हवामान बदल आणि शेती

jalgaon-digital
8 Min Read

राजीव मुळ्ये, पर्यावरण अभ्यासक

जलवायू परिवर्तन आणि तापमानवाढीचे गंभीर दुष्परिणाम शेतीवर जाणवू लागले आहेत. तापमानवाढीमुळे अनेक पिकांचे उत्पादन घटत चालले आहे, तर अवेळी पावसामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत जलव्यवस्थापन आणि संमिश्र शेतीचा अवलंब फायद्याचा ठरतो. त्याचप्रमाणे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून आपण हरितगृहवायूंचे उत्सर्जन मर्यादित ठेवू शकतो आणि पिकांच्या माध्यमातून शरीरात जाणारे विषारी घटक रोखून आरोग्याचेही रक्षण करू शकतो.

भारतातील शेतीचा सर्वाधिक भाग मोसमी पावसावर अवलंबून आहे आणि हवामानातील बदलांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. देशातील शेती उत्पादनामध्ये चढउतार होण्याचे मुख्य कारण अतिशय कमी किंवा अत्यधिक पाऊस हेच आहे. याखेरीज अतिआर्द्रता, असामान्य तापमान, रोग आणि किडींचा प्रकोप, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट ही कारणेही आहेतच. गेल्या काही वर्षांपासून हवामानाचे चक्र सर्वांना स्तिमित करण्याइतके बिघडले आहे. अतिवृष्टी आणि अवर्षण या दोन्ही गोष्टी शेतीसाठी अभिशाप ठरल्या आहेत.

गेल्या काही वर्षांमधील कमी पावसामुळे जे दुष्परिणाम शेतीवर झाले, ते अलीकडच्या काळात अधिक गडद झाले आहेत. जलवायू परिवर्तन आणि तापमानवाढीचा परिणाम म्हणून पूर आणि दुष्काळ वारंवार उद्भवत आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतीचे नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे.

खरिपाच्या पिकाला अवर्षणाचा फटका बसतो, तर रब्बीच्या पिकाने नुकसान भरून काढावे तर तेव्हा अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करून जातो. या समस्येचा अभ्यास करताना कृषी शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, एक अंश तापमान जरी वाढले तरी गव्हाचे उत्पादन चार ते पाच कोटी टनांनी घटेल. त्याचप्रमाणे दोन अंश सेल्सिअस तापमान वाढले तर भाताचे उत्पादन प्रतिहेक्टर 0.75 टन कमी होईल.

कृषी विभागाच्या मते, अशा स्थितीत गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज 82 दशलक्ष टन इतकाच राहील. जलवायू परिवर्तनामुळे फळांचेही उत्पादन घटेल. केवळ उत्पादनच घटेल असे नाही, तर त्यांची गुणवत्ताही कमी होईल. अन्नधान्यातील पोषक घटक आणि प्रथिने कमी होत जातील. परिणामी भोजन संतुलित राहणार नाही आणि माणसाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येईल.

दुसरीकडे वेगाने वाढत जाणार्‍या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचे अत्यधिक दोहन करावे लागेल. आताही स्रोतांचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचे चक्र बिघडले आहे. पर्यावरणात होत असलेल्या परिवर्तनाचा थेट परिणाम शेतीवर पडणार आहे. कारण तापमान आणि पावसात बदल झाल्यामुळे मातीची उत्पादकता कमी होत जाते आणि किड रोगांचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. किडींचा फैलाव अधिक वेगाने झाल्यामुळेही उत्पादन घटते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी सर्वसाधारण पाऊसमान राहील, अशी भविष्यवाणी केली आहे. म्हणजेच सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस यंदा पडण्याची शक्यता आहे. वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोतांचा अतिउपसा केल्यामुळे पर्यावरणात बदल घडत असून त्याचा शेतीवर आणि पिकांवर प्रतिकूल परिणाम होणे निश्चित आहे. पावसाळ्याचे दिवस पूर्वी अधिक होते, ते आता कमी झाले आहेत.

एकाच दिवशी अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांनी सतर्क राहणे गरजेचे बनले असून शेतकर्‍यांना हवामानाची अचूक माहिती वेळेवर मिळणेही गरजेचे बनले आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात शेतकर्‍यांना हवामानाची माहिती देणारे केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. या केंद्रामुळे शेतक़र्‍यांना संकटाची पूर्वसूचना मिळून नुकसान टाळणे किंवा कमी करणे शक्य होईल.

पर्यावरणातील अनेक बदल शेतीवर थेट परिणाम करणारे आहेत. सरासरी तापमानातील वाढ हा पहिला बदल होय. गेल्या काही दशकांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अनेक वनस्पतींच्या प्रजातींना वाढीसाठी विशिष्ट तापमान असणे आवश्यक असते. वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादकतेत प्रचंड घट होते. उदाहरणार्थ, आज गहू, जवस आणि बटाट्याची शेती ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी तापमान वाढल्यानंतर ही शेती होऊ शकणार नाही.

