राजाभाऊंचे जाणे तरुण नेत्यांसाठी धडा! : राजकारणातील धोके वाढले

0

ज्येष्ठ नेते गडाख यांचा इशारा

अहमदनगर (विशेष प्रतिनिधी) – राजीव राजळे यांचे जाणे हा तरुण नेत्यांसाठी धडा आहे. राजकारण एका धोकादायक वळणावर आहे. तरुण नेत्यांसमोर धोके वाढले आहेत.

राजकीय पक्ष ‘व्यावसायिक’ झाले आहेत. नव्या नेतृत्वाला ते सांभाळत नाही, बळ देत नाहीत, वार्‍यावर सोडतात. हे बदलायचे असेल तर आता समाजाला पुढाकार घ्यावा लागेल, असे मत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नोंदविले आहे.

‘सार्वमत’ने बुधवारी प्रकाशित केलेल्या ‘राजीव राजळे आजच्या राजकीय व्यवस्थेचे बळी’ या वृत्तानेे राजाभाऊ यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत पसरलेल्या एका अनामिक अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली.

समाजाच्या मनात दाटून आलेल्या नेमक्या भावनांना ज्येष्ठ नेते गडाख यांनी शब्द दिल्याने दिवसभर या विषयावर राजकीय मंथन सुरू होते. गडाख यांनी बदलत्या राजकारणाचा मागोवा घेताना पक्षीय राजकारणाकडेही लक्ष वेधले.

राजीव यांना राष्ट्रवादीने दिलेल्या वागणुकीवर त्यांनी अत्यंत सभ्य भाषेत बोट ठेवले. अर्थात ही अवस्था सर्वच राजकीय पक्षांत आहे, याचाही उल्लेख त्यांनी केला. ‘सार्वमत’शी झालेल्या दीर्घ चर्चेत त्यांनी तरुण नेत्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला.

गढूळ राजकारणात बदल अपेक्षित असतील तर समाजानेच पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षीय राजकारणात तरुण नेते, कार्यकर्त्यांपुढे मोठे धोके निर्माण झाले आहेत. पूर्वी राजकीय पक्ष तरुणांना सांभाळायचे. पूर्वी कार्यकर्त्यांना आपले काम पाहून पक्ष सांभाळणार याची खात्री असायची.

ती प्रक्रिया आज थांबली आहे. पक्षात आलास तर ये! पडलास तर पड! आम्हाला काय करायचे आहे? अशी अवस्था सर्वच पक्षांत आहे. तरुण नेत्यांना कोणी विचारत नाही. पूर्वी कार्यकर्ता आणि पक्षात भावनिक नाते असायचे. ते आता संपले. पक्ष व्यावसायिक झाले आहेत.

1972 ला विधानसभेत रामनाथ वाघ आणि माझा पराभव झाला. जिल्ह्याच्या नेतृत्वाने आम्ही काहीही मागितलेले नसताना वाघ यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. मला उपाध्यक्ष केले. आम्हाला वार्‍यावर सोडले नाही. नेतृत्व तेव्हा लक्ष द्यायचे आणि सांभाळायचे! आज ते राहिलेले नाही.

याचा परिणाम तरुण नेते आणि कार्यकर्त्यांवर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ते एकटे पडणार आहेत. निवडून गेले ते गेले! पण त्यांचेही राजकारण दीर्घकाळ चालणार नाही. राजकारण हे काही नोकरीसारखे प्रमोशन नाही. जे आज आहे ते उद्या नाही.

या राजकीय स्थितीत ‘जे जे लागते ते ते’ वापरायची ताकद ज्याच्याकडे आहे, त्यालाच यात टिकता येईल. सरळ माणसे राजकारणातून बाजूला फेकली जातील. राजकीय स्थितीचे हे चिघळणे वाढत आहे. जोपर्यंत जनता शहाणी होत नाही. तोपर्यंत ही स्थिती बदलेल असे दिसत नाही. पक्ष शहाणे होणार नाहीत. जनतेनेच बदलायला हवे!

पक्षांना केवळ सत्तेसाठी संख्याबळ पाहिजे. संख्याबळ जुळविण्यासाठी कोणीही आमच्यात या, आम्ही तयार आहोत, अशी त्यांची तर्‍हा झाली आहे. राजकीय पक्ष खाली पाहायला तयार नाहीत. राजीव यांची जी घटना घडली. त्यामुळे समाजमनातही हा विचार आला पाहिजे की, आपण काय करतो आहोत? यावर मंथन झाले पाहिजे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या निवडणुकांमध्ये अनेक गुंडाचा जनतेने पराभव केला. तेव्हा असे निर्णय जनतेलाच घ्यावे लागणार आहेत. चांगल्या नेतृत्वांना आता सामाजिक सुरक्षाच शिल्लक राहिलेली नाही. राजीवसारखी माणसे आजच्या राजकीय अवस्थेचे बळी ठरत असतील तर आपण काय करतो आहोत, हा विचार जनतेने आता केलाच पाहिजे. अन्यथा चांगले नेतृत्व पुढे येणार नाही.

केवळ कामावर मते मिळतात, असे आता राहिलेले नाही. शेवटच्या टप्प्यातील ‘प्रचारा’वरून जनता मत टाकते. 10 कामे केली आणि होण्यासारखे नसलेले एखादे काम केले नाही की नेत्याला फटका बसतो. अनेकजण नोकर्‍या मागायला नेत्याकडे जातात. प्रत्येकाला नेता कोठून नोकरी देणार? मधल्या काळात काही जण आमदार वगैरे झाले. ती माणसे ‘मोकळी’ होती. त्यांच्याकडे कोणतेच जनकल्याणाचे काम नव्हते.

