गरज आधुनिक शिक्षकांची

गरज आधुनिक शिक्षकांची

शुभांगी कुलकर्णी,

समाजशास्त्र अभ्यासक

एका अंदाजानुसार देशात आणखी साडेसहा लाख शिक्षकांची गरज आहे. पण हे शिक्षक केवळ पारंपरिक पद्धतीने अभ्यासक्रम शिकवणारे असून चालणार नाहीत. ते अद्ययावत असतील तरच या शिक्षकांच्या बळावर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये वाढणारे शैक्षणिक नैराश्य आणि उदासीनता दूर करता येईल. नव्या युगातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासासासाठी आधुनिक शैलीचे अनुकरण करणारे शिक्षकच सहाय्यभूत ठरतील.

शिक्षण हा एक संस्कार मानला तर त्या संस्काराचा मुख्य शिल्पकार शिक्षक आहे. सद्विचार, सदाचार, सद्गुण, सद्भावना आणि समुपदेशन यांचा एकत्रित मिलाफ म्हणजे शिक्षक. संपूर्ण समाजाची प्रेरणा, प्रोत्साहन आणि धारणाही शिक्षक आहे. ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजनिष्ठा या सर्वांचे प्रतीक म्हणजे शिक्षक आहे. ज्ञानाची सखोलता, विचारांमधील कल्पकता, वागण्यातील नम्रता, वेळप्रसंंगी असणारी दक्षता, कठीण प्रसंगी आवश्यक असलेली निर्भयता आणि चेहर्‍यावर सतत असलेली प्रसन्नता म्हणजे शिक्षक होय. उद्याचा देश घडवणारे विद्यार्थी तयार करण्याचे प्रमुख शिल्पकार म्हणजे शिक्षक आहेत.

सद्यस्थितीमध्ये शिक्षणप्रक्रिया व शिक्षक यांचा विचार केला तर थोडीशी निराशाजनक परिस्थिती दिसून येते. करोनाकाळात शालेय आणि महाविद्यालय शिक्षण हा कळीचा मुद्दा ठरला. प्रामुख्याने देशात शालेय शिक्षणासंदर्भात एक व्यापक मंथन झाले आणि ते म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मचे वर्ग हे प्रत्यक्षातील वर्गाला पर्याय ठरू शकतात का? करोना संकट ओसरल्यानंतर आजही अनेक कोचिंग क्लास आणि शाळा याच तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण देण्याचे काम करत आहेत. दुर्गम भागात शाळा उभारणे, तेथे शिक्षकांची नियुक्ती करणे, शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, देशातील विषम हवामानाच्या वातावरणात शाळा चालवणे यांसारख्या आव्हानांचा विचार केल्यास एका मुलाला गॅझेटच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण हे प्रभावी वाटते, त्याचवेळी आर्थिक रूपानेदेखील उपयुक्त वाटते.

भारतात आर्थिक आणि सामाजिक समीकरण बदलत आहे. जात-समाज-लिंग यांच्याबाबत असणारा भेदाभेद कमी होत आहे. त्याचवेळी शिक्षणात होणारा बदल हे रोजगाराचे साधन ठरत आहे. अशावेळी आपली शिक्षणपद्धती किंवा शाळा या अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि मूलभूत प्रश्न निकाली काढणे यात अडकलेले दिसते.

मुलांसाठी शिक्षण ही एक अध्यापनाची प्रक्रिया असून एकाकडून प्रश्न अणि दुसरीकडून देण्यात येणारे उत्तर यावरून मुलांची पात्रता निश्चित केली जाते. मग हा मुलगा कशासाठी पात्र आहे? समाजात राहण्यासाठी, निसर्गाचे आकलन करण्यासाठी, रोजगार किंवा असाच एखादा मूलभूत प्रश्नांचा सामना करण्यासाठी तो पात्र आहे का? याचे उत्तर नाही असे आहे.

