राजीव राजळे आजच्या राजकीय व्यवस्थेचे बळी! : राष्ट्रवादीने 2009 ला चूक केली, 2014 मध्ये छळले

0

यशवंतराव गडाख यांची खंत

कार्यकर्त्यांचीही नवी पिढी या काळात तयार झाली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांत काय-काय वाटावे लागते, असे ते म्हणू लागले. मी जेव्हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. तेव्हा एकही जिल्हा परिषद सदस्य ठेकेदार नव्हता. आज निम्म्याच्यावर ठेकेदार दिसतात.

अहमदनगर (विशेष प्रतिनिधी) – राजीव राजळे यांच्या रूपाने चांगला, कर्तृत्ववान तरुण जिल्ह्याने गमावला आहे. हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. आजच्या राजकीय व्यवस्थेने घेतलेला तो बळी आहे, अशी खंत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली आहे.
2009 मध्ये नगर दक्षिण मतदार संघात राजीव राजळे यांना तिकीट नाकारून राष्ट्रवादीनेे चूक केली आणि 2014 मध्ये उमेदवारी दिल्यानंतर छळ केला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
माजी आमदार राजीव राजळे यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का दिला आहे. राजीव यांचे जाणे, हे अंतर्मूख करायला लावणारे आहे. एका कर्तृत्ववान, अभ्यासू, व्यासंगी आणि उमद्या नेत्याला गमावल्याची प्रतिक्रीया सर्वत्र उमटली.
ज्येष्ठ नेते गडाख यांनी ‘राजकीय व्यवस्थेने घेतलेला बळी’ म्हणून या घटनेवर भाष्य केले. बदलतेे राजकारण, राजकीय पक्षांची मतलबी धोरणे, तरुण राजकारण्यांवर वाढलेला दबाव, बिघडत चाललेली सामाजिक स्थिती याबाबत त्यांनी ‘सार्वमत’शी बोलताना चिंता व्यक्त केली आणि चिंतनही केले.
ते म्हणाले, 20 वर्षांपूर्वीची राजकीय स्थिती वेगळी होती. मी तीन लोकसभा निवडणुका लढलो. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय होता आणि दिलेला शब्द पाळण्याची प्रवृत्ती होती. तेव्हा निवडणूक लढताना फारसा खर्च कधी लागला नाही. शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या गाड्या आणि मतदानाला बुथ उभे करणे, हाच काय तो आवश्यक तेवढा खर्च! नगर जिल्हा काय किंवा राज्य काय सर्वत्र हीच स्थिती होती. तेव्हा मतदार कुठे मत द्यावे, यावर विचार करायचा.
कार्यकर्ते तर खूप प्रामाणिक असायचे. गेल्या वीस वर्षात राजकीय बदल झपाट्याने झाले.  ज्या दिवशी आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यादिवसापासूनच हे बदल सुरू झाले. त्याच्याआधी काँग्रेस पक्ष प्रबळ होता. भाजपा उजव्या विचारसरणीचा भांडवलदारांचा पक्ष होता, तर काँग्रेस काहीसा डावीकडे झुकणारा पक्ष! पण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर सर्वच पक्षांनी भांडवलदार व्यवस्थेचे समर्थन सुरु केले.
तेथेच राजकीय पक्षांची वैचारिक बैठक संपली. हळूहळू ही स्थिती वाढत गेली. त्यानंतर नेते कार्यकर्त्यांना वापरून घ्यायला लागले आणि कार्यकर्ते नेत्याला वापरून घ्यायला लागले. या पार्श्‍वभूमीवर विचार केला तर आजच्या निवडणुकांना वेगळे वळण लागले. मनगटाची ताकद आणि आर्थिक शक्ती जेवढी जास्त तेवढा तो निवडणुकीला पात्र उमेदवार असा विचार प्रत्येक पक्षात तयार झाला.
