पाल्यांशी संवाद वाढवणे गरजेचे

पाल्यांशी संवाद वाढवणे गरजेचे
तामिळनाडूत काही आठवड्यांपूर्वी ‘नीट’ परीक्षेच्या निकालाअगोदर एका परीक्षार्थीने घरातच आत्महत्या केल्याची घटना घडली. अलीकडच्या काळात किशोरवयीन आणि तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. पालकांशी विसंवाद, अपेक्षांचे ओझे, वाढता भौतिकवाद, जीवघेणी स्पर्धा या कारणांमुळे तरुणांत निराशावाद पसरत आहे. या गोष्टी थांबवण्यासाठी पाल्य-पालक यांच्यात संवाद वाढवणे नितांत गरजेचे आहे. दुर्दैवाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.

आजघडीला भारतात दररोज 31 किशोरवयीन मुले आपले कोवळे आयुष्य संपवत आहेत. ‘एनसीआरबी’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. मागच्या वर्षी 2020 मध्ये देशभरात विविध कारणांनी 11,396 अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांचे प्रमाण गेल्यावर्षीच्या (2019) तुलनेत 18 टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे आत्महत्येच्या प्रमुख कारणांपैकी प्रेमभंग हे एक कारण सांगितले जाते. दुसरीकडे मानसिक दडपणामुळेही मुले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. या विविध कारणांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्याची भावना विकसित होत आहे. अर्थात, मुलांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कशामुळे कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. हे वास्तव चक्रावून टाकणारे आहे. अर्थात, तारुण्य वय हे कोणासाठीच सोपे राहिलेले नाही. पण गेल्या काही वर्षांपासून बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विचारसरणीमुळे युवकांची किशोरावस्था ही खूपच कठीण होत चालली आहे. कमी वयातच प्रचंड यश मिळवण्याची इच्छा, जीवघेणी स्पर्धा, सहनशीलतेचा अभाव, वाढता मानसिक दबाव आदी कारणांमुळे किशोरवयीन मुले नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. शेवटी ते आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत.

आत्महत्या ही एक खासगी बाब नाही, हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे. समाजशास्त्रज्ञ दुर्मिख यांनी यावर संशोधन करून काही तथ्ये समाजासमोर आणली आहेत. समाजात अशी काही परिस्थिती निर्माण होते की, एखादा व्यक्ती आपले आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त होतो. जेव्हा समाजात भावनांचा अतिरेक होतो तेव्हा संबंधित व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडतो. अतिप्रेमामुळे जेव्हा स्वत:चे अस्तित्व कमी होऊ लागते किंवा अतिदबावामुळे आपल्या स्वप्नाला कोणताही थारा मिळत नसल्याचे जाणवू लागते तेव्हा या दोन्ही परिस्थिती आत्महत्येला कारणीभूत ठरू शकतात. हे संशोधन आजच्या काळाला तंतोतंत लागू पडते. किशोरवयातील मुले प्रेमासारख्या गंभीर नात्यात का अडकत आहेत, असाही प्रश्न निर्माण होतो.

गेल्या काही दशकांत समाजरचनेत व्यापक बदल झाले आहेत. महानगरांतील पालकवर्गात आपल्याच विश्वात मश्गुल राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. विशेषत: चांगले जीवन जगण्याच्या ओढीने आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांचे एकाकीपण वाढत चालले आहे. प्रेम ही एक स्वाभाविक वृत्ती असून किशोरावस्थेतून जाणारा मुलगा जेव्हा प्रेम आणि ममत्त्वाला पारखा होतो तेव्हा तो प्रेम आणि सहवास घराबाहेर शोधतो. विशेषत: आपल्या मित्रांच्या गटात.

