सेतू केंद्र होणार बंद

0

नाशिक । सेतू कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात प्रशासनाने थेट जिल्ह्यातील काही सेतू कार्यालयांवर दंडात्मक कारवाई केली. दंडाची रक्कम भरण्यासाठी सात दिवसांची मुदत देऊनही मुदतीत दंड न भरणार्‍या निफाड, नाशिक, चांदवड येथील सेतू कार्यालये बंद करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केल्याचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वी पंचवटीत अशाच प्रकारे महा-इ-सेवा केंद्राच्या माध्यमातून बनावट दाखले वितरित केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या केंद्रचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता पुन्हा एकदा पंचवटी परिसरात महा-इ-सेवा केंद्रातून वय, जात, राष्ट्रीयत्व, रेशनकार्ड असे शासनाचे विविध प्रकारचे दाखले दिले जात असल्याची तक्रार सेतू केंद्रचालकाला मिळाली होती.

जिल्हा समन्वयक भोसले व महसूलच्या अधिकार्‍यांनी या केंद्राची तपासणी केली असता तसेच हे दाखले पुनर्पडताळणी केले असता यात तथ्य आढळून आले. यात अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी, शिक्क्यांचे दाखले तयार असल्याचे सापडले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, दुकाने सुरू करण्याचे परवाने, इतरही कागदपत्रे आढळली. ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत या सेतूचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे.

तसेच हे केंद्र रद्द करण्यात येणार असल्याचे मंगरुळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नियमापेक्षा अधिक शुल्क आकारणे, बोगस कारभारामुळे जिल्ह्यातील पाच सेतू केंद्र आणि एक महा-इ-सेवा केंद्रचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यांना दंड भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली असता या मुदतीत इगतपुरी, देवळा येथील सेतूचालकाने दंड भरला मात्र निफाड, नाशिक, इगतपुरी येथील सेतूचालकांनी दंड न भरल्याने त्यांना 11 टक्के व्याजास दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र तरीही सेतूचालकांनी प्रशासनाच्या नोटिसीला थारा न दिल्याने आता हे केंद्रच बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे मंगरुळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*