कांद्याचा वांदा, टोमॅटोचा चिखल!

कांद्याचा वांदा, टोमॅटोचा चिखल!

एन. व्ही. निकाळे

कांदा, टोमॅटो, भाजीपालावर्गीय पिके असोत किंवा द्राक्ष पीक; त्यांचे उत्पादन घेणे ही सोपी गोष्ट नाही. कांदा-टोमॅटोच्या पिकाबाबत तर जरा जास्तच कष्ट आणि काळजी घ्यावी लागते. कितीतरी सायास करावे लागतात. तेव्हा कुठे पीक हाती येते. उत्पादन चांगले आले तरी त्याला भाव नेमका किती मिळणार, याबद्दल अनिश्चितताच असते. चांगला भाव साधला तर बरे, अन्यथा नुकसान ठरलेले! टोमॅटो पिकाला जाळीला किमान 250 ते 300 रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांच्या माफक अपेक्षा असते. गेल्या आठवड्यात तसे भाव होतेदेखील! पण आठवडाभरातनंतर चित्र अचानक पालटले. टोमॅटोचे भाव वेगाने कोसळले आहेत.

शेतकर्‍यांचे भले करण्याच्या आणाभाका राज्यापासून केंद्रापर्यंतचे सत्ताधारी सदैव घेतात. विरोधी पक्षसुद्धा शेतकर्‍यांचा कैवार घेऊन सरकारशी भांडताना दिसतात, पण शेतकरी अडचणीत आल्यावर मात्र त्याला सगळेच वार्‍यावर सोडतात. टोमॅटो पिकाच्या कोसळलेल्या भावानिमित्ताने त्याचा प्रत्यय येत आहे. कांद्याप्रमाणेच आता टोमॅटो पीकसुद्धा मातीमोल भावामुळे चर्चेत आले आहे. त्याच मार्गाने कारले, मिरची आणि इतरही भाजीपालाही निघाला आहे. शेतकर्‍यांना चारीमुंड्या चित करण्याचे हे कारस्थान असेल का? गेल्या आठवड्यात टोमॅटोच्या एका जाळीला सुमारे 300 रुपये भाव मिळत होता.

आता भाव कोसळल्याने ते 10 टक्के म्हणजे अवघे 30 रुपयांवर आले आहेत. नाशिक जिल्हाच नव्हे तर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. उत्पादनखर्चही भरून निघणे कठीण झाल्याने शेतकरी संतापले आहेत. बाजार आवारात किंवा रस्त्यावर टोमॅटो ओतून ते राग प्रकट करीत आहेत. राज्याच्या कृषिमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात टोमॅटो भावाचा प्रश्न जास्त गंभीर बनला आहे. त्याबद्दल कृषिमंत्र्यांना जाब विचारण्याची आयतीच संधी त्यांच्या विरोधकांना चालून आली आहे.

कांदा, टोमॅटो तसेच भाजीपालावर्गीय पिके असोत किंवा द्राक्ष पीक; त्यांचे उत्पादन घेणे ही सोपी गोष्ट नाही. कांदा-टोमॅटोच्या पिकाबाबत तर जरा जास्तच कष्ट आणि काळजी घ्यावी लागते. रोपे तयार करणे, लागवडीसाठी शेती मशागत, रोपांची लागवड, खतांच्या मात्रा, निंदणी, खुरपणी, औषध फवारणी, पिकाची देखभाल आदी कितीतरी सायास करावे लागतात. त्यासाठी वेळोवेळी बराच खर्चही करावा लागतो. तेव्हा कुठे पीक हाती येते. उत्पादन चांगले आले तरी त्याला भाव नेमका किती मिळणार याबद्दल अनिश्चितताच असते. चांगला भाव साधला तर बरे, अन्यथा नुकसान ठरलेले!

