गोष्टीवेल्हाळ माणूस

गोष्टीवेल्हाळ माणूस
महाराष्ट्राला कथा ऐकण्याचे वेड लावणार्‍या परंपरेतले द. मा. मिरासदार(D. Mā. Mirāsadāra) हे शेवटचे शिलेदार म्हणावे लागतील. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द.मा. मिरासदार या त्रयीने कथाकथनाचे (Storytelling) एक वेगळे भावविश्व महाराष्ट्रासमोर उभे केले. विनोदी लेखक (Humorous writer) म्हणून मराठी वाचकांच्या हृदयात स्थान प्राप्त करणार्‍या दमांनी चित्रपटासाठी संवाद लेखनही केले. असा हा मराठी वाचकांचा लाडका लेखक सोडून गेल्याने विनोदी साहित्याचे (Literature) विश्व पोरके झाले आहे.

द.मा. मिरासदार अर्थात दमा म्हणजे गोष्टीवेल्हाळ माणूस. याच गोष्टीवेल्हाळपणातून त्यांच्यातला कथाकथनकार आकाराला आला. त्यांच्या कथाकथनाच्या शैलीने सार्‍या महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते तिथे तिथे त्यांचे चाहते निर्माण झाले. एक काळ असा होता की व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द.मा. मिरासदार या त्रिकुटाने आपल्या कथाकथनाद्वारे सार्‍या महाराष्ट्राला गारूड घातले होते. त्यांचे कथाकथन राज्याच्या सांस्कृतिक जीवनातला एक अविभाज्य भाग बनला होता. त्यांचे कार्यक्रम सदोदित हाऊसफुल्ल चालायचे. दमांनी ग्रामीण भागातल्या विनोदी कथाकथनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन केले. नेहमीच्या जीवनातले प्रश्न विसरायला लावून श्रोत्यांच्या चेहर्‍यावर निखळ हसरे क्षण निर्माण करण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली होती. ग्रामीण भागातल्या बेरकी, इरसाल पात्रांच्या मदतीने त्यांनी एक वेगळे कथाविश्व उभारले.

कोणत्याही प्रकारचा गर्व आणि अंहकार नसलेला माणूस म्हणजे दमा, असेही त्यांचे वर्णन करता येईल. पुण्यात असो वा कोल्हापूरला, कधीही ऑफिसला कामानिमित्त आले की त्यांच्याशी गप्पा रंगणार हे नक्की. या भेटीदरम्यान त्यांनी एखादी गोष्ट सांगितली नाही असे कधी घडले नाही. त्यांना गोष्टी सांगण्याचे व्यसनच लागले होते.

दमांच्या लोकप्रियतेचा सांगण्यासारखा एक किस्सा म्हणजे एकदा मेडिकलचे चार-पाच विद्यार्थी आमच्या ‘अजब पुस्तकालय’ या दुकानात आले. आल्या आल्या त्यांनी दमांची पुस्तके मागितली. कोणत्याही चौकशीशिवाय त्यांनी दमांची पुस्तके मागितल्याचे पाहून मला थोडे आश्चर्य वाटले. उत्सुकता चाळवल्यामुळे मी त्यांना सहज विचारले, आल्या आल्या तुम्ही थेट दमांचीच पुस्तके कशी काय मागितली? त्यावर ते म्हणाले, दमा इथे आले आहेत. नजिकच्या चपलांच्या दुकानात ते खरेदी करत आहेत. त्यांना पाहून आम्हाला आमची राहून गेलेली त्यांच्या पुस्तकांच्या खरेदीची गोष्ट लक्षात आली. त्यामुळे आम्ही दुकानात थेट त्यांच्या पुस्तकांची मागणी केली. असा हा त्यांच्याबाबतचा आलेला एक वेगळा अनुभव. शेजारच्या दुकानातून त्यांना बोलावून आणल्यावर त्यांच्याशी गप्पांची मैफल झडली. गप्पा झाल्यावर दमांनी नेहमीप्रमाणे एक गोष्ट सांगितली आणि निरोप घेतला. साधेपणा हा त्यांच्यातला आणखी एक भावणारा गुण म्हणावा लागेल.

