नवशैक्षणिक पर्व :आव्हान आणि अपेक्षा

नवशैक्षणिक पर्व :आव्हान आणि अपेक्षा
कोविड संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवशैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेले आहे. यामध्ये शिक्षकांचा कस लागणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आल्यावर आनंद वाटेल, त्यांचे मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल असे उपक्रम शाळांनी आयोजित केले पाहिजेत. वेळापत्रकात आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसे प्राधान्य देता येईल हेही पाहावे लागेल. विद्यार्थ्यांची लेखन क्षमता वाढवण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. या सर्वांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून उपाययोजना व्हाव्यात.

शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचे... जडणघडणीचे मुख्य ठिकाण.... पालकांचे आधारस्थान... रिक्षा, व्हॅन, स्कूल बसचालकांचे उत्पन्नाचे (पोटपाण्याचे) साधन... संस्थाचालकांचे कृतिशीलता व नियोजनाचे ठिकाण व समाजविकासाचे केंद्र आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. आता विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक व सेवक या सर्व घटकांची खरी कसरत आणि कसोटी आहे. त्यांच्यासमोर एक आव्हान आहे. करोना वातावरणातून कधीही जाणारही नाही. त्यामुळे मुलांच्या मनात निर्माण झालेली भीती किंवा पालकांवर असलेली दहशत कमी कशी करायची आणि आपले कार्य व्यवस्थितपणे कसे सुरू ठेवायचे हे आव्हान शाळांना आता पेलायचे आहे. काय करावे लागेल यासाठी? कोणती काळजी घ्यावी लागेल? नियोजनात काय करायला हवे? कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे लागेल? किती वेळ द्यावा लागेल? अशा अनेक दृष्टिकोनातून आपल्याला यासंबंधी सखोल विचार करणे गरजेचे आहे.

शाळांसमोर पहिले आव्हान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. ती वाढवण्यासाठी सर्वात प्रथम शाळेतील सर्व घटकांनी म्हणजेच मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक यांनी सर्वेक्षण करण्याची गरज आहे. जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत हे त्यांच्या पालकांशी समन्वय साधून माहीत करून घेऊन त्यावर तोडगा काढणे आणि विद्यार्थी शाळेमध्ये कसे येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरांमधून वाहतूक, दळणवळण ही पहिली समस्या आहे. यासाठी रिक्षा, व्हॅन, स्कूल बस यांच्याशी मुख्याध्यापकांनी-शिक्षकांनी सातत्याने चर्चा करून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासंबंधी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे.

त्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजवले पाहिजेत. अनेक विद्यार्थ्यांमध्ये कंटाळा किंवा आळस निर्माण झाला असण्याचीही शक्यता आहे. तो दूर कसा करायचा याचा विचार मुख्याध्यापक व शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. अर्थात, हे साध्य करायचे असेल तर शाळेमध्ये काही गोष्टी नव्याने कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आल्यावर आनंद वाटेल, त्यांचे मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल असे काही उपक्रम शाळांनी आयोजित केले पाहिजेत. उदाहरणार्थ, विनोदी कथाकथन, उत्तम प्रकारच्या सीडी दाखवणे, यूट्यूबवर असणारे चांगले कार्यक्रम एलसीडीच्या माध्यमातून स्क्रीनवरून विद्यार्थ्यांना दाखवणे, वर्गात घेता येतील असे मानसशास्रीय खेळ घेणे, छोटे छोटे संगीताचे कार्यक्रम आयोजित करणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी देणे.

विद्यार्थी शाळेत का येतो किंवा पालक विद्यार्थ्यांना शाळेत का घालतात याचे मुख्य कारण आहे त्या विद्यार्थ्याला विविध विषयांचे ज्ञान मिळणे, विद्यार्थ्याची भाषा, गणित, समाजशास्र, विज्ञान या विषांवर प्रभुत्व मिळवणे यासाठी विद्यार्थी शाळेमध्ये येतो. हा मुख्य दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला जेवढा वेळ दिला आहे त्या-त्या वर्गावर जाऊन खणखणीत पद्धतीने शिकवले पाहिजे. कोणतीही संकल्पना किंवा घटना कानांनी ऐकून नुसते समजते. त्यापेक्षा डोळ्यांनी पाहून जास्त समजते आणि प्रत्यक्ष कृतीतून किंवा सहभागातून सर्वात चांगली समजते, हे शिक्षणाचे मूलभूत तत्त्व आहे.

ऑनलाईनच्या माध्यमामुळे विद्यार्थी या मूलभूत तत्त्वापासून दीड वर्षे वंचित आहेत. त्यामुळे वर्गात शिक्षकांनी शिकवताना काही कृती करणे, विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे, काही प्रयोग करून दाखवणे, शैक्षणिक साधनांचा वापर करणे, आपल्या पाठामध्ये रंजकता कशी आणता येईल याचा विचार करणे हे पूर्वनियोजन अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांचे शिकवणे जर प्रभावी, कल्पक, परिणामकारक आणि रंजक असेल तर विद्यार्थी आपोआप शिक्षणाकडे आकर्षित होणार आहेत. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या शालेय जीवनामध्ये शिक्षक हा कणा असणार आहे.

