Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedतापमानवाढीतून संकटमालिका

तापमानवाढीतून संकटमालिका

पृथ्वीचा (Earth) 71 टक्के भाग पाण्याने (Water) व्यापला असून 29 टक्के भागावर जमीन(Land) आहे. याच 29 टक्के जमिनीपैकी 34 टक्के जागा आपण शेतीसाठी (Agriculture) वापरतो. वातावरणाचा समतोल साधण्यासाठी हरित आच्छादन जंगले, वृक्षराजीचे प्रमाण 35 टक्के असावे लागते. मानवी वस्ती, शेती, विकासाच्या नावाखालील प्रकल्पांसाठी जंगले( Forests) हटवून आपण अतिक्रमण केल्याने जंगलाचे प्रमाण आता 26 टक्क्यांवर आले आहे.

अवकाशातून आपण पृथ्वीवर नजर टाकली तर आपणास बघू तेथे पाण्याचे दर्शन होते. पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून बाकीच्या 29 टक्के भागावर जमिनी आहे. याच 29 टक्के जमिनीपैकी 34 टक्के जागा आपण शेतीसाठी वापरतो. वातावरणाचा समतोल साधण्यासाठी हरित आच्छादन जंगले, वृक्षराजीचे प्रमाण 35 टक्के असावे लागते. मानवी वस्ती, शेती, विकसाच्या नावाखालील प्रकल्पांसाठी जंगले हटवून आपण अतिक्रमण केल्याने जंगलाचे प्रमाण आता 26 टक्क्यांवर आले आहे. जमिनीतील बाकीची 30 टक्के जागा मानवी वस्तीला अयोग्य अशा हिमखंड, वाळवटांनी व्यापली आहे. जागतिक हवामान बदलाचा निष्कर्ष काढताना तज्ज्ञ अनेक बाजू तपासतात. त्यामध्ये भूपृष्ठ, सागराच्या तापमानातील बदल, समुद्राच्या पाणीपातळीतील वाढ, ध्रुवीय आणि पर्वतीय भागातील बर्फाच्या वितळण्याचे प्रमाण, वादळ, उष्णतेच्या लाटा, जंगलातील वणवे, दुष्काळ, पूर, पाऊस आदींतील तीव्र बदलांचे प्रमाण याचा अभ्यास करूनच तज्ज्ञ हवामान बदलाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात.

1980 पूर्वी पृथ्वीवरील हवामान बदलतेय, तापमान वाढतेय अशी चर्चा कोणी फारसे करत नव्हते. हवामानात बदलामुळे निसर्ग मानवासमोरच संकटाची मालिका निर्माण करेल, असे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. मात्र गेल्या काही दशकांत हवामान लहरी बनले असून त्याची विविध संकटांची मालिका आपणासमोर आव्हान निर्माण करत आहेत.

- Advertisement -

औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील तापमानाच्या तुलनेत पृथ्वीच्या भूपृष्ठाचे तापमान 1.2 डिग्री सेल्सियसने वाढले असून आता प्रत्येक दहा वर्षांनी तापमान 0.2 डिग्री सेल्सियसने वाढत असल्याचे निरीक्षण आहे. अशाच पद्धतीने तापमानवाढ होत राहिली तर लवकरच पृथ्वीच्या तापमानात 1.5 डिग्री सेल्सियस किंवा त्याहून अधिक वाढ होऊ शकते. वाढती वादळे, मनाला येईल तेव्हा पडणारा मुसळधार पाऊस, महापूर, त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, वणवे आदी संकटांचा मुकाबला करण्याची पाळी आली तेव्हा आपण हवामान बदलत आहे, हे मान्य करण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलो आहोत. 1950 नंतरच्या काळात दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता वाढत आहे. भारत आणि पूर्व आशियातील देशांमध्ये पावसाळ्याच्या काळात कोरडे ढगाळ दिवस किंवा मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले, संततधार पावसाचे प्रमाण कमी. पावसाचे प्रमाण आणि वादळांची संख्या येत्या काळात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. थंड दिवस-रात्रींची संख्या कमी होऊन उष्ण दिवस-रात्रींची संख्या वाढली आहे. या सार्‍या बदलाला कारणीभूत आहे ते पृथ्वीचे वाढणारे तापमान. हे तापमान का वाढत आहे? याला कारणीभूत कोण आहे? ते रोखण्यासाठी काय केले पाहिजे? याचा उहापोह करणे आवश्यक आहे.

