शब्दगंध : जाणे अजु मी अजरु

शब्दगंध : जाणे अजु मी अजरु

नाशिक | हभप माधवदास राठी

कोविड-19 महामारीच्या काळात वास्तव जास्त तीव्रतेने आपल्याला जाणवते. ज्याचा आपल्याला भरवसा वाटतो तो देह, सत्ता, पैसा, अधिकार, शिक्षण, परिवार, मित्र, आप्तस्वकीय, मर्दुमकी, संपत्ती, धार्मिक व सामाजिक स्तरावरील आपले अस्तित्व हे सर्व क्षुल्लक, निरर्थक व अनुपयोगी ठरताना आपण अनुभवित आहोत. काही केल्या माणसांना करमत नाही. कारण ते सुख बाहेर शोधत आहेत. ज्ञानोबाराया म्हणतात..अंतर्मुख झाल्याशिवाय स्थिरता-आनंद व अभय स्थिती प्राप्त होत नाही.

भक्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वत:।

ततो माम् तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ 55 श्लोक॥

माझा भक्त, अद्वय भक्तिद्वारा मला स्पष्ट रूपाने जाणतो. माझे व्यापक स्वरूप हे एकमेव, अद्वितीय असून त्याचे आत्मरूप व ‘मी’ परमात्मा एकच आहे. ‘हे’ मातृत्व त्याला ज्या ज्ञानाने बोधाने आले ती जाणीवही, ज्ञानही मीच आहे, असे तो जाणतो.

‘परमात्मा’ म्हणजे ‘मी’ अजन्मा, जन्मविरहीत, अजरु म्हणजे वृद्धावस्थादि अवस्थारहीत, क्षय न पावणारा अक्षय्य व कधीही न सरणारा - संपणारा अक्षर-अविनाशी आहे. चलनवलनरहीत - स्थिर असा कधीही अवनत न होणारा अच्युत असा, अंतर्विरहित अनंत, एकमेवाद्वितीय भेदरहीत सर्वांच्या अगोदरचा आरंभीचा आद्य असा, प्रकट-साकार-व्यक्त न होणारा निराकार व दृश्यमान, प्रकट नाम रुपादि गुणांनी प्रकट होणारा व्यक्त साकार आहे.

नियमन केला जाणारा व नियंत्रण करणारा ईश्वर हाच आहे. आरंभरहीत-पूर्वीपासून विद्यमान असणारा व कधीही मृत्यू-नाश नसणारा अमरही ‘परमात्मा’च आहे. तोच सर्वांना अभयरूप-भयरहीत करणारा व आधारभूत अधिष्ठानरूप व आधेय म्हणजे आधारित - अवलंबून असणाराही तोच आहे.

सर्वांचा स्वामी - मालक-नियंता तोच नित्य- कायमस्वरुपी जसा आहे तसाच सहज अकृत्रिमपणाने-नैसर्गिक रूपाने अखंडरूपाने जे दिसते व दिसत नाही ते सर्व असे सर्वांमध्ये सूक्ष्म रूपाने सर्वगत राहून सर्वांच्याही पलीकडे अतीत असा तोही ‘मी’च आहे. दिसणारे नवनवीन व अनाकलनीय प्राचीनाहून प्राचीन असा काहीच नाही असा शून्य व असणारे संपूर्ण स्थूल-दृगोचर असे व अणूएवढेदेखील जे जे काही ‘ते’ मी अर्थात परमात्माच आहे.

क्रियाकारित्व भावशून्य अक्रिय असा एकच संग व शोक, दु:खरहीत, व्यापला जाणारा व व्यापून घेणारा असा सर्वांमध्ये उत्तम पुरुष तो ‘मी’च अर्थात परमात्मा।जो ध्वनिरहित-शब्द-वर्णनरहीत, श्रोचादि इंद्रियशून्य रूप गुणादिविरहित अरुप व गोत्र-वर्ण-आश्रमरहित असा कोणताही कूल-गोत्रादित जन्माला न आलेला, सर्वत्र सम-एकरूपाने राहणारा, स्वत:चे विशिष्ट तंत्र-व्यवस्था असणारा, ब्रह्म म्हणून निर्देशित केला जाणारा, परमात्मा तो परेहून पलीकडे असणारा ‘मी’च आहे.

