अण्णांचा केंद्राला आंदोलनाचा इशारा!

0

विविध मागण्यांचे मोदींना पत्र ; अण्णांकडून नाराजी व्यक्त

अहमदनगर – सध्या केंद्र सरकार न्यू इंडिया, भ्रष्ट्राचार मुक्त भारताची निर्मिती अशा घोषणा करून त्याची प्रचंड जाहिरातबाजी करीत आहे, मात्र अशा जाहिरातबाजीने प्रश्न सुटणार नाही. केवळ पोस्टरबाजी करून महिला सुरक्षित होत नाहीत की भ्रष्टाचार थांबत नाही. त्यासाठी कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. लोकपालसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही हजारे यांनी या पत्रात दिला आहे.
बर्‍याच दिवसांच्या खंडानंतर हजारे यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती घेतला आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्रात त्यांनी यासंबंधी केलेली आंदोलने, त्यावर मिळालेली आश्वासने, सरकारचा प्रतिसाद यासंबंधी माहिती दिली आहे. लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रपतींनाही या पत्राच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. पत्रात हजारे यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटले आहे की, भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासन देत आपले सरकार सत्तेत आले. मात्र, सत्तेवर आल्यानंतर आपण बदलला. यासंबंधी निर्णय घेणे दूरच पत्रांना उत्तरेही देणे टाळले.
तसेच मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतानाही आपण कधी या मुद्द्यांचा समावेश केला नाही. देशातील नागरिकांच्या हितासाठी संसदेने लोकपाल विधेयक मंजूर केले, राष्ट्रपतींनी त्यावर सही केल्याने त्याचे कायद्यात रुपांतरही झाले. असे असूनही सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही, हा संसद आणि राष्ट्रपतींचा अवमान आहे. गेल्या तीन वर्षांत आपल्या सरकारला शेतकरी, मजूर, गरीब जनता यापेक्षा मोठ्या कंपन्या आणि उद्योगपतींची जास्त काळजी असल्याचे दिसून आले, त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करणार असून त्याची तारीख व अन्य तपशील लवकरच जाहीर करणार असल्याचे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*