कारण या पिकांना थंड हवामान लागते. तापमान अधिक वाढल्यास मका, ज्वारी आणि भात अशा पिकांच्या उत्पादकतेत घट होऊ शकते. कारण या पिकांमध्ये दाणे तयार होण्याची प्रक्रिया विशिष्ट तापमानातच होते. तापमान वाढल्यास दाणे कमी प्रमाणात तयार होऊन उत्पादन घटते. तापमान असेच वाढत राहिल्यास ही पिके घेणे अवघड होऊन बसेल. अतिरिक्त तापमानवाढीमुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होतो.

पाऊस कमी पडल्यामुळे मातीतील आर्द्रता कमी होते. जमिनीच्या तापमानात सतत चढउतार होत राहिल्यास अपक्षयाची प्रक्रिया सुरू होता. तापमानवाढीमुळे दुष्काळाची परिस्थिती वारंवार उद्भवते आणि हळूहळू वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू होते.

पावसाचे प्रमाण आणि स्वरुपात झालेला बदल हाही पिकांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस कमी पडल्यास जमिनीतील ओलावा नष्ट होत जातो तर एकाच वेळी अधिक पाऊस पडल्यास मातीची धूप होऊन जमीन नापीक बनू लागते. पावसाचा एकंदरच शेतीवर प्रचंड परिणाम होतो.

शेतातील सर्वच्या सर्व रोपे जगण्यासाठी विशिष्ट प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. पाऊस तर शेतीसाठी महत्त्वाचा आहेच, पण तो वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडणेही आवश्यक आहे.

वातावरणातील बदलांमुळेही शेती अडचणीत येत आहे. वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे वनस्पतींवर प्रतिकूल परिणाम होतो. वातावरणातील हे परिवर्तन काही ठिकाणांसाठी चांगले तर काही ठिकाणी अत्यंत हानिकारक ठरते. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे वातावरणातील ओझोनच्या थरावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. या वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोनचा थर पातळ होत चालला आहे.

हा थर एक टक्क्याने जरी घटला तरी अतिनील किरणांच्या प्रमाणात दोन टक्क्यांची वाढ होते. त्याच प्रमाणात मानवी जीवन आणि अन्नधान्याच्या उत्पादनावरही परिणाम होत जातो. त्यामुळे या वायूंचे उत्सर्जन कमी करून ओझोनचा थर वाचवणे अत्यावश्यक बनले आहे.

तापमानवाढ आणि जलवायू परिवर्तनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शेतात जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. जमिनीची धूप रोखण्याबरोबरच पावसाचे पाणी उपयोगात आणण्यासाठी जलसंवर्धन हा दुहेरी उपयोगाचा मार्ग ठरतो. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमातून आपण पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी उपयोगात आणू शकतो.

शिवाय त्यामुळे मातीची धूपही थांबते. त्याचवेळी साठलेले पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होते. त्याचा पुन्हा शेतीसाठी उपयोग होतो. सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती करणे आता काळाची गरज बनली आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीच्या उत्पादकतेत घट करणारी ठरली आहेत.

तसेच त्यामधील विषारी घटक अन्नसाखळीत समाविष्ट होऊन अन्नावाटे पोटात जाऊन आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे रासायनिक शेतीतून हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे निसर्गाचे चक्र आणखी बिघडते. त्यामुळे आपल्याला जैविक आणि संमिश्र शेतीचा अवलंब यापुढील काळात करावा लागणार आहे. एकल शेतीऐवजी समग्र शेतीतंत्राचा वापर करण्यामुळे जोखीम कमी होते.

समग्र शेतीत अनेक पिकांचे उत्पादन एकाच वेळी घेतले जाते. नैसर्गिक प्रकोपामुळे एखादे पीक हातचे गेले तरी इतर पिकांमधून शेतकर्‍याला उत्पन्न मिळू शकते.

जलवायू परिवर्तनाचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता पीक उत्पादनात नवनवीन पद्धतींचा अवलंब यापुढे करावा लागणार आहे. पेरणीच्या वेळेतही यापुढे बदल करावा लागेल, असे बिघडलेल्या पर्जन्यचक्रामधून लक्षात येते. शेतकर्‍याने आपले पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्राच्या समन्वयातून संकटावर मात करायला शिकले पाहिजे. संमिश्र शेती आणि आंतरपिके घेऊन जलवायू परिवर्तनामुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून काही प्रमाणात बचाव करता येऊ शकतो.

सर्वच शेतकर्‍यांना पिकाचा विमा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. लहानात लहान शेतकर्‍याला या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. जलवायू परिवर्तनाच्या दुष्टचक्रापासून बचाव करण्यासाठी सर्वात आधी आपण उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा काटकसरीने आणि न्यायसुसंगत वापर करायला शिकले पाहिजे. त्यासाठी भारतीय जीवनशैली आणि पारंपरिक ज्ञानाचा वापरच फलदायी ठरणार आहे.

शेतीमध्ये पर्यावरणस्नेही पद्धतींचा वापर यापुढील काळात करणे गरजेचे बनले आहे. असे केल्यास आपण जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्याबरोबरच नैसर्गिक स्रोतांचेही रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो.

राजीव मुळ्ये, पर्यावरण अभ्यासक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *