भारतीय डाकसेवेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पत्रमित्र स.ध.भावसार

भारतीय डाकसेवेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
पत्रमित्र स.ध.भावसार

भारतीय डाक सेवेची स्थापना 1766 साली लार्ड क्लाइव याने केली होती. भारतात पहलं पोस्ट ऑफिस कोलकात्यात 1774साली वॉरेन हेस्टिंग्स ने सुरु केलं आणि 1852 मध्ये स्टॅम्प टिकिटं सुरु झाली. भारतीय डाक सेवेची 169 वर्षाची परंपरा साजरी करण्यासाठी. 10 ऑक्टोबर हा दिवस भारतीय टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. घराघरात सुख, दुःखाची वार्ता पोहचविणार्‍या पोस्टमनचं दर्शन मोबाईल, फेसबुक, वॉटसअप आणि ट्विटरमुळे जवळपास दुरापास्त झाले आहे. अश्या परिस्थितीतही पारोळ्याचे स. ध. भावसार हे पोस्ट खात्याचे ब्रॅड अम्बेसॅडर बनून रोज दहा पत्र पाठवत आहेत. आपल्या 45 वर्षाच्या छंदातून 46 पत्र पाठविण्याचा विक्रम केला आहे. भावसार सरांसारख्या पत्रमित्रांमुळे गावागावात, शहरा शहरात पत्रव्यवहार सुरळीत चालू आहे. अश्या पत्रमित्रांना जिल्हा डाक अधिक्षकांनी डाळ सप्ताहाअंतर्गत सन्मानीत करायला हवे. जेणेकरुन डाकसेवेचा गौरव होईल आणि भारतीय डाक सेवेकडे नवे ग्राहक आकर्षित होतील.

सध्याच्या धकाधकीच्या युगात वेळेचे बंधन पाळणे, व्यवहार काटेकोर करणं आणि शिस्तीचा आग्रह धरणं या गोष्टी अशक्यप्राय झालेल्या आहेत. मात्र, या त्रिसूत्रीचा जोरावर पारोळा येथील निवृत्त आदर्श शिक्षक सदानंद भावसार, स्वतःच्या जीवनासह अनेकांच्या जीवनात, सदा आनंद वाटत आहेत. समाजात सर्वत्र अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा माजलेला असताना, समाजातला चांगुलपणा, चांगली माणसं, समाजोपयोगी कामं, गुणवत्ता शोधून भावसारसर त्यांचा सत्कार करतात. त्यांना हाताने लिहलेली, स्वहस्ताक्षरातील शुभेच्छा पत्र पाठवतात. त्यांचा गुणगौरव करतात. चांगुलपणावर त्यांचा विश्वास इतका दृढ आहे, की दररोज दहा-पंधरा व्यक्तींना अभिनंदनाचे पत्र पाठविल्याशिवाय अथवा दूरध्वनी केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही.

10ऑगस्ट 1947 रोजी जन्माला आलेले भावसार सरांचा हा उत्साह आजही तेव्हढाच दांडगा आहे. जगा वेगळा सदानंद म्हणून, अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या सरांच्या व्यक्तिमत्त्वात मला माझा आदर्श सापडला आहे. त्यांच्यातील शक्य ते गुण घेत, त्याच मार्गावर चालण्याचा मी प्रयत्न करत आहे. सरांना भारतीय डाक विभागाने खरं तर आपला ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर जाहिर करायला हवं. कारण सध्याच्या मोबाईल आणि सोशल मिडीयामुळे पत्र लेखन बंद पडल्यासारखे झाले आहे. मामाचे पत्र हरवले हा खेळ आम्ही बालपणी खेळलोय. मात्र, आता सर्व नातेवाईकांचीच पत्र हरवली आहेत. ती भावसार सर जपून आहेत. घरातल्या घरात, एकमेकांचा एकमेकांशी संवाद होत नाही. मात्र, भावसार सरांची पत्र जिल्हा, राज्य, देशाच्या सिमा ओलांडून परदेशातही पोहचत आहेत. त्यांना स्लतःला आलेल्या पत्रांचा गठ्ठा जेव्हा ते अतिथींना दाखवतात, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर मेडल दाखवत असल्याचा भाव असतो. असा डाक मित्र भारतात शोधूनही सापडणार नाही. याची पोस्ट खात्याने उचित दखल घ्यायला हवी, असं मला वाटतं. पैश्यांबाबत समाजात इतका कोतेपणा आहे की माणसं स्वतःसाठीही पैसा मोडत नाहीत.

