Saturday, April 27, 2024
Homeशब्दगंधगुढी उभारु आनंदाची

गुढी उभारु आनंदाची

गुढीपाडव्याचा सण चैत्रात येतो, या काळात निसर्गसुद्धा नावीन्याने नटलेला असतो. शिशिराच्या पानगळीचे दिवस जवळपास संपत आलेले असतात. अशा दिवसात सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचे. निरोप आणि स्वागत..अंत आणि सुरुवात अशा मिश्र भावनांचे समतोलन करायला निसर्ग शिकवतो. गेल्या दोन वर्षातील वातावरणामुळे सर्वांच्या मनावर भीतीचे मळभ दाटले होते. यंदा ते दूर झाले आहे म्हणूनच विकसित, आनंदी, निरोगी मन आणि शांततापूर्ण वातावरण मिळावे हाच संदेश या गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून देवू या!

दिवसापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होते. साडेतीन मुहुर्तापैकी एक! कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवसापासून केली जाते. या सणाची पार्श्वभूमी वेगवेगळ्या पौराणिक धार्मिक कथांंनी सजलेली आहे. या दिवसापासून कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात केली तर, काम पूर्णत्वाला जाते, ते फलदायी ठरते अशी धारणा आहे. यासंदर्भातील पौराणिक कथा अशी की, या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दशानन रावणाचा वध करून अयोध्येत आगमन केले होते. त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्येच्या नगरजनांनी गुढ्या उभारून दिव्यांची रोषणाई केली होती. तो दिवस चैत्रपाडवा म्हणजे वर्षाचा प्रथम दिवस होता. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा रुढ झाली. कोणाच्याही स्वागताला गुढ्या, तोरणे यांनी घर सजवून तयार करण्याची प्रथा आजही पाळली जाते. गुढीपाडव्यासंदर्भातील दुसरी कथा अशी, शालीवाहन नावाच्या राजाने मातीची सेना उभारून त्यात प्राण फुंकून त्यांना सजीव केले आणि त्या सेनेने राज्याचे शत्रूपासून संरक्षण केले तो हाच दिवस होता. अशा अनेक रूपककथा आणि दंतकथा या चैत्रपाडव्याशी निगडित आहेत.

सण कोणताही असो त्यामागील कथा आपल्याला सांगितल्या जात असत! एवढेच नव्हे तर ठराविक सणांचे ठराविकच पदार्थ त्या-त्या दिवशी बनविले जात असत!

- Advertisement -

चैत्रात निसर्गसुद्धा नावीन्याने नटलेला असतो. शिशिराच्या पानगळीचे दिवस जवळपास संपत आलेले असतात अशा दिवसांत सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचे. निरोप आणि स्वागत. अंत आणि सुरुवात अशा मिश्र भावनांचे मनातील आंदोलन मानवी भावनांचे समतोलन करायला निसर्ग शिकवतो म्हणूनच या दिवसांचे प्रयोजन केले गेलेले आहे.

हे दिवस सरत्या माघाचे..येणार्‍या फाल्गुनाचे. माघाची थंडी ओसरायला लागलेली असते. चिमण्यांचे धुळीस्नान सुरू होते. आपल्यापेक्षा निसर्गाला बदलत्या ऋतूंची चाहूल सर्वप्रथम लागते. महाशिवरात्रीला महादेवाची यात्रा करून सरत्या दिवसांना निरोप दिला जातो. झाडाच्या मुळाशी पिकल्या पानांचा, आठवणींचा खच पडलेला असतो. झाडांच्या टोकाला नवीनतेचा स्पर्श करीत येणार्‍या नवदिवसांची, कोवळी पाने नांदी देत असतात. चिंचेचा चिगोर, कडुलिंब, आंब्याचा मोहोर, एक गंध वातावरणाला भारीत करीत असतो. दिवस वाढीवरच्या मुलांसारखे लांबत जातात आणि रात्र संकोचित जाते. आकाश निळभोर क्वचित पांढरे शुभ्र होत जाते. दिवसभराचा उष्मा, संध्याकाळचा आल्हाददायक गारवा आणि पहाटेचा थंडीचा हलका मारा. सारे वातावरण पोषक असते. या सर्व वातावणाचा आपल्या मनावर एक सुखकर परिणाम होत असतोे. अशा सुंदर आणि उल्हासित वातावरणात मराठी नववर्षाचा दिवस चैत्रपाडवा म्हणजेच गुढीपाडवा येतो.

या दिवशी प्रभूरामचंद्रांच्या नवरात्रीला आरंभ होतो. त्याचप्रमाणे देवीचे पण नवरात्र सुरू होते. चैत्राचे दिवस असे मंगलमय वातावरणाने भारलेले असतात. सर्वत्र आनंदोत्सव आणि प्रसन्नतेचे वातावरण असते. गुढीपाडवा आणि गुढीची पूजा कशी करायची याविषयी पूर्वीपार चालत आलेल्या परंपरा व रूढी आहेत. गुढीचा दंड हा वेळूचा म्हणजेच बांबूचा असतो. त्याला तेल, हळद लावून उष्ण पाण्याने स्नान घालतात आणि त्यावर चांदीचा, तांब्याचा लोटा वरच्या बाजूला ठेवतात. तत्पूर्वी वेळूला आंब्याची, कडुनिंबाची डहाळी बांधतात. रेशमी कपडा किंवा साडी नेसवतात. साखरेच्या गाठी आणि चाफ्याच्या फुलांची माळ बांधतात. सकाळी घरातील मंडळी स्नान करून नवीन कपडे परिधान करून अशी तयार केलेली गुढी अंगणात उंच जागी बांधतात. सूर्यास्तानंतर अक्षदा टाकून गुढी खाली उतरवतात. या पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे गुढीचा हा सण साजरा होत असतो.

या दिवसापासून उन्हाळा सुरू होतो. सर्वत्र उष्ण वारे वाहतात. या सर्व वातावरणाला तयार होण्यासाठी कडुनिंबांची पाने आणि धने यांची चटणी गुढीच्या नैवेद्याला ठेवतात. त्यामागील शास्रीय उद्देश असा की या चटणीच्या सेवनाने शरीरात थंडावा निर्माण होतो. तो पुढील येणार्‍या उष्णतेला सामोरे जाण्यासाठी मदतगार ठरतो.

गेल्या दोन वर्षांपासून भारतातील नाहीतर जगातील वातावरण बदललेले आहे. करोनाने सर्वत्र हाहाकार माजवला होता. एक विचित्र दडपण, दहशत दोन वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. कोणताही कार्यक्रम निखळ मनाने, आनंदाने आपण साजरा केलेला नाही! आता शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह गजबजू लागलेले आहेत. मोकळे, मन मोकळे वातावरण आणि आनंद असे पोषक वातावरण यावर्षीच्या गुढीच्या पूर्वसंध्येला जाणवू लागलेले आहे. म्हणूनच या वर्षीची गुढी आपल्याला आनंद देणारी सौख्य देणारी लाभो. जागतिक पातळीवर देखील शांतीचेे वातावरण राहावे, याच प्रार्थनेने हा सण साजरा करुया. आपणा सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा… विकसित, आनंदी, निरोगी मन आणि आनंदी निरोगी वातावरण मिळावे हाच संदेश या गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून देवू या!

- Advertisment -

ताज्या बातम्या