असे ‘एकमेव’ असणारा मला आत्मत्वने अद्वय भक्तिद्वारा शुद्ध-निखळ स्वरुपाने जाणून ती जाणीव ही ‘मी’च व माझी आहे. अर्थात ज्ञातृज्ञेयाविहिन। नुसधे जे ज्ञान। सुखाभरले गगन। गाळीव जैसे॥ या व्यापक-परिपूर्ण ज्ञानस्थितीला येऊन माझ्या ठिकाणी येतो. एकरूप होतो. आपले स्वरूप प्राप्त देहाहून-नाम-रूप-कुटुंब-परिवार-समाज-अस्तित्व याहून वेगळे आहे. दिसणारे व अनुभवाला येऊन प्रत्येक क्षणी बदलणारे हे परिवर्तनीय जगत क्षणभंगूर स्वरुपाने आहे. निर्माण होणारे संपत जाते। संपलेल्याच्या जागी नवीन उत्पन्न होते.

असे सृष्टीचे चक्र आपल्याला प्रतिक्षणी अनुभवाला येत असते. असणे, निर्मिती, वाढ होणे, बदल घडणे, हळूहळू क्षयाला जाणे, नाश पावणे या सहा विकारातून संपूर्ण जग जात असते. हा होणारा बदल प्रतिक्षणी नित्य होत असल्यामुळे तो आपल्याला कालांतराने जाणवतो. परंतु सध्या या कोविड-19 महामारीच्या काळात हे वास्तव जास्त तीव्रतेने आपल्याला जाणवते.

कारण ज्याचा आपल्याला भरवसा वाटतो तो देह, सत्ता, पैसा, अधिकार, शिक्षण, परिवार, मित्र, आप्तस्वकीय, वैद्यकीय व्यवस्था, मर्दुमकी, संपत्ती, धार्मिक व सामाजिक स्तरावरील आपले अस्तित्व हे सर्व क्षुल्लक, निरर्थक व अनुपयोगी ठरताना आपण अनुभवत आहोत. अगदी घरात सुरक्षित वातावरणात परिवारासोबत एकत्र व व्यावहारिकदृष्ट्या निश्चित असतानाही आमची मन:स्थिती अनामिक भीतीने ढासळते आहे.

स्थिरतेच्या, प्रसन्नतेच्या, अभयाच्या प्राप्तीसाठी आम्ही स्वत:ला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहोत. चित्रपट, दूरदर्शन, गायनादि श्रवण, ग्रंथ व कविता वाचन घराची साफसफाई, विविध खेळ इ. साधनांचा वापर करूनही आम्हाला करमत नाही. अस्वस्थता वाढतेच आहे. कारण आम्ही स्वत: बाहेर सुख शोधतो आहोत.

अंतर्मुख झाल्याशिवाय स्थिरता-आनंद व अभय स्थिती प्राप्त होत नाही. आम्ही आमच्या अपेक्षा व गरजा अकारण व अनावश्यक स्वरुपाने वाढवल्या आहेत. भौतिक जगताचा आश्रय स्वकेंद्रित, स्वार्थी, प्रवृत्तीलाच प्रेरित करते, जी दु:खाला कारण ठरते. आध्यात्मिक विचारांनीच संत वाङ्मयाच्या वाचन-मनन-चिंतन व श्रवणानेच समाधान मिळू शकते.

यासाठीच भगवंताने स्वत:चा जो परिचय उपदेशकाच्या भूमिकेतून करून दिला त्याचे पुन: पुन: चिंतन संत विचारांच्या आधाराने करणे आवश्यक आहे. भगवंताने स्वत:चा परिचय उपदेशकाच्या भूमिकेतून करून दिला आहे. प्रत्येकाने भगवंत आपल्या आत शोधावा आणि त्याचे चिंतन करावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com