सुरवंटाचे फुलपाखरू

सुरवंटाचे फुलपाखरू

- अलका दराडे

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर...

घरातील मुलीचा अथवा मुलाचा जन्म म्हणजे कोमल भावविश्व असते. त्यांच्या या भावविश्वाला घरातील सर्वच जण जपतात. या उमलणार्‍या कळ्या देव्हार्‍यातील निरंजनीतील वातीसारख्या हळूवारपणे तेवत राहून सर्वांना प्रकाश व ऊर्जा देतात. सर्वांना आपलेसे करून घरादाराला प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवतात. या बालकांशी संवाद साधला असता त्यांच्या मनाच्या गाभार्‍यातील गोष्टी आपल्याला समजतात. हा संवाद सर्वांच्याच भावविश्वात विश्वास निर्माण करतो. पालक त्या बाल्यावस्थेतील कलिकांच्या मनाला समजून घेतात. त्यांच्या मनातील प्रश्न यांना न विचारताही समजत असतात. छान छान गोष्टीतून निसर्गाच्या सान्निध्यात ते फुलवतात नातवंडांचे भावविश्व! पण एक दिवस त्यांच्या भावविश्वासंबंधी नकळत मनात काळजी उभी राहते. फुलाफुलांवर बागडणारे फुलपाखरू म्हणजे सुरवंटाच्या अनेक अवस्थांमधून आलेले असते. तशीच ही अल्लड बालकेही उद्याची फुलपाखरे आहेत. त्यांच्या जीवनातील भावविश्वात होणार्‍या बदलांबरोबर शारीरिक बदलही होत असतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्न असले तरी ते कोणाला विचारायला संकोचतात. या किशोरवयीन नातीची गोंधळलेली मानसिकता आईबरोबर आजीही जाणते कारण त्या स्वत: जीवनातील सर्व वळणांवरून व खाचखळग्यांमधून गेलेल्या असतात. आजीकडे तर अनुभवांची भक्कम शिदोरी असते. आजी मोठ्या होणार्‍या नातीला जबाबदारीने शरीरात होणार्‍या बदलांविषयी सांगते. किशोरवयात पडणार्‍या या प्रश्नांना संवादातूनच उत्तरे मिळतात. म्हणून मुलगी असो अथवा मुलगा त्यांच्याशी मनमोकळा संवाद असावा. संवादामुळे शालेय शिक्षण घेता घेता ते सुसंस्कृत तर होतातच पण आपल्या भविष्याविषयी ते विचार करू लागतात व आयुष्याबद्दल विचार करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते. आपल्या घराने त्यांना ज्ञानामृत दिलेले असते. मनातील प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतात आपल्याच घरात साधलेल्या संवादातून.

कवी जगदीश खेबूडकर आपल्या कवितेत म्हणतात,

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव माया

फळ रसाळ मिळते खाया

सुखलोलूप झाली काया

हा कुठवर वेड्या घेसी आसरा.

जीवनाचे तत्त्वज्ञानच कवीने यात सांगितले आहे. घरात मिळणारे आयते सुख सोडून सर्वच बालकांना आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी व स्वतःला सिद्ध करून प्रगती करण्यासाठी मोठी यशस्वी झेप घ्यायची आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com