सेवा रुग्णालयातील संदर्भ सेवाची डायलेसिस सेवा आजपासून होणार पूर्ववत

मेमरनमध्ये गडबड झाल्याने शुद्ध पाणीपुरवठ्यात अडचण

0
नाशिक | दि. २५ प्रतिनिधी- डायलेसिसच्या जलशुद्धीकरण मशीनमध्ये बिघाड झाल्याने मागील तीन दिवसांपासून संदर्भ सेवा रुग्णालयातील सात डायलेसिस मशीन बंद होते. पुण्यावरून ४ तांत्रिक अभियंते बोलावल्यानंतर जलशुद्धीकरणातील महत्त्वाचे मेमरन उपकरण दुरूस्त करण्यात आल्यानंतर उद्या शुक्रवारपासून ही सेवा पूर्ववत होणार आहे.
मंगळवारपासून संदर्भ सेवा रुग्णालयातील सर्वच मशीन बंद होते. त्यामुळे रुग्णांना डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज तसेच अन्य खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे लागले. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता डायलेसिस यंत्रांना शुद्ध पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण उपकरण ठप्प झाल्याने ते दुरूस्त करण्याचे काम गुरुवारी उशिरापर्यंत सुरू होते.

या सर्वच मशीनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कंंत्राट दिलेल्या फेबर शिंदुरी या कंपनीने दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली. परंतु अत्यावश्यक सेवा असलेल्या डायलेसिससाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. गुठे यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर सदर शुद्ध पाणीपुरवठा यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी पुण्यावरून चार अभियंते पाठवण्यात आले. त्यानंतर बुधवारपासून दुरुस्तीचेे काम सुरू होते. शुद्ध जलनिर्मितीचे काम होणारे मेमरन दुरूस्त केल्यानंतर डायलेसिस सेवा शुक्रवारपासून पुन्हा पूर्ववत होणार आहे.
डायलेसिस उपचारात शुद्ध जलाची गरज महत्त्वाची असल्याने पेशंटच्या शरीरात शुद्ध पाणी जाणे आवश्यक आहे. शुद्ध पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास अशुद्ध पाणी शरीरात जाऊन दुसरे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. संदर्भ सेवा रुग्णालयात शुद्ध जलपुरवठा करणार्‍या यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने डायलेसिस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसात दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा ही तातडीची सेवा सुरू करण्यात येणार आहे.
संदर्भ रुग्णालयात सर्वात जास्त २० ते २२ रुग्णांवर डायलेसिस उपचार रोज केले जातात. अचानक डायलेसिस सेवा बंद करावी लागल्याने या सर्व रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. शुक्रवारपासून सेवा नियमित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलशुद्धीकरणात अडसर
डायलेसिस उपचार पद्धतीत शुद्ध पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. पाण्यात कोणताही अंश राहिल्यास त्याचा फटका रुग्णांना बसू शकतो. असे होऊ नये यासाठी तीन दिवस ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पाणीपुरवठा करणारे मेमरन दुरूस्त केल्यानंतर आजपासून ही सेवा पूर्ववत होणार आहे.
डॉ.पी.एन.गुठे, वैद्यकीय अधीक्षक

LEAVE A REPLY

*