बहुरंगी, सालस!

बहुरंगी, सालस!

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे अपघाती निधन झाले आणि ती बातमी देण्याची वेळ प्रदीपवर आली. त्यावेळी त्याने दाखवलेले संयत स्वरुपाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या एकंदर स्वभावाला साजेसे होते. शेवटी प्रदीप भिडे हा प्रदीप भिडे होता. त्याची कामावर विलक्षण निष्ठा होती. असा प्रदीप माझ्या उर्वरित आयुष्यात होईल की नाही हे माहीत नाही.

काय दुर्दैव आहे पाहा, ज्यांनी आम्हाला श्रद्धांजली वाहायची त्यांच्यापैकी प्रदीप भिडे या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी योग आमच्यावर आला आहे. यासारखे दुसरे दुर्भाग्य नाही. प्रदीप गेल्याचे अतीव दु:ख वाटते. एक सज्जन, मनमिळावू माणूस, वृत्तनिवेदक म्हणून असणारी हुकूमत, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची क्षमता, परमेश्वराने वरूनच रंगरंगोटी करून, तयार करून एक वृत्तनिवेदक सादर करावा असे वाटणारी एकूण बैठक, सदासर्वकाळ हसतमुख आणि कधीही न दुर्मुखलेला असा हा सवंगडी गेल्याचे दु:ख हे आपणा सर्वांनाच आहे, यात शंका नाही.

तो काहीकाळ पुण्याजवळच्या हडपसर भागामध्ये राहिला. काहीकाळ पुण्यात राहिला आणि बरीच वर्षे मुंबईत राहिला. सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे ‘रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा...’ अशा प्रवृत्तीने वावरणारा आमचा हा सहकारी गेली काही वर्षे कर्करोगासारख्या दुर्धर दुखण्याने आजारी होता. प्रदीपसारखा हरहुन्नरी मित्र आणखी दहा-पंधरा वर्षे सहज जगू शकला असता आणि असंख्य चाहते निर्माण केले असते. पण म्हणतात ना ईश्वराच्या इच्छेपुढे कोणाचेच काही चालत नाही.

दूरदर्शनच्या वृत्तविभागाला कोणाची तरी दृष्ट लागली की काय कोणास ठाऊक? काही वर्षांपूर्वी पुढे अभिनेत्री म्हणून नाव कमावणारी स्मिता पाटील अचानक आपल्यातून निघून गेली. (वाचक मित्रांनो, कदाचित आपला विश्वास बसणार नाही पण एक दिवस जीन्स आणि टी-शर्ट घालून अचानक आलेली स्मिता ही उत्तम वृत्तनिवेदिका होऊ शकते असे वाटल्यामुळे मी तिला कॅमेर्‍यासमोर उभे केले आणि तिच्यातले अलौकिक गुण लोकांच्या लक्षात आले. स्मिताचे वैशिष्ट्य असे की ती मराठी तर उत्तम वाचायचीच पण हिंदी बातम्याही सुरेख पद्धतीने सादर करायची. अधूनमधून इंग्रजीतही बातम्या वाचायची.) स्मिता गेली, खूप मोठी अभिनेत्री होऊन गेली. दूरदर्शनच्या वृत्तविभागावर कोसळलेले ते पहिले संकट होते. आणखी काही वर्षे गेली आणि भक्ती बर्वे नावाची तितकीच देखणी, उत्तम शब्दोच्चार असणारी आणि मान्यवर अभिनेत्री म्हणून लौकिक मिळवणारी निवेदिका एका अपघातात अचानक मृत्यू पावली आणि मराठी वृत्तविभागावर दुसरे संकट कोसळले. आणखी काही वर्षे गेली आणि तितकीच देखणी चारुशीला पटवर्धन नावाची वृत्तनिवेदिका अचानक पडद्याआड गेली. ही सारी दु:खे कमी होती म्हणून की काय, स्मिता तळवलकरसारखी अतिशय समृद्ध, उत्तम वाणी, देखणेपण आणि प्रसार माध्यमांवर हुकूमत असणारी लोकप्रिय वृत्तनिवेदिका आपल्यातून निघून गेली.

या सहकार्‍यांबद्दल दु:ख वाटते, याचे प्रमुख कारण म्हणजे या सगळ्या वृत्तनिवेदिका आणि प्रदीप भिडेसारखा वृत्तनिवेदक वृत्तविभागाची शान होते. इतके चांगले वाचन, वाणीवरचा इतका चांगला संस्कार, वाक्याची समज आणि मुख्य म्हणजे आपण वाचत असलेल्या बातम्या हजारो लोक ऐकणार आहेत, तेव्हा त्या कशा तरी वाचून न टाकता वाचनाची आवश्यक ती गती पकडून तसेच त्यातला भावार्थ लक्षात घेऊन बातम्या वाचण्यात ही सगळीच मंडळी निष्णात होती. गेलेली ही पाचही रत्ने पुन्हा येणार नाहीत आणि ती मराठी वृत्तविभागाला पुन्हा एकदा झळाळीही प्राप्त करून देणार नाहीत!

