कसरतींचे ‘पेच’!

कसरतींचे ‘पेच’!

कोल्हापूर पोटनिवडणूक निकालानंतर पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ याची जाणीव अनेक अस्वस्थ आत्म्यांना या निवडणूक निकालामुळे झाली. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र राहिली तर तिकिटीचे वाटप ही विलक्षण कसरतीची गोष्ट असणार. या कसरतीची झलक आता येत आहे.

कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठेची पोटनिवडणूक पार पडली. निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. 2019 मध्ये शिवसेनेच्या या पारंपरिक जागेवर विधानसभेसाठी काँग्रेसने चंद्रभान जाधव या व्यावसायिकाला, नवख्या राजकारण्याला उमेदवार म्हणून मैदानात उतरवले. ती जागा राजेश क्षीरसागर या शिवसेनेच्या मातब्बर उमेदवाराने अनेकदा जिंकली होती. अर्थातच त्यामुळे तिथे प्रस्थापितविरोधी वातावरण होते. शिवाय संघटनेतही काही कुरबुरी होत्या. त्यावर मात करणे क्षीरसागर यांना जमले नाही. आणि क्षीरसागरांचा, पर्यायाने शिवसेनेचा पराभव झाला होता.

कोल्हापूर जिल्हा संघटनदृष्ट्या शिवसेनेने उत्तम बांधला. ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेत इथून शिवसेनेचे प्राबल्य जाणवत राहिले. अर्थात, त्याआधी सद्दी काँग्रेसची होती. त्यांच्यामागे साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध डेअर्‍या, शिक्षण संस्था असे संघटनांचे जाळे होते. 15 वर्षे सत्ता असूनही शिवसेनेला तसे जाळे उभे करता आले नाही. तरी कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ कुणाचा असे विचारले तर त्याचे उत्तर शिवसेना हेच यायचे

. अपवाद 2019 चा. अर्थात, 2014 मध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले. स्वतंत्रपणे लढून भारतीय जनता पक्षाला 43 हजार मते पडली. स्वतंत्र आणि एकत्र अशा दोन्ही लढतींमध्ये शिवसेना आणि हिंदुत्ववाद्यांची मते वेगळी करता येणार नाहीत कारण ते आता आतापर्यंत तसे एकजीव होते. आता महाविकास आघाडीत आल्यावर आघाडीचा धर्म झाला.

काँग्रेसच्या आमदाराचे दुर्दैवी निधन झाले तरी पोटनिवडणुकीत ही जागा शिवसेनेला मिळाली नाही. त्यांच्या पत्नी काँग्रेसतर्फे उभ्या राहिल्या. खरे तर त्या भाजपच्या नगरसेविका. भाजप इथे संघटनशून्य. त्याचे कुठलेच राजकीय प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे राजकीय कामही शून्य. संस्थात्मक जाळे नाही. मग पन्नाप्रमुख शक्तीकेंद्र तर दूर की बात. समोर गाठ मात्र आर्थिक आणि संघटनदृष्ट्या अत्यंत संपन्न असलेल्या सतेज पाटील यांच्याशी. त्यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपद, हाताशी संस्थात्मक जाळे, असंख्य माणसे जोडलेली, निवडणूक जिंकण्याचा दांडगा अनुभव आणि साम-दाम-दंड-भेद वापरण्याची क्षमता.

अशी विषम कुस्ती कोल्हापुरात रंगली. भाजपने इथे अत्यंत विचारपूर्वक खेळी केली. लक्षात घ्या, प्रचारकाळात कोल्हापूरमध्ये ‘काश्मीर फाईल्स’चे शो हाऊसफुल्ल गर्दीत सुरू होते. 2 लाख 90 हजारांचा मतदारसंघ. 60-65 टक्के मतदानाची परंपरा. म्हणजे दोन लाखांच्या आसपास मतदान होणार. लढत दुरंगी. बाकीचे नगण्य पाच-दहा हजारात आटोपणार. म्हणजे लाखाच्या अधिक जवळ जो पोहोचेल तो आमदार होणार, अशी दुरंगी लढत. एका बाजूला तीन भिन्न विचारसरणी आणि त्याहीपेक्षा सतेज पाटलांचे स्वत:च निवडणूक जिंकण्याचे व्यवस्थापन तर भाजपकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा आणि कार्यकर्त्यांची फौज.

पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपचे समाधान औताडे जिंकले कोल्हापुरात भाजप उत्सुक. दुसरीकडे महाविकास आघाडीत एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव करू शकतो या प्रयोगाची इथे चाचणी होणार होती. प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा जवळपास 30 टक्के मते कुंपणावरची. सेना संघटन संभ्रमित. कालपर्यंत आपला असलेला मतदारसंघ आपणच पुन्हा कष्ट करून पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेसच्या दावणीला बांधायचा हे काही पटत नव्हते. पण शिवसेना या निवडणुकीत नेमकी कशाकरता, या प्रश्नाचे उत्तर पुढे सतरंज्या उचलाव्या लागल्या तरी बेहत्तर पण आज भाजपचा पराभव करण्यासाठी, असे येते. त्यामुळे 2024 मध्ये तिथे काँग्रेसचे मालोजीराजे उमेदवार असणार हे उघड आहे आणि सतेज पाटील कदाचित लोकसभासुद्धा पदरात पाडून घेतील.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये 2014 च्या मतसंख्येच्या तुलनेत भाजपने दुपटीने वाढ केली आणि एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव करू शकतो, हा विश्वास आघाडीला मिळाला. मग या निकालाचे महाराष्ट्राच्या येणार्‍या लोकसभा-विधानसभांवर काही परिणाम होणार आहेत का? निश्चित होणार आहेत. त्यामुळे या निकालानंतर पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग येणे स्वाभाविक आहे. 2019 च्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट दर्शवतात की जे आयत्या वेळी मेगाभरतीत भाजपमध्ये आले त्यांना संमिश्र यश मिळाले. जे आधी आले त्यांच्यात निवडून येण्याचे प्रमाण अधिक आहे

