कन्हैयाकुमारची मुत्सद्दी खेळी की हाराकिरी ?

कन्हैयाकुमारची मुत्सद्दी खेळी की हाराकिरी ?
युवक नेते अजूनही काँग्रेसकडे (Congress) आकर्षित होतात हे कन्हैया-मेवाणीच्या (Kanhaiya-Mewani) पक्षप्रवेशावरून (Party entry) स्पष्ट होते. मात्र काँग्रेसमधले प्रस्थापित नेते त्याला कितपत स्वीकारतात, आक्रमक स्वभावामुळे कन्हैया काँग्रेसमध्ये बस्तान बसवतो का? हे काळच सांगेल. या दोन नेत्यांना काँग्रेसचे हुकमी व्यासपीठ मिळाले आणि काँग्रेसला दोन आक्रमक नेते मिळाले हे मात्र नक्की.

कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि लोकसभेचे पराभूत उमेदवार असलेले कन्हैयाकुमार आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ज्यांच्या पिढ्या कॉँग्रेसमध्ये गेल्या ते कमलापती त्रिपाठी यांचे नातू भाजपमध्ये प्रवेश करत असताना उत्तर प्रदेशचे जितीन प्रसाद आणि मध्य प्रदेशमधले ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपवासी होऊन मंत्रीही झाले. इकडे पंजाबमध्ये जे काही घडले त्याचा जाब कोणाला विचारायचा? असा प्रश्न पडावा अशी काँग्रेसची केविलवाणी स्थिती झाली आहे. वास्तविक तुमचे स्थान अबाधित आहे, काही काळजी करू, नका असे आश्वासन सोनिया गांधी यांनी कॅ. अमरिंदर सिंग यांना दिले होते. त्यामुळे आश्वस्त झालेल्या अमरिंदर सिंग यांना धक्का बसला तो काँग्रेस आमदारांच्या बैठकीचे आयोजन झाल्याचे बाहेरून कळल्यानंतर. अमरिंदर यांना डावलून प्रदेशाध्यक्ष झालेल्या सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या जातील, असे जाहीर केल्याने पक्षात दुफळी माजली. आता अमरिंदर भाजप नेत्यांच्या भेटी घेत आहेत तर सिद्धूंनी राजीनामा देऊन पंजाबमधल्या राजकीय संकटात भर घातली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नगण्य, मध्य प्रदेशमध्ये प्रखर विरोधकांची भूमिका बजावता येत नाही, गुजरातचे प्रभावी असलेल्या राजीव सातव यांच्या निधनानंतर ती जागा भरायचे भान नाही, यातच सर्व काही आले. त्यात जी-23 मधल्या नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वावरील प्रहार सुरूच ठेवले आहेत. त्यांच्याशी संवाद साधता येत नाही किंवा तो साधायचा नाही, ही काँग्रेस नेतृत्वाची मानसिकता आहे.

या पार्शवभूमीवर कन्हैयाकुमार आणि जिग्नेश मेवाणी आपापला पूर्व इतिहास घेऊन काँग्रेसचे वर्तमान, भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, विचारधारा समृद्ध करण्यासाठी काँग्रेस प्रवेश करते झाले. भारतीय जनता पक्षाच्या 24 बाय 7 आक्रमकतेला ते किती उत्तर देतील आणि पक्षाला आलेली मरगळ कशी दूर करतील, हे आता पाहावे लागणार आहे. केरळमध्ये करबुरी, पंजाबमध्ये सुंदोपसुंदी, पश्चिम बंगालमध्ये उदासी, मध्य प्रदेश-महाराष्ट्रात निष्प्रभ, याआधी काँग्रेसमध्ये दाखल झालेले गुजरातमधील हार्दिक पटेल नाराज, सरकारला कोंडीत पकडण्याच्या व्यूहरचनेचा अभाव, यातच पक्षनेतृत्वाची धुरा हंगामी अध्यक्षांच्या खांद्यावर. या अवस्थेत कन्हैया-जिग्नेश काँग्रेसमध्ये येत आहेत.

प्रवेश करताना कन्हैयाकुमारने सबसे बडी लोकतांत्रिक पार्टी अशा शब्दात काँग्रेसचा गौरव केलाच, पण काँग्रेस नही बचेगा तो देश नही बचेगा, अशी भविष्यवाणीही केली, मात्र काँग्रेसला कोण मारतेय, कोण संपवतेय याचे स्पष्टीकरण मात्र टाळले. या धामधूमीत 18 जुलैला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार्‍या नवज्योतसिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा पाठवून दिला. किसी का व्यक्तीत्व गिराकर मै समझोते नही करना चाहता, पंजाबके भविष्य के साथ कोई समझोता नही, अशा शब्दांत त्याने काँग्रेसवर टीका केली.