विषयज्ञान मिळवण्याबरोबरच विद्यार्थी शाळेमध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठीही आलेले असतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसे प्राधान्य देता येईल, यासाठी वेळापत्रकात कसा वेळ देता येईल याचाही विचार करावा लागेल. विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर तिथे त्यांची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, विशेषतः करोनावर मात करायची असेल तर योग, मुद्रा, ध्यान हे घटक रोज विद्यार्थ्यांकडून करून घेतले पाहिजेत. महात्मा गांधींनीसुद्धा जीवन-शिक्षण म्हणजेच आधी जीवन मग शिक्षण असा संदेश दिलेला आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांची तब्येत उत्तम राहण्यासाठी त्यांना आहार सवयी, आरोग्य सवयी यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करून मार्गदर्शन करणे ही आजची खरी गरज आहे. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता उत्तम प्रतीची असली पाहिजे. यासाठी शाळांना समुपदेशनाचा आधारही घ्यावा लागेल. वैयक्तिक समुपदेशन न करता सामूहिक समुपदेशनाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना नकळत सल्ले दिले गेले पाहिजेत. फक्त कोविडमुळे त्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण काही प्रमाणात झाले आहे ते आपल्याला उंचवायचे आहे.

ऑनलाईनच्या पार्श्वभूमीवरून विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. ऑफलाईन शिक्षणामध्ये शिक्षकांनी मूलभूत संबोधावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ, करोनाकाळात विद्यार्थी घरी असल्यामुळे त्यांची लेखन क्षमता कमी झालेली आहे. वर्गात रोज विद्यार्थ्यांचे लेखन घेता येईल का हे पाहावे लागेल. सर्व भाषांचे डिक्टेशन विद्यार्थ्यांना देऊन एक महिनाभर ही अनुभूती द्यावी. लेखनाचे विविध पैलू आपल्याला अध्यापनातून घ्यावे लागतील. लेखनाबरोबरच विद्यार्थ्यांची वाचन क्षमता व गणन क्षमता (कॅलक्युलेशन अ‍ॅबिलिटी) कितपत आहे याचाही अंदाज घ्यावा. या जर तीन गोष्टी विद्यार्थ्यांना उत्तम आल्या तर त्यांना सर्व विषय वाचून समजणार आहेत.

फक्त गणित आणि भौतिकशास्र याबाबतीतच आपल्याला अधिक कष्ट घ्यावे लागतील. ऑफलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईनचा अजिबातच समावेश करणार नाही, असा अट्टाहास शिक्षकांनी धरूनये. कारण इथून पुढील काळामध्ये ऑनलाईन + ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षणपद्धती सुरू राहणार आहे. ऑनलाईन शिक्षण ही एक आपल्याला मिळालेली पर्वणी आहे. या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचे ज्ञान देऊ शकतो, असा विचार शिक्षकांनी करून त्या-त्या वयोगटानुरूप काय काय शिकवता येईल, याचा अभ्यास केला पाहिजे.

प्रत्यक्ष वर्गाध्यापन करत असताना मल्टिमीडिया, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, इंटरनेट याचा वापर केला पाहिजे. तसेच गृहपाठाच्या वह्या करण्याऐवजी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या प्रश्नपेढ्या देता येतील आणि त्यांची उत्तरेही ऑनलाईन माध्यमातून मागवता येतील. अर्थात, हे सर्व करण्यासाठी शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त काही वेळ खर्ची घालावा लागेल. शिक्षकांशिवाय काहीही होणार नाही, हे शिक्षण क्षेत्रातले मूलभूत, गाभाभूत तत्त्व आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. प्रशासकीय गोष्टींतून काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील.

यातील पहिला निर्णय म्हणजे सुट्ट्यांची संख्या कमी करणे. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास मूल्यमापन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण आजपर्यंत मूल्यमापनाची परीक्षा ही एकमेव पद्धत वापरत आहोत. काही वेगळ्या पद्धती आणता येतील का, याचा विचार शासनाने करण्याऐवजी प्रत्येक शाळेने करावा. कारण प्रत्येक शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची भौगोलिक स्थिती, मानसिक स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेने आपली स्वतःची मूल्यमापन पद्धती विकसित करावी.

मूल्यमापनासाठी वर्षाखेरीस एखादी परीक्षा ठेवावी. प्रशासकीय गोष्टीतील पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवणे. लोकसहभागामधून प्रत्यक्ष विविध कला असणारे कलाकार शाळेत बोलवावेत. मनुष्यबळाचा वापर करावा, उपक्रमांसाठी निधी समाजातून उभा करावा, सीएसआर फंडांचा जास्तीत जास्त सदुपयोग व्हावा या सर्व प्रशासकीय गोष्टींवर आता शाळांनीच प्रयत्न केले पाहिजेत. या नवीन कालावधीमध्ये शासनावर फार अवलंबून राहू नये.

आपल्या शाळेतून आपल्या विद्यार्थ्यांचा विकास, जडणघडण करायची असेल तर प्रत्येक गोष्ट शासनाने द्यावी किंवा प्रत्येक निर्णय शासनाने सांगेल तसा अंमलात आणावा असा दृष्टिकोन न ठेवता शाळेने स्वतःचा आराखडा तयार करावा आणि तो अंमलात आणावा, ही कोविडने आपल्याला दिलेली शिकवण आहे.

Related Stories

No stories found.