टोमॅटो पिकाला एकरी साधारणपणे सव्वा ते दीड लाख रुपये खर्च येतो, असे शेतकरी सांगतात. एक एकरातून सरासरी 700 ते 1,000 जाळ्या टोमॅटो उत्पादन होते. एका जाळीत सुमारे 20 किलो टोमॅटो भरतात. जाळीला किमान 250 ते 300 रुपये भाव मिळावा, अशी शेतकर्‍यांची माफक अपेक्षा असते. गेल्या आठवड्यात तसे भाव होतेदेखील! पण आठवडाभरातनंतर चित्र अचानक पालटले. टोमॅटोचे भाव वेगाने कोसळले आहेत. आता ते जेमतेम 30 ते 75 रुपयांवर घसरले आहेत. वाहतूक खर्च सुटणेही अशक्य झाले आहे. टोमॅटो उत्पादनातून दोन पैसे हाती येण्याऐवजी खिशातून भाडेखर्च देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. करोनासोबतच नैसर्गिक संकटांशी झुंजत असताना पुन्हा नुकसानीचा फेरा शेतकर्‍यांना हवालदिल करीत आहे. जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, येवला आदी प्रमुख बाजारपेठांत टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना नाउमेद करणारी बाजारभावाची ही स्थिती प्रामुख्याने पाहावयास मिळत आहे.

बदललेल्या हवामानाचा शेतीला फटका बसू लागला आहे. परतलेल्या पावसानंतर अचानक वाढलेल्या तापमानामुळे टोमॅटो लवकर परिपक्व होत आहेत. टोमॅटो शीघ्र नाशवंत पीक असल्याने तोडणी करून ते बाजारात आणण्याखेरीज शेतकर्‍यांपुढे पर्याय नव्हता. परिणामी बाजारपेठांमध्ये सर्व बाजूंनी टोमॅटोची अचानक विक्रमी आवक वाढली. पिंपळगाव बसवंत बाजारात गुरुवारी 2.5 लाख तर नाशिक बाजार आवारात 40 हजार टोमॅटो जाळ्यांची आवक झाली. राज्यात सर्वत्र एकाच वेळी झालेल्या टोमॅटो आवकेचा परिणाम बाजारभाव कोसळण्यात झाला.

औरंगाबादमध्ये टोमॅटोचे तर जालन्यात हिरव्या मिरचीचे भाव कोसळले आहेत. जालना जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे भाव 3,500 ते 4,000 रुपये होते. आता मात्र ते 500 ते 1,200 रुपयांपर्यंत घसरले आहेत. टोमॅटो उत्पादकांसारखीच मिरची उत्पादकांची अवस्था झाली आहे. इतर राज्यांतही टोमॅटो आवक वाढल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम महाराष्ट्रात होऊन टोमॅटो मागणी घटली आहे. मातीमोल भाव मिळाल्यावर एका शेतकर्‍याने 30 जाळ्या म्हणजे सुमारे 6 क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकले. मराठवाड्यातील लासूर स्टेशन येथे 4-5 ट्रॅक्टर भरून टोमॅटो मुंबई-नागपूर मार्गावर फेकून शेतकर्‍यांनी निराशा प्रकट केली. नाशिक बाजार समिती आवारात शेतकर्‍यांनी फेकलेले टोमॅटो घंटागाडीतून उचलून नेऊन फेकावे लागले.

करोना महामारीमुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. शेती व्यवसाय आणि शेतकरीदेखील त्यातून वाचलेले नाहीत. करोनाचा अंमल अद्याप कायम असताना सर्वच वस्तूंच्या भाववाढीने महागाईचे चटके आमजनतेला बसत आहेत. महागाईचा आलेख उंचावत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव सरकारी कृपेने सतत भडकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. याउलट टोमॅटो आणि भाजीपालासारख्या शेती उत्पादनांचे भाव मात्र सतत कोसळत आहेत. इतर सगळ्या वस्तूंचे भाव वाढत असताना शेतमालाचे भाव मातीमोल का व्हावेत? कारखाने आणि कंपन्यांमध्ये उत्पादित होणार्‍या वस्तूंचे मुबलक उत्पादन झाले तरी त्यांचे भाव का पडत नाहीत? टोमॅटो आणि भाजीपाल्यासारखा शेतमाल शीघ्र नाशवंत आहे. कारखान्यातील उत्पादने टीकाऊ असल्याने वर्षभर गोदामात साठवली तरी फारसा फरक पडत नाही. शेतकर्‍यांकडून उद्योजक आणि बड्या व्यापार्‍यांनी खरेदी केलेले अन्नधान्य, डाळी आदींचे बाजारपेठांतील भाव मात्र मागणीनुसार वाढतच राहतात. ते सहसा खाली येत नाहीत. म्हणजे शेतकर्‍यांकडे शेतमाल असेपर्यंत त्याला भाव नसतो. व्यापारी वा कंपन्यांकडे तो गेला की त्याचे मोल वाढते. भावाचे हे गणित आकलनापलीकडचे आहे.

