सेतू चालकांकडून प्रशासनाच्या नोटीसीला केराची टोपली

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
सेतू केंद्रचालकाच्या एकूणच कामकाजाबाबत नाराजी दर्शवत प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

नागरिकांना ऑनलाईनऐवजी हस्तलिखित पावत्या देणे, बनावट बारकोड तयार करणे, नागरिकांना सेवा न देणे अशा विविध तक्रारींची दखल घेत नाशिक शहर सेतूसह ग्रामीण भागातील सेतू कार्यालयांवर सुमारे दोन लाखांची दंडात्मक करवाईची नोटीस बजावण्यात येउन दंड भरण्याचे आदेश देण्यात आले.

मात्र सेतु चालकांनी प्रशासनाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवत अद्यापही दंड भरलेला नाही त्यामूळे आता कारवायी आणखी कडक करत व्याजास दंड वसुल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नाशिक शहरातील नाशिकरोडचे गुजरात इन्फोटेक संस्थेचे केंद्र, देवळा, निफाड, इगतपुरीतील टेरा सॉफ्टवेअर या कंपनीच्या सेतूचालकांवर कारवाई करण्यात आली. निफाडच्या सेतूचालकास दाखले गहाळ होणे, नियमित, वेळेत दाखले, सेवा न देणे या बाबींमुळे 25 हजाराचा दंड करण्यात आला.

देवळ्याच्या सेतूचालकांनी बनावट प्रतिज्ञपत्रांचे वितरण करत शासनाची फसवणूक केल्याचे उघडकिस आले. तर नाशिकरोड आणि इगतपुरीच्या सेतूचालकांस प्रत्येकी 50 हजाराच्या दंडाची कारवाई प्रशासनाने केली.

आठ दिवसांत दंड न भरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र दिलेल्या मुदतीतही सेतूचालकांनी दंड न भरल्याने आता सुमारे 11 टक्के व्याज आकारून दंड वसुल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असुन तशा नोटीसाही सेतु चालकांना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*