. हा धागा जर 2024 पर्यंत नेला तर ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ याची जाणीव अनेक अस्वस्थ आत्म्यांना या निवडणूक निकालामुळे झाली असणार यात शंकाच नाही. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र राहिली तर तिकिटाचे वाटप ही विलक्षण कसरतीची गोष्ट असणार. अर्थात, जो जिथून निवडून आला तो पक्ष अथवा उमेदवार इथून पुन्हा लढण्यावर हक्क सांगणार हे उघड आहे.

मग बुलडाण्याचे काय करायचे? तिथे शिवसेनेचे प्रतापराव जाधव निवडून आले आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे पडले. तीच गोष्ट रामटेकची. 2019 चे काँग्रेसचे पराभूत उमेदवार शिवसेनेच्या कृपाल तुमाने तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असे म्हणणार का? यवतमाळ-वाशिममध्ये तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेच पराभूत झालेले. ते आता भावना गवळींचा प्रचार करतील का? हिंगोलीत काँग्रेसचे सुभाष वानखेडे ‘आवाज कुणाचा’ या आरोळीला ‘शिवसेनेच्या हेमंत पाटलांचा’ असे उत्तर देणार आहेत का? परभणीची जागा राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीमुळे थोडक्यात हरलेली. इथे प्रश्न कसा सोडवणार?

ठाण्यात आणि कल्याणमध्ये एनसीपीचे जितेंद्र आव्हाड शिवसेनेचा प्रचार करताहेत यावर शिवसैनिक विश्वास ठेवतील का? मुंबई दक्षिणमध्ये 2024 मध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरांनी शिवसेनेच्या अरविंद सावंतांचा प्रचार केला आणि निवडून आणले तर त्यांचे करिअरच संपेल. तीच गोष्ट रायगडमध्ये अनंत गितेंची. शिवसेनेने फार थोड्या फरकाने एनसीपीच्या तटकरेंसमोर हार पत्करली. आता आणखी पाच वर्षे वाट पाहायला लागली तर गितेंचा राजकीय प्रवास संपलाच म्हणायला हवा. मावळमध्ये आपल्या मुलाचा पराभव विसरून अजितदादा श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार का? शिरूरमध्ये आजवर शिवाजीराव आढळराव पाटील या एकाच वाघाची डरकाळी होती. आता 2024 ला अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ निवडून आणण्यासाठी पाटलांच्या हाताला बांधलेले शिवबंधन कसे तयार होणार? तीच गोष्ट शिर्डीची. तीच गोष्ट सातार्‍याची. हातकणंगल्यात तर महाविकास आघाडीचे घटक राजू शेट्टी यांनी सगळा रागरंग ओळखून आताच भाजपबरोबर सोयरीकीच्या गोष्टी सुरू केल्या आहेत.

हे झाले लोकसभेचे. विधानसभेला शिवसेनेने जिंकलेल्या 56 पैकी 14 जागा या काँग्रेसच्या विरोधात आणि 18 जागा राष्ट्रवादीच्या विरोधात आहेत. एनसीपीने जिंकलेल्या 54 पैकी तब्बल 22 जागा शिवसेनेच्या विरोधात जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या 44 पैकी 17 जागांवर त्यांचे उमेदवार शिवसेनेला पराभूत करून विजयी झालेत. या 53 जागांवर नेमके काय निकष लावणार? अनेक ठिकाणी लोकसभा आणि त्यात असणार्‍या विधानसभा मतदारसंघात असे पेच आहेत. तिथे आघाडीचे दोन पक्ष सफाचट होणार. भरीस भर म्हणून भाजप 50हून अधिक जागांवर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

भाजपने जिंकलेल्या 105 जागांमध्ये आमचा वाटा मोठा होता, त्यामुळे ती जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, अशी रास्त भूमिका शिवसेना मांडणार. तर तिथे आम्ही दुसर्‍या क्रमांकावर आहोत म्हणून ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे, असा शड्डू काँग्रेस-एनसीपी ठोकणार. त्यात काही प्रतिष्ठित लढती. आता शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी एनसीपीच्या विद्या चव्हाण यांचा पराभव केला आहे. ती जागा एनसीपी सोडणार का? असे अनेक मतदारासंघातले पेच जेवढे दूर भासत आहेत त्यापेक्षा कित्येक पटींनी उमेदवारांना जवळ वाटू लागले आहेत. हाच कोल्हापूर निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ.

Related Stories

No stories found.