मात्र, अभिनंदन, कौतुक, शुभेच्छांचा सर स्वखर्चाने पुरस्कार करतात. सरांचे अभिनंदन पत्र म्हणजे, पत्र लेखनाचा आदर्श नमुनाच म्हणावा लागेल. एखाद्याचा गुणगौरव करणारे वर्तमानपत्रातील मासिकातील, आकाशवाणी, दूरदर्शन अथवा विविध वाहिन्यांवरील बातम्या ऐकून, वाचून भावसार सर प्रत्येकाला पत्र पाठवतात. पत्रात बातमीचा संदर्भ इतका अचूक देतात, की सत्कारार्थी व्यक्तीलाही, आपल्या या वृत्ताची माहिती नसते. या अनपेक्षित शुभेच्छांच्या वर्षावाने, गुणवंतच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती अभिनंदनात चिंब भिजतात.

दुसर्‍याचं कौतुक करायला, स्वतःचं मन विशाल असावं लागतं. मनाच्या या विशालतेनेच सरांना अनेकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे. मी तर अभिमानाने सांगू शकतो की, महाराष्ट्रात असं गाव नसेल, जिथं सरांचं पत्र पोहचलं नसेल. असं प्रत्येक घर म्हणजे जणू सरांच्या नातेवाईकाचंच घर झालं आहे. कुणासाठी ते आजोबा, काका, बाबा. गुरु, मित्र, सखा, मार्गदर्शक तर कुणासाठी आदर्श झालेले आहेत. बादरपुर हे भावसार सरांचं मूळ गाव. सरांनी एम ए बी एड केले आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे नोकरी लागल्यानंतर तसेच लग्नानंतर केलेले आहे. सुरुवातीची दोन वर्षे कृषी खात्यानत आणि माध्यमिक शिक्षक म्हणून अडतीस वर्षाचा आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. असे एकूण 21 पुरस्कार प्राप्त आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक, साधन व्यक्ती, संशोधक, समीक्षक म्हणून ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.

भारत स्काऊट गाईड मधील त्यांच्या पंचवीस वर्षाच्या योगदानाला मेडल देवून सन्मानित केले आहे. लायन्स, रोटरी, इंडियन प्रेस कौन्सिल सारख्या संस्थांनीही सरांचा आदर्शाची वेळोवेळी दखल घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केलेला आहे शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर यशस्वी झालेल्या सरांची खरी ओळख आहे ती त्यांच्या पत्र लेखनामुळे. साधारण 45 वर्षापासून पत्र लेखनाचा छंद जोपासत आहेत. त्यांनी आतापर्यंत 45,408 पत्र पाठविले असून पैकी त्यांना 11 हजार 635 पत्रांना उत्तर मिळाले आहेत.तर 437 व्यक्तींनी घरी येवून त्यांची भेट घेतली आहे. यात दिवाळी, गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा पत्र पाठवून ते आपल्या मित्र, आप्तजनांना मराठी बाणा जपत शुभेच्छा देत असतात. नव वर्ष म्हणून ते गुढीपाडव्याला पत्र पाठवतात. 1 जानेवारीला ते नव वर्ष साजरा करत नाही.