रोखीची पिके म्हणून शेतकरी कांदा, टोमॅटो, द्राक्षांकडे पाहतात. प्राप्त परिस्थितीत टोमॅटो उत्पादक त्रस्त आहेत. कांद्याच्या कोसळत्या बाजारभावाचा अनुभव शेतकर्‍यांना नवा नाही. वर्षभरातून काही वेळा हा अनुभव शेतकर्‍यांना घ्यावाच लागतो. आंदोलने करायला शेतकर्‍यांजवळ तेवढा वेळ नसतो. शेतीकामात ते सदैव व्यस्त असतात, पण अगदीच असह्य झाल्यावर त्यांचाही नाईलाज असतो. भाव पडू लागताच शेतकरी रस्त्यांवर उतरतात. कांदा रस्त्यावर फेकला जातो. शेतकरी संघटना, शेतकरी संस्था तसेच राजकीय पक्षांची शिष्टमंडळे केंद्र आणि राज्यातील संबंधित मंत्र्यांना भेटतात. निवेदने देतात. त्यांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसली जातात.

अनिश्चित सरकारी निर्यात धोरणाने कांद्याचा वांदा नेहमी होतो. कांदा प्रश्नाचा कटू अनुभव आजवर घेणारी केंद्र व राज्य सरकारे टोमॅटो पिकाच्या कोसळलेल्या बाजारभावाबाबत तातडीने कोणता निर्णय घेतात? शेतकर्‍यांना कोणता दिलासा देतात? याची शेतकर्‍यांसह महाराष्ट्रातील जनतेला उत्सूकता आहे. सरकारला घेरण्यात, सतत सरकारवर निशाणा साधण्यातच आणि सदैव आंदोलनाच्या पवित्र्यात असण्यातच विरोधी पक्ष इतिकर्तव्यता मानतात. केवळ राजकीय मुद्द्यांवर सरकारची कोंडी करू पाहणार्‍या विरोधी पक्षांची शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत मात्र तत्परता उसळून येत नाही. निदान आता टोमॅटो भावप्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधताना केवळ नकारात्मक भूमिका घेऊन चालणार नाही.

त्याबाबत सरकारला निर्णय घेण्यास भाग पडताना सहकार्याची किमान भूमिका ते घेतील का? की सरकारची कोंडी करण्याची नामी संधी म्हणूनच फक्त त्याकडे लक्ष देत असल्याचा गवगवा करीत राहणार? कांदा भाव कोसळल्यावर शेतकर्‍यांना दिलासा म्हणून बाजार समित्यांमध्ये विकलेल्या कांद्यावर अनुदान दिले जाते. तसा काही दिलासादायक निर्णय राज्य सरकार आताही घेईल का? केंद्रसत्तेत असलेल्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाचे जागरूक नेते केंद्र सरकारला तत्परतेने साकडे घालून राज्यातील टोमॅटो उत्पादकांना मदत मिळून देतील का? राज्य सरकारवर तीरंदाजी करण्याच्या इराद्याने जनआशीर्वाद यात्रा काढणारे राज्यातील नवे केंद्रीयमंत्री दिल्ली दरबारी आपले वजन खर्च करून टोमॅटो उत्पादकांना आर्थिक मदत मिळवून देऊन त्यांचा दुवा घेतील का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com