किशोरवयात मुलींबद्दलचे आकर्षण वाढणे ही सामान्य बाब आहे. पण काहीजण याच आकर्षणाला प्रेम समजू लागतात. पालकांकडून न मिळणारे प्रेम तो मैत्रिणीत शोधतो आणि इथेच सर्व गडबड होते. अशा स्थितीत पालकांकडून जेव्हा विरोध होतोे तेव्हा पाल्य बंडाच्या मूडमध्ये असतो तर काहीवेळा आत्महत्येसारखा भयंकर मार्गही निवडतो. यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की, लहान मुले एवढे तणावाखाली का वावरत आहेत? पालकांचा कमी झालेला संवाद हे मुलांवरील वाढत्या मानसिक ताणाचे प्रमुख कारण आहे. त्याचवेळी मुलांच्या भवितव्याबद्दल गरजेपेक्षा अधिक संवेदनशील राहणेदेखील मुलांना नैराश्यात लोटणारे आहे.

निराशा, चिंता यांसारख्या संवेदनशील गोष्टीवर सतत विचारमंथन करणार्‍या जगाला नैराश्य हे अचानक आणि एकाएकी येत नाही, हे ठाऊक नाही का? असा प्रश्न पडतो. त्याची सुरुवातच लहानपणापासून झालेली असते आणि ती वयापरत्वे वाढत जाते. नोकरदार पालक हे मुलांना पुरेशा प्रमाणात वेळ देऊ शकत नाहीत. विविध माध्यमातून मुलांवर प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याची वृत्ती बळावली आहे. या वृत्तीला समाजशास्त्रज्ञ ‘हेलिकॉप्टर पॅरेटिंग’ अशी उपमा देतात. ही स्थिती मुलांना नैराश्याकडे नेणारी ठरते. जे नाते भावनेवर, विश्वासावर आधारलेले आहे तेथेच यांत्रिकीपणा येऊ लागल्याने मुलांचा आत्मविश्वास ढासळत चालला आहे. सतत अभ्यासाचा ताण हा मुलांत चिंता आणि तणावाची गंभीर स्थिती निर्माण करत आहे. मुलगा/मुलगी झाल्यास स्वप्नांचे मनोरे उभे केले जातात.

या स्वप्नात मुले अडकली जातात आणि तो या स्वप्नाखाली आयुष्यभर दबून राहतो. प्रत्येक मुलगा पालकांची इच्छा पूर्ण करतोच असे नाही. त्यामुळे पालकांची राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा ताण मुलांवर मानसिक आणि भावनिक दबाव टाकतो. अपयशाच्या भीतीने पालकांचे स्वप्न मोडण्याची भीती पाल्याला आपल्या आयुष्यापेक्षा मोठी वाटू लागते. पालकांच्या अपेक्षेला आपण उतरू शकलो नाही, याचे शल्य त्याच्या मनाला टोचत राहते. त्यामुळे जीवन संपवणे हाच त्याला चांगला मार्ग वाटू लागतो. अलीकडच्या काळात एकाकीपणाची पार्श्वभूमी वाढू लागल्याने मुलांतील नैराश्याची भावना ही मागील पिढीच्या तुलनेत अधिक संवेदनशील असल्याचे दिसून येते.

स्वप्न पूर्ण होत नसल्याच्या या प्रक्रियेत जीवन संपवण्याशिवाय पर्याय नाही, असाच त्यांच्या मनात विचार येऊ लागतो. आत्महत्या वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे वाढता भौतिकवाद. पाल्यांना सुख आणि सुविधांची सहजासहजी उपलब्धता करून देणेदेखील पालकांना अडचणीचे ठरत आहे. सर्व काही आलबेल असल्याने एखाद्या त्रासाचा किंवा अपयशाचा सामना ते सहजासहजी करू शकत नाहीत. एकुणातच स्वप्न आणि वास्तव याचा मध्यम मार्ग म्हणजे धैर्य आणि सकारात्मक विचार होय. त्यातही भावनिकदृष्ट्या खंबीर असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला भावी पिढीला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवायचे असेल तर भावनिकदृष्ट्या सक्षम राहण्याबरोबरच पाल्यांशी संवाद ठेवणे गरजेचे आहे.

मुलांत निर्माण केलेला आत्मविश्वास आणि प्रेम हे त्यांना भरकटण्यापासून थांबवते. हा भरकटलेपणा आणि एकाकीपणा रोखणे हाच आत्महत्या थांबवण्याचा एकमेव परिणामकारक उपाय आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com