निवडून येण्याची क्षमता काय, हे पाहतो असे आता जवळपास सर्वच राजकीय पक्ष म्हणतात. या प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाले. गेल्या काही वर्षांत निवडणुकांचे चित्र बदलत गेले. अशा स्थितीत नेते आणि कार्यकर्त्यांची नवीन पिढी राजकारणात आली. त्यांच्याबाबत मोठे संकट निर्माण झाले आहे. म्हणून मी राजकीय बळी हा शब्द वापरला.
राजाभाऊ तसा हुशार होता. संगीत, साहित्य, कला, क्रीडा अशा समाजाची जी विविध अंग आहेत, याची त्यांना जाण होती. या जाणीवेतून ते काम करायचे. त्यांच्यात संघटन कौशल्य होते. अन्यथा अपक्ष निवडणूक लढवून लोकसभेला दीड लाख मते त्यांना मिळाली नसती. हुशार माणसे मनाने हळवी असतात. संवेदनशील असतात. राजाभाऊंचा दोन वेळा लोकसभेत पराभव झाला. एकदा विधानसभेत पराभव झाला.
यातून एक प्रकारची राजकीय अस्वस्थता त्यांच्या मनात निर्माण झाली होती. खरे तर ते लोकसभेचेच उमेदवार किंवा नेते होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारुन मोठी चुक केली. त्यावेळी शिवाजीराव कर्डिले देखिल उमेदवारीला फारसे उत्सुक नव्हते. पण या जिल्ह्यातील पुढार्‍यांनी आपल्या सोयीने काही गोष्टी केल्या.
त्यावेळी दिलीप वळसे यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी होती. शरद पवार यांचा आधी ग्रामीण भागाशी थेट संपर्क असायचा. पण कार्यबाहुल्य आणि वयामुळे हा संपर्क जरा कमी झाला आहे. दक्षिण लोकसभा ही राष्ट्रवादीचीच जागा होती. राजाभाऊंना संधी मिळाली असती तर पक्षाला एक उत्तम खासदार मिळाला असता. त्यावेळी कर्डिले आणि राजळे यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी ती विजयी मतसंख्या होती.
पण केवळ चुकीचे संकेत पवार साहेबांकडे पोहचवले गेले, त्यातून हे घडले. राजाभाऊ जिद्दी होता. बहुतेक त्यांना 2009च्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. पण तिकीट नाकारणे त्यांच्या बुद्धीला काही पटले नाही. ऐनवेळी नेते असा शब्द कसा फिरवू शकतात, याबद्दल त्यांच्या मनात राग होता. म्हणून ते त्यावेळी अपक्ष लढले.
दुसर्‍यांदा 2014 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. पण त्यावेळी मोदी लाट होती, हा झाला एक भाग! दुसरा भाग असा आहे की त्यांना राष्ट्रवादीच्याच नेते, कार्यकर्त्यांनी खूप छळले. एका तालुक्यातील नेत्याने तर प्रचारासाठी त्यांच्याकडे ऐनवेळी ‘डिमांड’ केली. राजाभाऊला ‘ते’ द्यावे लागले. अनेकांनी असे केले. त्यांना आर्थिक कोंडीत पकडले गेले.
जे त्यांच्या सहनशक्तीपलिकडे गेले होते. या गोष्टींकडे नेतृत्वाने लक्ष देणे अपेक्षीत होते. पक्षातील लोकच जेव्हा असे करतात, याचा परिणाम हा होतोच. यातून राजाभाऊंचे संवेदनशील मन अस्वस्थ होते. याचा परिणाम मनावर आणि शरीरावर होतोच! त्यांनी तीन पराभव पचवले. तरीही मनाने खंबीर होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पत्नी मोनिका यांना विधानसभेत विजयी केले. पण चांगला आणि कतृर्त्ववान तरूण नेता या जिल्ह्याने गमावला, हे वास्तव आहे.

 

LEAVE A REPLY

*