पंढरपूरमध्ये व्यतीत केलेल्या बालपणात ग्रामीण भागातल्या विविध स्वभावाच्या, प्रवृत्तीच्या व्यक्तींना त्यांना न्याहाळता आले. सहवासात आलेल्या विविध व्यक्तींच्या स्वभावाचे कंगोरे त्यांनी टिपले. हेच निरीक्षण त्यांनी रेखाटलेल्या ग्रामीण पात्रांमध्ये आढळते. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांचा आधार घेत, त्यामध्ये अनुभवाला आलेल्या पात्रांना चपखल बसवत आकाराला आलेल्या कथांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. घटनेशी एकरूप झालेला परिसर, वातावरणनिर्मिती, त्यातल्या व्यक्तिरेखा याच्या एकत्र परिणामातून एक वेगळे विश्व वाचकांच्या मनोपटलासमोर उभे करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या स्वतंत्र कल्पनाशक्तीमधून आकाराला आलेल्या घटना हास्यनिर्मिती करतात. त्यांच्या लेखनाने शहरातल्या वाचकांना इरसाल, बेरकी मंडळींच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडले, असे म्हणावे लागेल. त्यांच्या कथासंग्रहातल्या बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आधारलेल्या असत. ग्रामीण जीवनातले विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातला विनोद मिरासदारांनी आपल्या कथांमधून फुलवला. त्यांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि काहीशी भोळसट पात्रे आपल्याला भेटतात. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावतात.

दमांच्या विशिष्ट हातवारे करत केलेल्या शैलीतल्या सादरीकरणामुळे या कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. मात्र त्यांच्यातला लेखक केवळ विनोदी कथांपुरता मर्यादित राहिला नाही. ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’सारख्या काही गंभीर कथांमधून त्यांनी जीवनातल्या कारुण्याचे विलक्षण प्रत्ययकारी दर्शन घडवले. अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे आपल्याला दिसून येते. असे असले तरी त्यांचा मुख्य पिंड विनोदी कथाकाराचाच होता आणि त्यामुळेच त्यांना लोकप्रियताही लाभली. काहीकाळ पत्रकारितेत घालवल्यानंतर अध्यापन क्षेत्रात ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. शिक्षण क्षेत्रात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही काम केले. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध आदी कथा कमालीच्या लोकप्रिय झाल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर जमा आहेत. दमांच्या ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ या कथांचा विशेष उल्लेख करायला हवा. विनोदी लेखनावर चर्चा करताना या कथांचा उल्लेख करावा लागेल. मराठी साहित्य विश्वातल्या उल्लेखनीय विनोदी कथांमध्ये वरील दोन कथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

विनोदी लेखनाबरोबर चित्रपट पटकथा लेखनाच्या क्षेत्रातही दमांनी भरीव कामगिरी केली. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली. त्यांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या गाजलेल्या विनोदी कथेवर ‘गुरुकृपा’ हा मराठी चित्रपट बेतला होता. त्यांची ‘भुताचा जन्म’ ही कथा बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात घेतली आहे. तसेच याच कथेवर बनलेली शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये झालेल्या महोत्सवामध्येही दाखवली गेली. मिरासदारांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे ‘मिरासदारी’.

मराठी साहित्य विश्वात ग्रामीण साहित्याच्या लोकप्रियतेचा एक काळ होता. त्याचकाळात विनोदी बाज असणार्‍या ग्रामीण कथांनी वाचकांना आकर्षित केले. एकसुरी, साचेबद्ध नसल्याने या कथा वाचकांना खिळवून ठेवायच्या. या कथांमध्येही विविधता होती. मिरासदारांच्या कथांमधून आढळणारी एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची आणि गंमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. महाराष्ट्रातली विविध गावे आणि तिथे राहणारी माणसे आपल्याला मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. ‘चकाट्या’ या कथासंग्रहातही ही गावागावांतली आणि शहरात जागोजागी आढळणारी अवली स्वभाववैशिष्ट्यांची पात्रे मनात घर करून राहतात. केवळ शाब्दिक विनोदावर विसंबून राहण्याऐवजी प्रासंगिक विनोद लेखनातून वाचकांसमोर उभा करणे आणि सरळ-साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे हे त्यांच्या लेखनाचे यश म्हणता येईल. लेखनात चौफेर कामगिरी करणार्‍या मिरासदारांनी 1998 मध्ये परळी वैजनाथ इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले. 2015 मध्ये राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा प्रतिष्ठेचा विं.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 2015 मध्ये त्यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दमा मुळातच साधे सरळ असल्याने त्यांच्याशी आमचे संबंध एखादे मैत्र जपल्यासारखे उत्तम होते. त्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत वाद निर्माण झाले नाहीत किंवा कटूता निर्माण झाली नाही. असा हा साधा, सरळ, निगर्वी माणूस आपल्यातून निघून गेल्याचे फार दु:ख होते. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वाचे, मराठी वाचकांचे एवढेच नव्हे तर प्रकाशन व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com