Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधजलसंवर्धन क्षेत्रातल्या बदलाची नांदी

जलसंवर्धन क्षेत्रातल्या बदलाची नांदी

शेतीतल्या पाणीवापराचे Agricultural water use प्रमाण आवश्यक तितकेच ठेवणे, विजेचे बिल मर्यादेत ठेवणे, दुष्काळ, पूर, लहरी हवामानाला तोंड देणे शेतकर्‍यांच्या farmers आवाक्यात येत आहे. माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणार्‍या ‘डेटा गॅदरिंग टेक्नॉलॉजी’मुळे ‘Data Gathering Technology आजच्या भारतात हा बदल घडत आहे.

अभय देशपांडे

भारतातले बहुसंख्य शेतकरी मान्सूनवर अवलंबून आहेत. त्यातच जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गाचा लहरीपणाही वाढत चालला आहे. एकेकाळी प्रत्येक ऋतूबदल वेळच्या वेळी होत असे. आता मात्र तसे राहिलेले नाही. पावसाळा लांबत चालला आहे, उन्हाळा वाढत चालला आहे. अवकाळी पाऊस कधी येईल आणि कधी गारपीट होईल याचा अंदाज बांधता येत नाही. आपल्याकडे ऋतुचक्रानुसार आहार ठरतो.

- Advertisement -

आपले आर्थिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संदर्भही याच ऋतुचक्राच्या आर्यांभोवती फिरतात. मात्र हवामान बदलत असल्यामुळे आपल्यालाही जीवनशैलीत बदल करावे लागत आहेत. हवामानातल्या या बदलांचे सर्वात मोठे कारण म्हणजे मानवाकडून होणारा विविध नैसर्गिक स्रोतांचा अवाजवी, अमर्याद, अविचारी वापर. आता कोणी म्हणेल, या प्रकाराला एक सामान्य माणूस कसा आळा घालणार?

तसे पाहिले तर ही शंका योग्य आहे. पण म्हणून आपण काहीच न करता, कोणताच पुढाकार न घेता बसून राहणेही योग्य ठरणार नाही. अगदी छोट्या छोट्या बदलांनी बरेच काही घडू शकते. असे बदल घडवण्यासाठी तत्पर असणारी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात. ही माणसे कधी व्यवस्थेशी तर कधी समाजाच्या मानसिकतेशी लढत असतात.

अनेक तरुण मंडळी शहरातले पाणवठे, तलाव, ओढे स्वच्छ करण्यासाठी पुढे सरसावतात, तर काही सोसायट्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर होताना दिसतो. पावसाचे पाणी वाचवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसतात. असे प्रयत्न आपण वैयक्तिक पातळीवरही करू शकतो. या छोट्याशा बदलांचे परिणाम दिसायला वेळ लागला तरी भविष्यात त्याचा लाभच होणार असतो.

आज समाजाची मानसिकता बदलत आहे, माणसे एकत्र येत आहेत. पर्यावरणाचे, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण किती आवश्यक आहे याची जाणीव वाढू लागली आहे. तरुण पिढी याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या बदलांकडे डोळसपणे पाहायला हवे.

समाज म्हणजे वेगळे काही नसते तर माणसा-माणसाने तयार झालेला एक समुदाय असतो. त्यामुळे प्रत्येकाने काही संकल्प केले, आपल्यापासून सुरुवात करत काही उपक्रमांना आकार दिला तर बरेच काही साध्य होऊ शकते. इतकेच कशाला, प्रत्येकाने ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षणातला आपला खारीचा वाटा निभावला तरी काम बरेच पुढे सरकेल.

जगभरात, विशेषतः सामान्य नागरिकांपर्यंत झालेल्या आयटीच्या प्रसाराचा वापर सर्वांना ऊर्जा बचत आणि पर्यावरणविषयक जागृतीचे धडे देण्यासाठी करता येईल. एखादा विचार मांडला की इ-मेल, इंटरनेट आणि सोशल नेटवर्कमधून क्षणार्धात अक्षरशः जगभर पोहोचवता येतो हे प्रत्येकालाच माहीत आहे. एका हाकेसरशी माणसे मदतीला येतात, सहकार्य करतात. प्रत्येकाने कधी ना कधी त्याचा अनुभवही घेतला असेलच.