ज्या देशातील मोबाईल कनेक्शनची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आसपास पोहोचत असेल, ज्या ठिकाणी लहान मुलेच नाही तर 12 वर्षांच्या मुलांसाठीदेखील मोबाईल हे शालेय दप्तराप्रमाणेच अनिवार्य होत असेल तर तेथे मुलांना डिजिटल साक्षरता, सर्जनशीलता, ओळख, सामाजिक कौशल्य आणि जिज्ञासाची गरज आहे. अर्थात, शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोबाईलचा वापर हा एकप्रकारे अडथळा मानला जातो. कुटुंबातील मंडळीदेखील शक्य तेवढ्या प्रमाणात देखरेख ठेवत शैक्षणिक गरज म्हणून मुलांच्या हाती मोबाईल सोपवतात. वास्तविक स्वस्त डेटामुळे हाती येणारा मोबाईलचा वाढता वापर हा स्वत:ला शिक्षक समजल्या जाणार्‍यांसाठी धोक्याची घंटा आहे. मुलांनी मोबाईल कसा वापरावा याचे कोणतेही शास्त्रोक्त माहिती देणारे पुस्तक आपल्याकडे नाही.

भारतात शिक्षणाचा अधिकार आणि अन्य कायद्यांच्या आधारे मुलांची वाढती पटसंख्या आणि साक्षरतेचा वाढता दर हा खरोखरच उत्साहवर्धक आहे. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विषय येतो तेव्हा हाच आकडा आपल्याला अंतर्मुख करायला लावतो. कारण आजही आपल्याकडे सुमारे सहा लाख शिक्षकांची गरज आहे. सध्याचे शिक्षक हे त्यांना अभ्यासक्रम शिकवण्याची दिलेली जबादारी पार पाडणे हीच ड्युटी किंवा कर्तव्य समजतात. यापैकी काहीजण नवीन संकल्पना मांडतात. मात्र त्यांनाही व्यवस्थेकडून सहकार्य मिळतेच असे नाही.

आजच्या शाळेतील माध्यान्ह भोजन असो किंवा शिष्यवृत्ती असो प्रत्येक ठिकाणी डिजिटल साक्षरतेची गरज भासत आहे. आपण वर्गात शिकतो की, गाय हंबरडा फोडते आणि सिंह डरकाळी फोडतो. कोणताही शिक्षक या सर्व गोष्टी मोबाईलवर मुलांना दाखवून कमी शब्दांत शिकवू शकतो. मोबाईलवर सर्च इंजिनचा वापर करत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली साधने, शाळेत शिकवण्यात येणारे स्थान, ध्वनी, रंग, चित्र याचा शोध आणि बोध याचा समावेश प्राथमिक शिक्षणात करायला हवा. कोणत्याही दृश्याला व्हिडिओच्या रूपातून सुरक्षित ठेवणे ही कला आहे. विविध पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करणे हे शिक्षकांसाठी एखादा अभ्यासक्रम परिणामकारक ठरण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. दुर्दैवाने आपले डिजिटल गॅझेट केवळ व्यवहार, परिवहन एवढेच नाही तर ओळख पटवण्यासाठी बंधनकारक होत आहे. शिक्षणात अपवादानेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

आजघडीला देशात सहा लाखांपेक्षा अधिक शिक्षकांची गरज आहे आणि ते माहिती युगात विद्यार्थ्यांना विकसित करण्यास मदत करतील, अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत मुलाने स्वत:च निर्माण केलेले अनुभवी जग, मुलांचे ज्ञान, मुलांचा स्वत:चा अनुभव याला कोणतेही स्थान नाही आणि त्यास काही अर्थ नाही. अशावेळी डिजिटल साक्षरतेच्या उद्देशातून करण्यात येणारे प्रयोग हे दररोज नवीन काहीतरी करण्याच्या उत्साहापोटी मुलांना शाळेकडे येण्यास प्रोत्साहित करणारे आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com