भारतीय सण उत्सवांना महत्व दिलं पाहिजे. हा यातला उद्देश. तसं पाहिलं तर, गुणवंताचा शोध घेणं म्हणजे, एक जिकरीचं काम आहे. यासाठी ते रोज सहा दैनिक वाचतात. तेही स्वतः विकत घेऊन. कुटुंबातला आनंद, आपण आपल्या कुटुंबास साजरा करणे, यात काय विशेष ? परंतु, आपला आनंद, मित्रात वाटण्यासाठी भावसार सर अनेक उपक्रम राबवतात. मुला-मुलींचे वाढदिवस, आई-वडिलांच्या स्मृतिदिन यानिमित्त ते विद्यार्थी शिक्षक यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करतात.

यासाठी स्वतः हजारो रुपयाचे बक्षीसं वाटप करतात. त्यासाठी त्यांनी आता पर्यंत 191 व्यक्ती व संस्था, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांना मदत म्हणून 4,60,016 रु, 10वी,12वी गुणवंत 1847 विद्यार्थ्यांचा बक्षिस म्हणून 1,91,301 रु, वक्तृत्व स्पर्धा पुरस्कार म्हणून 92,529 रु. 652 पुस्तके तर प्रोत्साहन पर 874 व्यक्तिंना 68,344 रु खर्च केले आहेत. या कार्यासाठी वृत्तपत्र, टपाल, फोन, प्रवास खर्च असा 1,18,421 रुचा खर्च केलाय. कार्यक्रमासाठी 57,868 रु खर्च झाले आहेत.

याची सर्व गोळा बेरीज केली तर ती 9,88,479 रु. होते. यात एक रुपयाही कमी नाही की जास्त नाही. इतका काटेकोर हिशोब म्हणजे पारदर्शकतेचा कळसच म्हणावा लागेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वकृत्व, निबंध स्पर्धांचे आयोजन ते नियमित करतात. हे सारे उपक्रम राबवताना, वेळेच्या नियोजनात कुठेही तडजोड नसते. व्यवहारात पारदर्शकता असते. शिस्तीला आनन्यसाधारण महत्त्व असते. कार्यक्रमातील भाषणांनाही सरांच्या वेळेचे बंधन पाळावे लागते. दिलेल्या वेळेपेक्षा जास्त बोलणार्‍या निमंत्रित वक्त्यालाही वेळेचे भान राखायला ते भाग पाडतात. नेटके, देखणे तसेच वेळेवर सुरु होणारे आणि वेळेवर संपणारे, कमालीचे यशस्वी झालेले अनेक कार्यक्रम मी स्वतः अनुभवले आहेत. सरांचे वाचनही अतिशय प्रभावी आहे. अनेक लेखकांची पुस्तके विकत घेवून त्यांनी वाचलेली आहेत. यातील काही पुस्तकांमध्ये, अनवधानाने झालेल्या अनेक चुका, सरांनी आपल्या चाणाक्ष वाचनातून शोधून काढल्या.

त्या लेखकांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत याबाबत या लेखकांनी सरांशी पत्रव्यवहार करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आभारही मानले आहेत. लेखकांनीही त्या मोठ्या मनाने स्विकारुन, सरांचे आभार मानले आहेत. जे काम करायचे त्यात इतकं स्वतःला झोकून देता यायला हवं. सरांच्या या काटेकोर जीवनाला आकार देण्यात, जोपासण्यात आणि त्यात भर घालण्यात, त्यांच्या धर्मपत्नी सौ रत्नप्रभाताई आणि मुलगा पंकज भावसार तसेच सून सौ. वर्षा भावसार यांचा मोलाचा वाटा आहे. सरांचा हा जगावेगळा, खर्चिक छंद तेही जीवापाड जपत आहेत. जीवन जगताना आपण स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीच राब राब राबतो. मात्र ,काही माणसं ही कुटुंब, नातं, जात आणि धर्मापलिकडे जावून समाजाला आपलं कुटुंब मानतात. समाजासाठी जगतात.