याच चमत्काराचा सकारात्मक वापर करून पर्यावरण जतनाचा संदेश सगळीकडे पोहोचवता येईल. आपल्यापुरते प्लॅस्टिक वापरायचे नाही, मी कचरा करणार नाही असे ठरवले तरी बरेच काही होऊ शकते. असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही, अनेक असू शकतात आणि हे ‘अनेक’ समाज बदलू शकतात.

पृथ्वीची लोकसंख्या सातत्याने वाढत असताना पाणी, इंधन, वीज सगळे काही जपून वापरावे लागणार आहे. पाण्यामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते, असेही म्हटले जाते. देशातल्या अनेक भागात दुष्काळ पडत असतो. हे माहीत असूनही आपण पाण्याचा अपव्यय टाळू शकत नाही. स्वयंशिस्त आणि जलसंवर्धनाची तळमळ हेच त्यावरील खरे उत्तर आहे.

अनेक ठिकाणी आपण गळके नळ, बेसिनचे उघडे नळ बघतो. ते बदलायला फारसा खर्च येत नाही. माहिती तंत्रज्ञान (विशेषतः इंटरनेट ऑफ थिंग्ज) वापरून आपण जलसंवर्धन करू शकतो. काही शहरांमध्ये गळके नळ बदलून देण्याची मोहीम राबवली जाते. शक्य तितके पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न होत असतात. या प्रयत्नांचे पाईक व्हायला काय हरकत आहे. स्वत:पुरता बदल घडवला तरी खूप आहे.

पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचा पहिला परिणाम शेतीवर होतो हे आपल्याला माहीतच आहे. शेतीला पाणी तर द्यावेच लागते. परंतु या पाणीवापराचे प्रमाण आवश्यक तितकेच ठेवणे, पाणी वाया घालवणे टाळणे, विजेचे बिल मर्यादेत ठेवणे आणि तरीही दुष्काळ, पूर आणि एकंदर लहरी हवामानाला तोंड देणे या बाबी शेतकर्‍यांच्या आवाक्यात आल्या आहेत. माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणार्‍या ‘डेटा गॅदरिंग टेक्नॉलॉजी’मुळे हे शक्य झाले आहे.

अमेरिकेतल्या जॉर्जियामधील शेतकर्‍यांना गेली काही वर्षे सतत अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तिथेही वादळे येत असतात. प्रचंड बर्फवृष्टी, अतिवृष्टी होत असते. त्यांच्या मदतीसाठी जॉर्जिया विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी ही प्रणाली बनवली. यासाठी त्यांनी कमी खर्चाचे, मर्यादित क्षमतेचे सेन्सर आणि जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) चा वापर केला. पीव्हीसी पाईपमध्ये बसवलेले हे सेन्सर त्या त्या ठिकाणच्या शेतजमिनीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या खोलीवर पुरून ठेवले जातात.

ते माती तापमान आणि त्यामधल्या आर्द्रतेच्या प्रमाणाची माहिती गोळा करतात आणि पाईपमधल्या अँटेनाच्या सहाय्याने संगणकाकडे प्रक्षेपित करतात. संगणकाच्या पडद्यासमोर बसलेले शेतीतज्ज्ञ या माहितीचे विश्लेषण करून त्या जमिनीला केव्हा आणि किती पाणी द्यायला हवे हे सांगतात. यामुळे तिथल्या शेतकर्‍यांचे दोन-तीन फायदे होतात. पाणी तसेच ते पुरवणार्‍या मोटारला पुरवावी लागणारी वीज वाचते हा फायदा तर उघड आहे.

दुसरे असे की, त्यांना घरापासून शेताच्या प्रत्येक कोपर्‍यात जाऊन मोटार चालू वा बंद करावी लागत नाही. अमेरिकेतल्या छोट्या शेतकर्‍याकडेदेखील पन्नास-साठ एकर जमीन सहज असते. परिणामी, वेळ आणि इंधन खर्च वाचतो. शिवाय पिकाला गरजेइतकेच पाणी मिळाल्याने अति किंवा कमी पाण्यामुळे त्यावर होणारे दुष्परिणाम टळून धान्य वाया जाण्याचे प्रमाण घटते.

