Friday, April 26, 2024
HomeUncategorizedशब्दगंध : देणार्‍याचे हात हजारो...

शब्दगंध : देणार्‍याचे हात हजारो…

नाशिक | गोकुळ पवार

सध्याच्या अवघड परिस्थितीत अनेकांच्या खांद्यावर हात ठेऊन ‘काही होणार नाही’ असा आत्मविश्वास देणारे हजारो हात पुढे येत आहेत. पैसा म्हणजे आयुष्य असे मानणार्‍या लोकांसाठी हा अनुभवाचा काळ आहे. पैशांपलीकडे अजूनही या जगात दुसरे काही आहे, हे समजले. माणूस सतत पैशांमागे धावत असतो; परंतु याकाळात कुठे थांबायचे असत हे समजले…

- Advertisement -

देशात, राज्यात, जिल्ह्यात, गावात सर्व काही आलबेल असताना अचानक कुठूनतरी एक अनाहूत पाहुणा आला अन् सर्व विस्कळीत झाले. पण या पाहुण्याने भल्याभल्यांना माणुसकी दाखवली. पैशांपेक्षा माणसाचा जीव किती महत्त्वाचा आहे शिकवले.

आज वर्ष होऊन गेले तरी करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. 2020 च्या मार्चमध्ये देशात शिरकाव केला. त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले अन् याचा फायदादेखील झाला. करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली. परंतु दिवाळीनंतर या करोनाने पुन्हा डोके वर काढले ते दुसर्‍या लाटेच्या रूपाने. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात करोनाने थैमान घातले. बेड, औषधे, इतर वैद्यकीय सुविधा कमी व्हायला लागल्या.

अचानक मृत्यूदरही वाढला. यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर विविध ठिकाणी कोविड सेंटर्स, औषधांचा पुरवठा, त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढतच होता. अशावेळी माणसे एकमेकांचा आधार होऊ लागली, एकमेकांना धीर देऊ लागली. फोन होऊ लागले, विचारांचे आदान-प्रदान होऊ लागले.

कुठे रक्त, कुठे प्लाझ्मा तर कुठे माणुसकी दान करताना माणूस दिसत होता. अनेक संस्था, संघटना एकत्र येऊन काम करू लागल्या. माणसे वैर विसरून एकमेकांच्या अडीनाडीला उभी राहू लागली. पैशापेक्षा माणसाचा आधार महत्त्वाचा वाटू लागला. अनोळखी माणसांनी एकत्र येत संकटात सापडलेल्या माणसांना मदत केली आणि रुग्ण औषधांसोबत या माणुसकीच्या आधाराने बरी होऊ लागले.

सध्या मदतीचे हजारो हात गरजूंचा आधार होत आहेत. आतापर्यंतच्या काळात करोनाने माणसाला खूप काही शिकवले. विशेष म्हणजे, आपण सर्व कुटुंबासाठी वेळ द्यायला शिकलो. कामानिमित्त बाहेर राहणारे आम्ही एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नव्हतो. आता एकमेकांच्या जवळ आलो.

घरातील मुलांसोबत लहान होऊन खेळू लागलो. घरातील लोकांच्या आवडीनिवडी समजायला लागल्या. पैशांपेक्षा अजूनही या जगात दुसरे काही आहे हे समजले. नात्याचे अर्थ समजू लागले. एकमेकांची काळजी घेऊ लागलो आणि आदर करू लागलो. माणूस सतत पैशांमागे धावत असतो; परंतु अशावेळी कुठेतरी थांबायचे असते हे समजले.

पैसा हे सर्वस्व नाही, हे पुन्हा एकदा करोना नामक परिस्थितीने दाखवून दिले. या अवघड परिस्थितीत अनेकांच्या खांद्यावर हात ठेऊन ‘काही होणार नाही’ असा आत्मविश्वास देणारे हजारो हात आले. पैसा म्हणजे आयुष्य असे मानणार्‍या लोकांसाठी हा अनुभवाचा काळ आहे. केवळ पैसा म्हणजे सर्वस्व असे होत नाही.

म्हणूनच पैशाचा मागे न लागता एकमेकांना मदत करण्याचे औदार्य याकाळात दाखवले जात आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबाचे महत्त्व आपल्याला समजायला लागले आहे. आपल्या माणसातील ओलावा काय असतो हे समजले.

- Advertisment -

ताज्या बातम्या