आता प्रश्न असा आहे की, काँग्रेसमध्ये येताना कन्हैयाकुमार आणि मेवाणी यांनी पक्षप्रवेशावेळी कोणता समझोता केला, त्याचे उत्तर दिले असते तर बरे झाले असते. 2014 पासून देश संकटात आहे, असे सांगायला कन्हैयाकुमार विसरला नाही. त्यामुळे देशाची पारतंत्र्यापासून मुक्तता करण्याची कामगिरी नियतीने आपल्यावर सोपवली असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात कन्हैयाने आपले कसब पणाला लावले. काँग्रेस कार्यालयाबाहेरही त्याच्या नावाचे मोठी पोस्टर्स लावून काँग्रेसने त्याला हातभार लावला. कन्हैयाला प्रथम प्रसिद्धी मिळाली ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाल्यावर. याआधी 2019 मध्ये बेगुसराय येथून त्याने निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये भाजपच्या गिरीराजसिंग यांनी साडेचार लाख मतांनी त्याचा पराभव केला. खरे तर ही जागा याआधी कम्युनिस्ट पक्ष लढवत होता. याअगोदर सहावेळा ही जागा कम्युनिस्ट पक्षाने जिंकली होती. त्यामुळे कन्हैयाकुमारचा एवढा दारूण पराभव का झाला अशी विचारणा भाजप नव्हे तर कम्युनिस्ट पक्षाचे नेते करत आहेत.

कम्युनिस्ट नेते डी. राजा यांनी तर कन्हैयाचा विचारसरणीवर विश्वास नाही, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी त्याने हे पाऊल उचलले, अशी टीका केली. कन्हैयाकुमारच्या उत्पन्नाचा स्रोत फारसा माहीत नाही. बिहार से तिहार या पुस्तकाच्या विक्रीतून आपला चरितार्थ चालतो, असा दावा तो करत असतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कन्हैयाने मोठा गोंधळ घातला. त्या कार्यक्रमादरम्यान आपण कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत, असे कन्हैया सांगतो. मात्र तरीही देशद्रोहाच्या कलमाखाली अटक होण्यापासून कन्हैया आणि त्याचे समर्थक वाचू शकले नाहीत.

कन्हैयाने काही महिन्यांपूर्वी जनता दल युनायटेडमध्येही (जेडीयु) आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करून पाहिला. अशोक चौधरी यांच्यासारख्या कसलेल्या नेत्याबरोबर बैठकाही केल्या. मात्र तिथे त्याची डाळ काही शिजली नाही. अर्थात, याचा कन्हैयाने इन्कारही केला. याच अशोक चौधरी यांनी एलजेपी आणि बीएसपीमधले अनेक नेते जेडीयुमध्ये खेचून आणले होते. त्यांच्या आणि कन्हैयाच्या भेटीगाठी बिहारच्या हवापाण्याविषयी नव्हत्या हे स्पष्ट आहे. याकाळात शिस्तबद्धतेबद्दल प्रसिद्ध असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने आपल्या पदाधिकार्‍याबरोबर गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेऊन कन्हैयाची निंदा करणारा ठरावही मंजूर केला. 2019 मध्ये निवडणूक लढण्यासाठी पैसे द्या, असे म्हणत त्याने गोळा केलेल्या पैशांबद्दल कम्युनिस्ट पक्षाने जाहीर टीकाही कली.

आरजेडीच्या तेजस्वी यादव या समवयीन नेत्याने कन्हैयाचे आरजेडीत प्रवेश करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. खरे तर कम्युनिस्ट पक्षाने कन्हैयाला खूप मोठी संधी दिली. पण कार्यकर्त्यांमध्येही कन्हैयाबद्दल नाराजी होती. कन्हैयाविरुद्ध बेगुसरायमध्ये आरजेडीने जाणीवपूर्वक उमेदवार उभा केला. त्याचवेळी आराममध्ये कम्युनिस्टांना मदत करण्यासाठी आरजेडीने उमेदवार दिला नाही. सर्वच पक्षांसाठी कन्हैया डोकेदुखी ठरतोय का, हेही तपासावे लागेल. 2004 मध्ये एआयएसएफच्या व्यासपीठावरून राजकारणात प्रवेश करणार्‍या कन्हैयाने इप्टासाठी काही नाटकांमध्येही काम केले आहे.

मात्र युवक नेते अजूनही काँग्रेसकडे आकर्षित होतात हे कन्हैया-मेवाणीच्या प्रवेशावरून स्पष्ट होते. कन्हैयाचे काँग्रेसमध्ये बस्तान बसते का, की त्याची सिद्धूच्या वाटेवरून वाटचाल होते हे बघावे लागेल. काँग्रेसमधले प्रस्थापित नेते त्याला कितपत स्वीकारतात आणि कामाचे स्वातंत्र्य किती देतात यावर कन्हैयाचे काँग्रेसमधले अस्तित्व अवलंबून असेल. स्वभावामुळे कन्हैया काँग्रेसमध्ये बस्तान बसवतो की स्वतंत्र पक्ष काढण्याचा मार्ग स्वीकारतो हे काळच सांगेल. या दोन नेत्यांना काँग्रेसचे व्यासपीठ मिळाले आणि काँग्रेसला दोन आक्रमक नेते मिळाले एवढाच या घटनेचा सध्याचा अर्थ.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com