कोणतीही संस्था नाही. त्यांना कोणाला रोजगार द्यायचा नव्हता. ‘मोकळी’ असलेली ही माणसे केवळ काम करणार्‍या नेत्याला शिव्या देत होती. अद्वातद्वा बोलले, शिव्या दिल्या की ते आवडणारी काही माणसे समाजातही आहेत. याचाही राजकीय क्षेत्रावर परिणाम होतो. त्यातून काम करणारे अनेकजण मागे पडले. केवळ शिव्याच नव्हे, तर त्याचा घसरलेला स्तर मीही अनुभवलेला आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक चित्र आहे.

माझ्या आधीच्या राजकीय पिढीतही राजकीय मतभेद होते; पण ते विचारांचे होते. सभेत एकमेकांच्या विरोधात भाषणे व्हायची. पण कधी वैयक्तिक निंदानालस्ती होत नसे. सर्वांनी घरगुती संबंध जपले. स्व. वकीलराव लंघे हे कम्युनिस्ट पक्षाचे होते. मी तेव्हा काँग्रेसमध्ये होतो. निवडणुकीत त्यांच्या गावात गेलो की सभेत त्यांच्या वैचारिक धोरणांवर टीका करायचो.

सभा संपली की ते आम्हाला घरी चहाला बोलवायचे. राजकारण वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे, हे पथ्य त्यावेळी सर्व पाळायचे. त्यांच्यात उत्तम संवाद असायचा! आत नव्या राजकीय पिढीत संवादच बंद झाला आहे. आता विरोधक म्हणजे शत्रू! द्वेष, मत्सर राजकारणात वाढला आहे. संवाद कोणी ठेवलाच नाही. प्रत्येक तालुक्यात ही अवस्था आहे. दोन पिढ्यांतील बदललेल्या स्थितीचे हे मोठे अंतर आहे.

ही राजकारणासाठी घातक अवस्था आहे. ही पिढी शिकलेली आहे. तरीही ही अवस्था आहे. स्व. बाळासाहेब विखे आणि माझ्यातील राजकीय वाद राज्यात गाजला. मध्यंतरी मला एका वर्तमानपत्रातून फोन आला. तेव्हा मी स्व. बाळासाहेबांवर लेख लिहिला. आम्ही संबंध जपले. आताचे नेते समाजाला काय संदेश देणार? नेतेच एकमेकांवर टोकाचे बोलायला लागल्यावर खाली कार्यकर्तेही एकमेकांविरुद्ध दुपटीने बोलणार! यामुळे परिस्थिती बिघडणार. हाणामारी होणार, यातून नुकसानच होणार. आता बापाच्या चपला लेकाच्या पायात आल्या आहेत. कोणी सांगून किंवा शिकवून संवाद वाढणार नाही. काही गोष्टी उपजत असाव्या लागतात. आपल्यासोबत समाजाचे काय नुकसान होत आहे, याची जाणीव राजकीय नेत्यांनीही ठेवली पाहिजे. राजकारणातील शिकलेल्या तरुण पिढीने राजाभाऊंच्या प्रकरणानंतर बोध घेतला पाहिजे. राजकारणातील गढूळतेवर मात केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

  • राजकारणात सहन करणे शिका! 
    राजकीय पक्षाने दिलेली वागणूक आणि राजकीय पराभव यामुळे मनावर आघात होतात. यासाठी आता मन निगरगट्ट करण्याची वेळ आली आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. राजकारणात सहन करण्याची क्षमता लागते. त्यातून पुढे जावे लागते. आमच्या काळात 15-20 वर्षे उमेदवारी करावी लागायची. काही अपवाद असायचे. पण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मग आमदारकी, अशा पायर्‍या असायच्या. राजकारण हे फुलांच्या पायघड्या आहेत आणि त्यावर फक्त चालत जायचे, असे आताच्या पिढीला वाटते. ज्या फुलांवर तुम्ही चालत जाणार, त्या फुलाला काटे पण असतात. ते काटे सहन करायची तयारी ठेवा, असा वडिलकीचा सल्लाही यशवंतराव गडाख यांनी राजकारणातील नव्या पिढीला दिला आहे.
  • पडलो म्हणून नाराजी, नैराश्य नको!  केवळ राजकीय घराण्यांमुळे काही होत नाही. तो राजकारणातील एक भाग झाला. राजकीय घरातील तरुणांसाठीही आता स्थिती सोपी राहिलेली नाही. लोकसंपर्क, संघटन, नवे मुद्दे हाती घेणे या गोष्टी त्यांना कराव्या लागतील. त्याशिवाय लोक त्यांनाही निवडून देणार नाहीत. राजकीय आव्हानांना सामोरे जायचे असेल तर सर्वांना सोबत घ्यावे लागेल. सामान्यांच्या प्रश्‍नांना हात घालावा लागेल. संघटित राहावे लागेल. लोकांनी निवडून दिले तर ठीक! पण नाही निवडून दिले तर नाराजी, नैराश्य या गोष्टी राजकारणात चालणार नाहीत, याकडे गडाख यांनी लक्ष वेधले.

LEAVE A REPLY

*