिम्पिकमधल्या यशापयशाबद्दल काही कठोर प्रश्न विचारावे लागणार आहेत. क्रीडा या व्यवस्थेकडे अत्यंत तर्कशुद्धपणे पहावे लागणार आहे. मिळालेले यश हे वैयक्तिक की एका व्यवस्थेचा परिपाक आहे, हे तपासून पहावे लागणार आहे. ही एका नशिबवान सूर्यप्रकाशीत दिवसाची देणगी आहे की या देशात पदक जिंकू देऊ शकणारी मुशी निर्माण झाली आहे, याचा आता विचार करता येणार आहे.

लक्षात घ्या, टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 86 देशांनी सहभाग नोंदवला होता आणि पदकांच्या क्रमवारीत आपला क्रमांक 48 वा आहे. पुढच्या वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा अशा दोन महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी जेमतेम हजार दिवस उरले आहेत.

इथे लक्षात घ्यायला हवे की, पदके मिळवण्यासाठी 2018 मध्ये एका टास्क फोर्सचे गठन करण्यात आले होते. खेळाडू पदकविजेत्या पोडियमपर्यंत पोहोचण्यास कारणीभूत असणार्‍या अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. प्रशिक्षण, आहार, दुखापत व्यवस्थापन या सगळ्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.

मागच्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये एका महत्त्वाच्या गुणाने प्रवेश केला, ती म्हणजे महत्त्वाकांक्षा. व्यवस्थापनात काही प्रमाणात व्यावसायिकताही आली. तरी देखील एक करिअर म्हणून क्रीडा प्रकाराची इकोसिस्टिम आपण विकसित केली आहे का? त्याचे आजचे उत्तर नकारार्थी आहे.

जसे बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ही क्रिकेटपटूंची संघटना स्वत:च्या जीवावर खासगी उद्योजकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा उभा करू शकते. त्या स्थितीपासून भारतीय अ‍ॅथलेटिक्स अजून खूप दूर आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारी निधीचा वापर नेमका कशाकशावर होतो, हे आज तपासणे गरजेचे आहे. खेळ, खेळाडू, सोयीसुविधा, प्रशिक्षण, उपकरणे यावर किती खर्च होतो आणि इतर किती हे पारदर्शीपणे समोर येणे गरजेचे आहे.

आज अनेक शाळांमधून महाविद्यालयातून क्रीडाप्रकाराचे साधे प्रशिक्षण देखील उपलब्ध नाही. मैदानाच्या नावाने बोंब आहे. जी उपलब्ध आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे.

क्रीडा शिष्यवृत्ती हा प्रकार जवळपास दुर्मिळच आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्सचे हे वास्तव देखील समोर यायला हवे. अर्थात 2018 नंतर यात खूप फरक पडला आहे. ‘खेलो इंडिया’चे उत्तम परिणाम समोर येत आहेत. अंदमान निकोबार द्विपसमूहातले सायकलपटू आणि ईशान्य भारतातल्या दहा-बारा वर्षांच्या मुली प्रशिक्षणादरम्यान आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित करत आहेत.

झारखंडमध्ये शाळेला जाणार्‍या मुली खांद्यावर दप्तराव्यतिरिक्त हॉकी स्टीक आणि त्यांचे वडील बाजूच्या शेतात खांद्यावर नांगर घेऊन जाताना दिसतात, हे विलक्षण मनोहारी आहे. पण त्या मोठ्या आणि गुणवान तरुणाईला खेळात करिअर करायची संधी मिळत आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अजूनही भारतीय अ‍ॅथलेटिक्सकडे माध्यमांचे सातत्यपूर्ण लक्ष आहे असे म्हणता येणार नाही.

टोकियो ऑलिम्पिकसारखी एखादी नेत्रदीपक कामगिरी झाली अथवा एखादी वादग्रस्त घटना घडली तरच माध्यमाचे तिकडे लक्ष जाते, ही वस्तुस्थिती आहे.

दिल्लीमध्ये अ‍ॅथलेटिक्सची पाच मैदाने आहेत. त्यांचा पुरेसा वापर होत नाही हे निरीक्षण नीती आयोगाच्या अभ्यास अहवालातून समोर आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑलिम्पिकच्या पोडियमवर जेव्हा एखादा खेळाडू पदक स्वीकारतो आणि तिथे संपूर्ण देशाची मान उंचावते. त्याच वेळी हजारभर खेळाडू तशी कामगिरी करू न शकल्यामुळे ड्रॉपआउट हा शिक्का कपाळी घेऊन अंधारात चाचपडतात.

अशा खेळाडूंसाठी स्पोर्टस मेडिसीन, स्पोर्टस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यात संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्पोर्टस मॅन्युफॅक्चरिंग ही एक मोठी आणि वाढत जाणारी इंडस्ट्री आहे. त्यातदेखील अशा खेळाडूंच्या करिअरची काळजी करता येऊ शकते.

आता शांतपणे बसून भारतीय अ‍ॅथलेटिक्सचा नव्याने विचार करायला हवा. भारतासारख्या देशात एका रात्रीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्रीडाक्षेत्राच्या वार्षिक बजेटमध्ये प्रचंड वाढ होईल आणि खेळांसाठी पायाभूत सोयीसुविधा एका रात्रीत वाढतील, अशी अपेक्षा करणे चूक ठरेल. याची जाणीव ठेऊनच नियोजन करावे लागेल. एकूणच क्रीडा संस्कृती हा आमच्या जीवनपद्धतीचा भाग बनायला हवा. सर्वसामान्य माणूस वैयक्तिक तंदुरुस्तीबद्दल जागरूक बनेल आणि तसे प्रयत्न रोज करताना दिसेल तेव्हा क्रीडासंस्कृतीची सुरुवात झालेली आहे, असे म्हणता येईल.

लक्षात घ्या, 130 कोटी लोकसंख्येच्या देशात 120 कोटी जनता मागच्या कित्येक वर्षात कोणताही खेळ खेळलेली नाही. पाच टक्के शाळांकडे सुद्धा खेळाची विकसित मैदाने नाहीत. बालके मोठ्या प्रमाणात कुपोषित आहेत. अशा वेळी राष्ट्रविकासाचा आणि क्रीडानीतीचा प्राधान्यक्रम काय असावा, याचा विचार करणे गरजेचे आहे.

एक कोटी 70 लाख लोकसंख्या असणारा नेदरलँड ऑलिम्पिक्समध्ये पदकांच्या क्रमवारीत सातत्याने पहिल्या दहामध्ये आहे. याचे कारण तिथे क्रीडासंस्कृती रूजली आहे. आजही नीरज चोप्राचे उत्पन्न आघाडीच्या 50 क्रिकेटपटूंपेक्षा कमीच भरणार आहे. हे सगळे बदलायचे असेल तर एक राष्ट्रीय क्रीडाभावना विकसित व्हायला हवी. कारण खेळ ही गोष्ट केवळ राष्ट्रभावना विकसित करत नाही तर आम्हाला समर्थ भारतासाठी तयार करत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com