तेच आदर्श निर्माण करतात. सरांनी निवृत्तीनंतर आपलं जगणं हे परोपकारासाठी वाहून घेतलं आहे. त्यांनी आपलं जीवन पवनपूत्र, सर्वशक्तीमान हनुमंतरायांना अर्पण करुन दिलं आहे. आपल्या जीवनातून त्यांनी डॉक्टर आणि औषधोपचाराचा त्यागले आहे. खाण्यावर नियंत्रण, आरोग्याची काळजी, नियमित फिरणं, व्यायाम, वाचन, लेखन आणि पूर्ण, शांत झोप हा त्यांचा दिनक्रम आहे. एक दोनदा आजारी पडण्याचाही योग आला. मात्र, सरांनी औषधोपचार केला नाही. हनुमंतांची ईच्छा शिरसावंद्य असंच त्यांनी ठरवलं आहे. म्हणून ते निरामय जगण्याचा आनंद घेवू शकतात. दरवर्षी 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी, मी काही मोजक्या आदर्श शिक्षकांना, भल्या पहाटे उठून, शिक्षकदिनानिमित शुभेच्छा देवून वंदन करतो. आणि, स्वतःमध्ये एक नवी उर्जा, नवी उमेद भरुन घेतो.

जीवन जगतांना अनेक अडचणी, दुःखाचे प्रसंग येतात. तेव्हा, हेच आदर्श शिक्षक मला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात. यातलं सर्वात अग्रस्थानी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आनंदाचे दान देणारा आदर्श शिक्षक, पत्रमित्र आदरणीय स. ध. भावसार. त्यांच्याशी बोलणं म्हणजे आनंदमूर्तींशी बोलणं. सकारात्मकतेची इम्युनिटी स्वतःला टोचून घेणे. मला कोणत्याही वर्गात शिकवलेलं नसूनही, निर्मळ, निर्व्याज आणि निर्मोही असलेले भावसार सर माझे गुरुच आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या आयुष्याची चौर्‍यात्तरी पूर्ण करुन अमृतोत्सवी पंचाहत्तरीत प्रवेश केला आहे.

समाजामध्ये मी अनेक मोठी माणसं पाहतो. ज्यांचा स्वतःचा जगण्याचा मार्ग चूकलेला असूनही, ते मोठ्या फुशारकीने समाजाला मार्गदर्शन करत असतात. मात्र, भावसार सर स्वतः आदर्शावर चालतात आणि मग इतरांकडून आदर्शाची अपेक्षा ठेवतात. श्रध्देने ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय हल्ली दुर्मीळ होत चालली आहेत. त्यात भावसारसरांसारखी मोजकी माणसं शिल्लक आहेत. ती समाजाची धरोहर आहेत. या जिल्ह्याची, राज्याची भूषण आहेत. यांना समाजाने जपायला हवं. त्यांना तरुणांपुढे, युवकांपुढे आणायला हवं. तेच समाजाला दिशा देवू शकतात.

युवकांना, तरुणांना प्रेरणा देवू शकतात. फेसबुक, वॉटसअप सारख्या माध्यमांच्या महापूरात तरुणाई वाहून जात असतांना भावसार सरांसारखी माणसं लाईफ जॅकेट सारखी आहेत. ते संकटात धिराने उभं राहून संकाटातील लोकांना धिर देवू शकतात. समाजात सर्वत्र वाईटच समोर येतं असं म्हणणार्‍यांनी सरांकडे बघायला हवं. चांगुलपणाचं गौरीशिखर त्यांच्यात नजरेस पडेल. समाजात सदैव आनंदच वाटणार्‍या या सदानंदी आदर्श शिक्षकाला, दीर्घायुरारोग्य लाभो, हीच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो.

- ‘देवरुप’, नेताजी रोड.

धरणगाव जि. जळगाव. 425105.

Related Stories

No stories found.