जॉर्जिया विद्यापीठाने यापूर्वी अशा इतरही प्रणाली विकसित केल्या आहेत. उदा. कमी दाबावर चालणारी तरीही जास्त अंतरावर पाणी फेकणारी ‘स्प्रिंकलर सिस्टिम’ ऊर्फ तुषार सिंचन पद्धत (यामुळे वार्‍यामुळे तसेच बाष्पीभवनाने पाणी वाया जाणे कमी होते) किंवा पाणी नक्की कुठे पडत आहे हे तपासणारे संवेदक (हे प्रत्येक तोटीवर लावता येतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तोटी वळवून हवे तिथेच पाणी फवारले जाते.) या नव्या तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीच्या पद्धतींसोबत केला जात आहे.

जॉर्जिया, कन्सास आणि नेब्रास्का या तीन दुष्काळप्रवण संस्थानांमध्ये या प्रणालीचा यशस्वी वापर होत आहे. बहुतांश ठिकाणी जमिनीखाली मोठा जलसाठा असतो आणि तिथे पाणी साठवले जाते. हेच पाणी नंतर गरजेनुसार विविध इमारतींच्या गच्चीवरील ओव्हरहेड टाक्यांमध्ये साठवले जाते आणि तिथून ते सदनिकेत वापरले जाते. जमिनीखालील साठ्यातून ओव्हरहेड टाक्यांमध्ये पंपद्वारे पाणी उचलले जाते. ही पूर्ण प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक सेन्सरद्वारे स्वयंनियंत्रित करता येते आणि पाण्याच्या पातळीनुसार मोटार बंद-चालू करता येते.

आपण वॉश बेसिन वापरतो आणि त्याचा नळ चालूच ठेवतो. यामुळे किती पाणी वाया जाते हे आपल्या लक्षात येत नाही. पाणी वाया जाऊ नये म्हणून नळाखाली हात येताच पाणी काहीकाळासाठी सोडले जाते आणि नंतर आपोआप बंद होते. हे सगळे सेन्सर्समुळे शक्य होते. हे तंत्रज्ञान सध्या अनेक पंचतारांकित हॉटेल्स आणि विमानतळांवर वापरले जात होते. मात्र आता छोटी-मोठी रेस्टॉरंटस् तसेच सार्वजनिक ठिकाणीही त्याचा वापर होत असल्याचे पाहायला मिळते.

आता तर घरांमध्येही हे तंत्रज्ञान बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी वाचवण्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागल्यामुळे अनेक सोसायट्या जलसंवर्धनाचे प्रकल्प राबवत आहेत. पावसाचे वाया जाणारे पाणी वाचवले तर उन्हाळ्यात बरेच लाभ होऊ शकतात. उन्हाळ्यात होणार्‍या पाणीकपातीदरम्यान असे साठवलेले पाणी वापरता येते. फक्त दैनंदिन सवयींमध्ये बदल केल्यानेही आपण मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन करू शकतो. आपल्या घरातले स्वछतागृह, आधुनिक स्वच्छता उपकरणे (वॉशिंग मशीन, डिश वॉशर) हे आपल्या पाणीवापराचे मोठे स्रोत आहेत.

वॉशिंग मशीन वापरताना ते पूर्णपणे कपड्याने भरले आहे का हे काळजीपूर्वक पाहा. अनेक वेळा अर्धवट भरलेले मशीन वापरून आपण पाण्याचा भरपूर अपव्यय करतो. स्वच्छतागृहामध्ये घरातले किमान 30 टक्के पाणी वापरले जाते. तिथे अनेक ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर शक्य आहे. कमोडचा वापर करताना गरजेइतकेच पाणी वापरता येते. पुनर्वापराचे असे अनेक स्मार्ट उपाय शक्य आहेत. असे अनेक स्मार्ट उपाय वापरून आपण ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धन करू शकतो.

सध्या सर्वत्र असे स्मार्ट उपाय केले जात आहेत. बदल घडत आहेत. लोक ‘चलता है’ असे न म्हणता पाणी तसेच ऊर्जा वाचवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत आहेत. नवतंत्रज्ञानाचा अवलंब होत आहे. त्यामुळे समाजात अपेक्षित बदल लवकरच दिसून येईल यात शंका नाही.

अभय देशपांडे

- Advertisment -

ताज्या बातम्या