उद्योगजगताला हादरवतेय चिप्स

उद्योगजगताला हादरवतेय चिप्स

मोठमोठ्या कंपन्या सध्या चिप अर्थात सेमीकंडक्टरच्या टंचाईला सामोरे जात आहेत. सेमीकंडक्टरचे महत्त्व जगाला आता पटले आहे. अजून एक वर्षभर तरी सेमीकंडक्टरची टंचाई संपणार नाही. या पार्श्वभूमीवर भारत आणि तैवानमध्ये सेमीकंडक्टर निर्मितीचा करार झाला आहे. सेमीकंडक्टर नेमके आहे तरी काय आणि त्याच्या टंचाईचा जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी धसका का घेतला आहे, याचा लेखाजोखा.

सप्टेंबरच्या दहा तारखेला जिओ स्मार्टफोनचे लाँचिंग होणार होते; परंतु दिवाळीपर्यंत पुढे ढकलले गेले. त्याचे कारण होते चिप अर्थात सेमीकंडक्टरची टंचाई. त्यानंतर चारचाकी निर्मात्या कंपन्यांना आपली उत्पादने थांबवावी लागली. त्यात शेवरोलेटसह अन्य कंपन्यांचा समावेश होता. त्याचे कारणही सेमीकंडक्टरची टंचाई हेच होते. एकीकडे सुरू असलेली जुन्या मोटारी भंगारमध्ये काढण्याची कारवाई आणि दुसरीकडे नवी वाहने बाजारात येण्याचे थांबलेले. अशा दुष्टचक्रात वाहन उद्योग सापडला आहे. सेमीकंडक्टर मिळत नसल्याने निर्माण झालेल्या टंचाईमुळे बाजारात वाहनांच्या किमतीही सुमारे आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुरेशा चिप्स मिळत नाहीत, जुन्या मोटारींच्या किमतीही वाढायला लागलेल्या आणि नवीन वाहनांचा पुरवठा मर्यादित या त्रांगड्यात सणासुदीच्या काळात ग्राहक कसा टिकवायचा, असा मोठा प्रश्न प्रमुख कंपन्यांना पडला आहे. या कारणामुळे जनरल मोटर्ससारख्या कंपनीवर उत्पादन थांबवण्याची वेळ येत असेल तर संकट किती गंभीर आहे, याची जाणीव व्हायला हरकत नाही. करोनाशी संबंधित निर्बंधांचा सामना करत असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील सेमीकंडक्टरच्या मर्यादित पुरवठ्यामुळे सारी गणिते कोलमडून पडली आहेत. इंटेल आणि इतर चिप उत्पादकांनी उत्पादनक्षमता वाढवण्याचे काम हाती घेतलं आहे; परंतु प्रत्यक्ष उत्पादन बाजारात दाखल होईपर्यंत म्हणजे किमान वर्षभर तरी चिप्सच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

मर्सिडीज-बेंझच्या मालकांनी 2022 पर्यंत चिपची कमतरता कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. सेमीकंडक्टर पुरवठ्यासंदर्भातल्या जागतिक कमतरतेमुळे पुढच्या वर्षाच्या उत्तरार्धातही व्यवसायावर परिणाम होईल. सर्व आधुनिक चिप्स सिलिकॉन क्रिस्टल्सपासून बनवलेल्या असतात. त्यांचे स्वतंत्र ट्रान्झिस्टर तयार करण्यासाठी लिथोग्राफ केलेले असतात. ट्रान्झिस्टर कोणत्याही समाकलित सर्किटचा मुख्य घटक असतो. ट्रान्झिस्टर जितके पातळ असेल, तितकी कमी ऊर्जा वापरते. परिणामी, ट्रान्झिस्टर प्लेसमेंटच्या समान संख्येने आणि संरचनेसह प्रोसेसर कमी ऊर्जा वापरतो. मोठ्या कंपन्याही प्रोसेसर चिप्स बनवत नाहीत. वापरकर्त्यांसाठी या चिप्सचा मुख्य फायदा म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करणे. उत्कृष्ट तांत्रिक प्रक्रियेसह चिप्ससाठी कमी ऊर्जा आवश्यक असते. स्मार्टफोनच्या बॅटरी ऊर्जा मोठ्या प्रमाणात वापरतात. म्हणूनच, तिथे सेमीकंडक्टरचे महत्त्व असते.

