Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अगंबाई सासूबाई..! – 80 वर्षांच्या आजोबांनी संगमनेरच्या 68 वर्षांच्या आजीशी केला विवाह

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – ‘अगंबाई सासूबाई’ ही टीव्ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत शोभणारी ही घटना नाशिकमध्ये प्रत्यक्षात उतरली आहे. सिन्नर तालुक्यात हिवरे गावी 80 वर्षांच्या आजोबांनी संगमनेरातील 68 वर्षांच्या आजीशी विवाहगाठ बांधली.

ऐंशी पावसाळे पाहिलेले नवरदेव निवृत्ती रुपवते आणि सत्तरीकडे झुकलेल्या सुमनबाई पवार यांचा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी शेकडो वर्‍हाडींनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या या विवाहसोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पत्रिकेवरील वाक्यं वर्तमानाची जाण करुन देणारी होती.

आम्ही ज्येष्ठ नागरिक आमच्या जीवनाच्या सायंकाळी परस्परांना आधार देण्यासाठी आणि भविष्यकालीन जीवन समृद्ध करण्यासाठी परस्परांचे स्वप्न, प्रेरणा आणि इच्छा पूर्ततेसाठी उभयतांच्या संमतीने विवाहबद्ध होत आहोत. संयोजकांचा चतुर खेळ, पूर्वपुण्याईचा घातला मेळ, कार्यवाहका शक्ति देई, मंगल कार्य तडीस नेई अशा वाक्यांमुळे निमंत्रण पत्रिका वाचनीय ठरली.

हिवरे गावातील बुद्धविहारात ज्येष्ठांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला. पोस्ट मास्टर म्हणून निवृत्त झालेले निवृत्ती रुपवते यांनी संगमनेर येथील 68 वर्षांच्या सुमनबाई पवार यांच्याशी मंगल परिणय केला. दोघांनी आयुष्याच्या सायंकाळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांच्या सहमतीने हा विवाहसोहळा अगदी थाटात पार पडला.

निवृत्ती रुपवते यांना एक मुलगा आहे. मात्र दहा वर्षांपासून तो बेपत्ता आहे. तर सुमनबाई यांना दोन मुली. आयुष्याच्या उतारवयात दोघं एकटे असल्याने ओळखीच्या लोकांनी चर्चा घडवून आणली. 16 फेब्रुवारीला हा लग्नसोहळा पार पडला. हा विवाह सोहळा जुळवून आणण्यात सुमनबाई यांचे पुतणे चंद्रकांत पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या लग्न सोहळ्याला सुमनबाई यांच्या दोन्ही मुली आणि नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी निमंत्रण पत्रिका सुद्धा छापण्यात आल्या. उतारवयात वृद्धाश्रमांमध्ये एकटे जीवन व्यतीत करण्यापेक्षा असा पुनर्विवाह ही काळाची गरज बनत आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!