जागतिक तापमानवाढ

जागतिक तापमानवाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ही संज्ञा खर्‍या अर्थाने प्रसिद्ध झाली ती अमेरिकेतील नासाचे हवामान वैज्ञानिक जेम्स हॅनसेन यांच्यामुळे. त्यांनी सिनेटमध्ये सर्वात प्रथम अहवाल सादर करताना ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढ हा शब्द प्रथम वापरला. पृथ्वीवरचे तापमान दोन प्रकारांनी वाढत असते. एक म्हणजे सूर्याकडून येणारी उष्णता पृथ्वी शोषून घेते. त्याचबरोबरीने पृथ्वीवर मानवी जीवनाच्या अनुषंगाने विविध हालचाली होत असतात. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होत असते. सूर्याकडून येणारी उष्णता आणि येथून उत्सर्जित होणार्‍या ऊर्जेचा समतोल साधणे आवश्यक आहे. हा समतोल बिघडला तर भूपृष्ठाचे तापमान वाढू शकते किंवा थंडही होऊ शकते. औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत पृथ्वीचे तापमान 1.2 डिग्री सेल्सियसने वाढले असून सध्या प्रत्येक दशकात त्यामध्ये 0.2 डिग्री सेल्सियसने भर पडत आहे.

तापमानवाढीने पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थराचे तापमान कमी होत असून त्याचे एकमेव कारण म्हणजे जमिनीजवळच्या वातावरण थरातील उष्णता वरच्या थरात उत्सर्जित करण्यास हरित गृह वायू प्रतिबंध करत आहेत. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात जमिनीवरील तापमान वातावरणातील तापमानाच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. समुद्रावरील तापमान वाढले असून बाष्पिकरणाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 50 वर्षांत वातावरणात तयार होणारी 90 टक्क्यांहून अधिक उष्णता समुद्राने सामावून घेतली आहे. ध्रुवीय आणि पर्वतीय प्रदेशातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढत असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. 1993 ते 2020 दरम्यान या पाण्याच्या पातळीत प्रत्येक वर्षी साधारण 3.3 मि.मी.ने वाढ होत असल्याचे दिसते. वातावरणातील वाढता कार्बन डाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात समुद्र शोषून घेत असल्याने तेथील पाणी अधिक आम्लयुक्त होत आहे. गरम पाण्यात ऑक्सिजन वायू विरघळत नसल्याने तेथील ऑक्सिजनचे प्रमाण घटत आहे.

ग्रीन हाऊस गॅस (हरित गृह वायू)

जे वायू पृथ्वीच्या वातावरणातील ऊर्जा शोषून घेतात आणि उत्सर्जित करतात त्यांना हरित गृह वायू असे म्हटले जाते. हरित गृह वायूमध्ये प्रामुख्याने समावेश असतो तो पाण्याची वाफ (ह 2), कार्बन डाय ऑक्साईड(ले2), मिथेन (लह4) नायट्रस ऑक्साईड(प2) आणि ओझोनचा (े3). हरित गृह वायू नसते तर पृथ्वीचे तापमान मंगळ, शुक्राच्या सध्याच्या सरासरी तापमानाऐवढ म्हणजे 18 डिग्री सेल्सियस एवढे राहिले असते. हरित गृह वायूंची आपणाला आवश्यकता आहे, मात्र प्रमाणात. विशेष म्हणजे मंगळ, शुक्रावरच्या वातावरणातही हरित गृह वायू आहेत. या वायूशिवाय वातावरणातील ढगांचे प्रमाणही तापमान वाढवते. ढग म्हणजे वातावरणात तरंगणारे पाण्याचे बिंदू किंवा बर्फाचे कण. तेही ऊर्जा शोषून घेतात आणि उत्सर्जनही करत राहतात. हे पाण्याचे बिंदू वातावरणात स्थितीनुसार नऊ दिवस तरंगतात. त्यांच्या तुलनेत मिथेन आणि कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात शंभर वर्षे किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहतात.

औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात म्हणजे इ. स. 1750 नंतर वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. 1750 मध्ये कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण 280 पीपीएम (पार्टिकल पर मिलियन) होते. तेच प्रमाण 2021 ला 419 पीपीएमवर पोहोचले आहे. 1958 पासून 2014 पर्यंतच्या 56 वर्षांत कार्बनचे प्रमाण 90 पीपीएम एवढे वाढले आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण वर्षाला 30 लाख टनांनी वाढत आहे. अन्य वायूंच्या प्रमाणातही याकाळात लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक क्रांतीकाळात कारखाने, कोळसा, वीज उत्पादन जसे वाढले तसा माणसाला वेळ कमी पडू लागला आणि त्याने वाहनांचा शोध लावला. त्यासाठी वापरल्या जाणार्‍या पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायूच्या अतिवापराने तापमानवाढीत भर घातली. पृथ्वीवरील वृक्षवेली कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन वातावरणात सोडत राहतात. आपण गेल्या काही दशकांत विकासाच्या नावाखाली भरमसाठ झाडांची कत्तल केल्याने हरित आच्छादन कमी झाल्याने कार्बन डाय ऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढले आहे. 2015 मध्ये हरित गृह वायूच्या प्रमाणात 62 टक्के वाढ ही केवळ इंधनाच्या वापराने झाली होती. त्याच्याबरोबरीने जंगलांची कत्तल, शेती आणि उद्योग धंद्यातील रसायनांचा वापर ही कारणेही तापमानवाढीस जबाबदार आहेत. जागतिक तापमानवाढीत हरित वायूतील कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन वायूच्या उत्सर्जनाचा वाटा 90 टक्क्यांहून अधिक आहे. मिथेन वायू प्रामुख्याने तयार होतो तो जनावरांचे शेण, भाताची शेती, सांडपाण्याचे पाणी, कोळसा खाणी, तेल आणि नैसर्गिक वायूच्या वापरातून. नायट्रस ऑक्साईड हा वायू नैसर्गिक आणि कृत्रिम खतांच्या विघटनातून वातावरणात सोडला जातो.

ओझोन आणि सीएफसी

सूर्याच्या किरणांबरोबर अतिनील किरणेही वातावरणात प्रवेश करत असतात. या अतिनील किरणांच्या प्रभावाने त्वचेचा कर्करोग, सनबर्न, अंधत्व, डोळ्यांच्या विकारांचे प्रमाण वाढू शकते. मानवाबरोबर जीवसृष्टीतील झाडे, प्राणी,पक्ष्यांवरही ही अतिनील किरणे घातक परिणाम करतात. या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम वातावरणात असणार्‍या ओझोन थरामुळे होत असते. क्लोरोफ्लुयुरोकार्बन (सीएफसी) च्या वाढत्या उत्सर्जनामुळे या संरक्षक ओझोन थराला भगदाड पडले. ओझोन थरातून येणार्‍या अतिनील किरणांमुळे पृथ्वीच्या तापमानात भरच पडत राहते. जीवसृष्टीला घातक ठरणार्‍या अतिनील किरणांचा पृथ्वीवरील प्रवेश रोखण्यासाठी 1987 च्या मॉन्ट्रियल करारानुसार सीएफसीच्या उत्सर्जनावर निर्बंध घातले. त्या निर्बंधांच्या अंमलबजावणीला यश येत असून ओझोन थराचे नुकसान होण्याची प्रक्रिया सध्या थोडीशी थांबली आहे. तथापि ओझोन थर पूर्ववत होण्यास आपल्याला पुढील शतकाची प्रतीक्षा करावी लागेल.

परिणाम आणि उपाय

जमिनीवरील तापमानवाढीने वाळवंटाचा विस्तार, उष्णतेच्या लाटा, जंगलातील वणव्याच्या घटना आता सातत्याने होत आहेत. ध्रुवीय, पर्वतीय प्रदेशातील बर्फ वितळण्याचे वाढते प्रमाण, पाण्यापासून वाफ होण्याचे प्रमाण वाढल्याने भविष्यात तीव्र वादळे तर येतीलच शिवाय जागोजागी टोकाचे हवामान आढळेल. ही सारी तापमानवाढीची लक्षणे म्हणता येतील. हवामानातील बदलाने अन्न-धान्याची टंचाई, संसर्गजन्य रोगांच्या साथी, आर्थिक नुकसान आणि स्थलांतर आदी संकटांच्या मालिकांना तोंड द्यावे लागत आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी वारा-सौर उष्णतेचा अधिक वापर करून कार्बन वाढवणार्‍या व्यवस्थेतून टप्पटप्याने बाहेर पडणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, हरित आच्छादनाच्या प्रमाणात वाढ करणे आदी मार्गांचा वापर करावा लागेल. सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेताना सागरी किनार्‍याचे रक्षण आणि आपत्कालीन व्यवस्था मजबूत करण्याचा मार्गही स्वीकारावा लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या