हल्लीच्या हायटेक वाहनांमध्ये आपण पाहात असलेली सर्व नवीन वैशिष्ट्ये एका लहान चिपच्या मदतीने काम करतात. सेमीकंडक्टर चिप नसेल तर कार व्यवस्थित चालणार नाही, अगदी लॅपटॉप, फोन आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूदेखील चालणार नाहीत. सध्या जगात या सेमीकंडक्टर चिपची कमतरता आहे; सेमीकंडक्टर चिपच्या या जागतिक टंचाईमुळे नवी वाहने महाग होत आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकेत नवीन वाहने खरेदी करणार्‍या 13 टक्के ग्राहकांची किंमत ही मूळ किमतीपेक्षा जास्त होती. करोना आणि टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी वाहन उद्योगाचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरत वाहन उद्योग पुन्हा रुळावर आला आहे, असे वाटू लागलेले असताना सेमीकंडक्टर चिपची टंचाई निर्माण झाल्याने या उद्योगाला मोठा फटका बसत आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती; परंतु आता ग्राहकांनी सेकंद हँड वाहनांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. जनरल मोटर्सने म्हटले आहे की, मागील वर्षी ट्रकची किंमत कमी होती; परंतु त्यात वाढ झाली आहे. फोर्ड आणि फोक्सवॅगने कंपन्या म्हणतात की, आगामी काळात यापेक्षा वाईट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पुढील काळात उत्पादन अजून काही प्रमाणात कमी होऊ शकते. दुसरीकडे, चिपचे उत्पादनही फारसे होत नाही. त्यातच विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. म्हणजे आधीच उत्पादनात कमतरता निर्माण झालेली असताना आता चिप्सच्या आयात-निर्यातीवरही परिणाम झाला आहे. या सर्व कारणांमुळे, आज संपूर्ण इलेक्ट्रॉनिक बाजार, ऑटोमोबाईल बाजार सेमीकंडक्टर चिप्सच्या टंचाईचा सामना करत आहे.

संपूर्ण जग सेमीकंडक्टर म्हणजेच चिपच्या कमतरतेशी झगडत आहे. याचा थेट परिणाम भारतातल्या वाहन आणि गॅझेट उद्योगावर होत आहे; पण चिपची कमतरता दूर करण्यासाठी भारत आणि तैवान यांच्यात एक करार होत आहे, ज्या अंतर्गत ही चिप भारतातच तयार करण्याचे योजत आहे. त्यामुळे त्याचे दरही कमी होतील. जगातल्या 80 टक्के चीप तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये बनवल्या जातात. अशा परिस्थितीत हा करार प्रत्यक्षात आला तर त्याचा भारतात सकारात्मक परिणाम होईल. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. हा करार होऊ नये, म्हणून चीन तैवानवर दबाव आणू शकतो. अर्थात, आतापर्यंत तैवानने चीनची बरीच बंधने झुगारून दिली आहेत. इथेही तसे झाल्यास भारतात 7.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 55.23 हजार कोटी रुपये)चा चिपनिर्मिती प्रकल्प सुरू होईल. टाटा उद्योगसमूहही यात उतरत आहे. तैवान आणि भारतातल्या करारानुसार, फाईव्ह जी डिव्हाइसेसपासून इलेक्ट्रिक कारपर्यंतच्या चिपचे उत्पादन करण्यात येणार आहे. हा करार अशा वेळी होत आहे, जेव्हा जगभरातले लोकशाही देश चीनच्या विरोधात उभे राहण्यासाठी आर्थिक आणि लष्करी संबंध वाढवत आहेत. एकीकडे तैवानसोबतचा हा करार फायदेशीर ठरेल तर दुसरीकडे चीनसोबत तणाव वाढण्याची भीती आहे. चीन तैवानला आपलाच एक भाग मानतो. दुसरीकडे, तैवान स्वतःला एक स्वतंत्र देश मानतो. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चिपची पुरवठा साखळी वाढवण्यावर भर दिला. चीनच्या प्रभावाला सामोरे जाण्यासाठी क्वॉड ग्रुप तयार केला.

भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि जपाननेही चिपच्या समस्येवर चर्चा केली आहे. भारतात चिप्स नसल्यामुळे जिओ फोन लाँच होण्यास विलंब झाला आहे. तो गुगलच्या भागीदारीत बनवला जात आहे. सध्या भारत 24 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.77 लाख कोटी रुपये) किमतीचे सेमीकंडक्टर आयात करतो, जे 2025 पर्यंत सुमारे 100 अब्ज डॉलर (सुमारे 7.38 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत-तैवान करार अंमलात आल्यास भारताची आयात कमी होऊन उलट निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. आज प्रत्येक व्यक्ती एका दिवसात दहाहून अधिक गॅझेट वापरत आहे. संगणक, लॅपटॉप, स्मार्ट कार, वॉशिंग मशीन, एटीएम, हॉस्पिटल मशीन, स्मार्टफोन अशा सर्व उपकरणांमध्ये त्याची गरज असते. सेमीकंडक्टरंशिवाय ती अपूर्ण आहेत. या चिप्स किंवा सेमीकंडक्टर लहान मेंदू असतात, जे अवघे गॅझेट चालवतात. चिप मायक्रो सर्किट्समध्ये बसवलेल्या असतात. त्यांच्याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट कार्य करू शकत नाहीत. सर्व सक्रिय घटक, एकात्मिक सर्किट, मायक्रोचिप्स, ट्रान्झिस्टर आणि इलेक्ट्रॉनिक सेन्सर या चिप्सपासून बनले आहेत. हे सेमीकंडक्टर्स हाय-एंड कॉम्प्युटिंग, ऑपरेशन कंट्रोल, डेटा प्रोसेसिंग, स्टोरेज, इनपूट आणि आउटपूट मॅनेजमेंट, सेन्सिंग, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही करण्यात मदत करतात. यामुळे या चिप्स कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, प्रगत वायरलेस नेटवर्क, ब्लॉकचेन अनुप्रयोग, फाईव्ह जी, आयओटी, ड्रोन, रोबोटिक्स, गेमिंग आणि वेअरेबल्सचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

Related Stories

No stories found.