प्रदीप भिडे हा या पाचही जणांपैकी एक उत्तम निवेदक होता. तो सूत्रसंचालकही होता. तो देखणा तर होताच होता. भरपूर उंची, नाकीडोळी नीटस, स्पष्ट शब्दोच्चारामुळे या चारही जणींबरोबर प्रदीप भिडेही कायम स्मरणात राहील. ही पाचही माणसे सुरेख होती, असे मी म्हणतो कारण त्यांच्यावरील संस्कार चेहर्‍यावर आणि त्यांच्या पडद्यावरील उपस्थितीवर ठळकपणे दिसत. ही सगळी मंडळी पदवीधर होतीच; विशेषत: प्रदीप अतिशय उत्तम प्रकारचे शिक्षण-प्रशिक्षण घेतलेला वृत्तनिवेदक होता. तो दूरदर्शनच्या पडद्यावर मोकळेपणाने आणि सहजतेने वावरत असे, तितकाच रंगमंचावर सूत्रसंचालन करतानाही वावरताना दिसत असे. थोडक्यात सांगायचे तर सहजता हीच त्याची जमेची बाजू होती.

या ठिकाणी आणखी एक बाब नमूद करावीशी वाटते ती अशी की, विख्यात नाटककार श्री. ना. पेंडसे यांनी मुंबईतल्या साहित्य संघासाठी लिहिलेल्या ‘पंडित! आता तरी शहाणं व्हा!’ या विहंग नायक या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या नाटकात प्रदीप नायकाचे काम करायचा. त्या नाटकात जुईली देऊस्कर, लक्ष्मीकांत बेर्डे, दिनानाथ टाकळकर अशी एकापेक्षा एक सरस अभिनेते मंडळी होती. प्रदीपला नाटकात त्यामानाने काम कमीच होते, पण त्या छोट्या भूमिकेतही तो आपली छाप पाडून जायचा. प्रदीप पत्रकार होता, निवेदक होता, सूत्रसंचालक होता. मुंबईत स्वत:चा ऑडिओ स्टुडिओ चालवून रेकॉर्डिंग करणारा होता. काहीकाळ त्याने ‘ई-मर्क’ या अमेरिकन कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले होते. प्रदीप खरोखरीच जनसंपर्कातला बादशहा होता. याचे कारण आमच्या तीस-पस्तीस वर्षांच्या सहवासात त्याने कधीच कोणाशी आवाज चढवून बोलल्याचे मी बघितलेले नाही. त्याच्यावर रयत शिक्षण संस्थेत काम करणार्‍या आई-वडिलांच्या शिक्षकी पेशाचा फार मोठा प्रभाव होता. तो विलक्षण नम्र होता. मानापमानाच्या त्याच्या कल्पना इतर जनसामान्यांप्रमाणे टोकदार नव्हत्या. त्याच काळात पुढे ‘कृष्ण’ या भूमिकेमुळे नावारूपाला आलेला नितीश भारद्वाज हादेखील बातम्या वाचायचा. एकूणात काय तर प्रदीपचे स्मरण करताना तो सगळा काळ आठवतो आणि ही सगळी सुसंस्कृत मंडळी वृत्तविभागात होती याचा आजही आनंद आणि अभिमान वाटतो.

प्रदीपचे आई-वडील दोन-चार वेळा दूरदर्शन केंद्रात आले होते. मुळात रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारात वाढलेले हे दाम्पत्य अत्यंत साध्या राहणीचे होते. प्रदीपची राहणीही तशीच साधी होती. त्याची पत्नी आणि तो असे दोघे मिळून मुंबईत साऊंड स्टुडिओ चालवायचे. प्रदीपला एक भाऊ आहे. प्रदीपचे सासरे लग्नापूर्वीपासूनच त्याच्यावर नितांत प्रेम करत. एकुलत्या एक कन्येबरोबर प्रदीपचा विवाह झाला त्यावेळी काय किंवा प्रदीपच्या मुलाचे लग्न झाले तेव्हा काय...आम्ही दूरदर्शनमधले काही लोक सोहळ्याला हजर होतो. प्रदीपचे नाव मोठे होते, तो सेलिब्रिटी होता पण तरीही त्या लग्नकार्यामध्ये डामडौल, पैशाची उधळपट्टी दिसली नाही. याचे कारण त्या सार्‍या कुटुंबावर प्रगल्भ विचार आणि मूल्यांचा पगडा होता. मुंबईत वावरतानाही एखाद्या टपरीवर चहा पिण्याची प्रदीपची नेहमीच तयारी असे. त्याला कुठलीही घमेंड नव्हती. एक प्रसंग आवर्जून आठवतो. तो म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे अपघाती निधन झाले आणि ती बातमी देण्याची वेळ प्रदीपवर आली. त्यावेळी त्याने दाखवलेले संयत स्वरुपाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या एकंदर स्वभावाला साजेसे होते. शेवटी इतकेच म्हणेन की, प्रदीप भिडे हा प्रदीप भिडे होता. त्याची कामावर विलक्षण निष्ठा होती. असा प्रदीप माझ्या उर्वरित आयुष्यात होईल की नाही हे माहीत नाही. म्हणूनच माझ्यापेक्षा तरुण असणार्‍या प्रदीपला श्रद्धांजली वाहताना माझा आवाज थरथरतो आहे, कातर होत आहे. त्याला भावपूर्ण आदरांजली...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com