वारंवार नोटिफिकेशन तपासतोय ?

वारंवार नोटिफिकेशन तपासतोय ?

आपल्यातील बहुतांशी मंडळी ही सकाळी उठल्यानंतर स्मार्टफोनवर आलेल्या संदेशाचे वाचन करत असतात. त्यानंतर आपल्या दिवसाची सुरवात करतात. तंत्रज्ञानाने आपले आयुष्य खूपच सुखकर झाले आहे. मात्र दिवसभर विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या संपर्कात राहून कधी कधी वैताग येतो. सोशल मिडियावर सातत्याने येणारे नोटिफिकेशन आपली एकाग्रता भंग करतात. त्यामुळे अशा नोटिफिकेशनचे काय करावे, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्मार्ट डिव्हाइसमुळेप येणार्‍या अडचणीपासून वाचण्यासाठी काही गोष्टी येथे आपल्याला सांगता येतील.

नोटीफिकेशनची पर्वा करू नका : जर आपण वारंवार व्हॉटसअपचे नोटिफिकेशन पाहत असाल तर त्यावर लगाम घालणे गरजेचे आहे. दिवसभरात नोटिफिकेशन पाहण्याची एखादी वेळ निश्‍चित करा. आपण डेटाही बंद करू शकता. अगदीच महत्त्वाची गोष्ट असेल तर संबंधित व्यक्ती कॉल करून त्याची सूचना देऊ शकते. यासाठी आपण स्वत: नोटिफिकेशनपासून दूर राहणे कधीही योग्य ठरू शकते.

अनावश्यक अ‍ॅप काढून टाका : ज्याचा नियमित उपयोग होत नाही असे स्मार्टफोनवरील सर्व अ‍ॅप आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्म काढून टाका त्याचबरोबर सर्व न्यूजलेटर देखील अनसबस्क्राईब करा की जे सातत्याने मेल बॉक्समध्ये येत राहतात. अनरोल डॉट मी हे एक उकृष्ट संकेतस्थळ असून जे आपल्याला अनावश्यक न्यूजलेटरपासून वाचवण्यासाठी मदत करते.

सुटीच्या दिवशी मोबाईलला आराम द्या : आठवडाभरात कामातून आलेला थकवा दूर करण्यासाठी आपल्याला सुटी असते. याचा अर्थ असा नाही की दिवसभर मोबाईल फोनला चिटकून राहायचे. अशा वृत्तीमुळे मोबाईल ही एक आपल्यासाठी समस्या होऊन बसते. काही मंडळी व्हर्चुअल दुनियेत स्वत:ला इतके अडकून टाकतात की ज्याठिकाणी आपण आहोत तेथील सौंदर्य पाहण्याचेही कष्ट घेत नाहीत आणि कौतुकही करत नाहीत. आपण जेव्हा सुटीच्या काळात गावाला जात असाल तर काही काळासाठी मोबाईल बंद ठेवणे हिताचे ठरते.

पुस्तक वाचा, मोबाईल नको : आजकाल मंडळी संगणकावरच पुस्तक वाचताना दिसून येतात. चित्रपट देखील संगणकावर किंवा मोबाईलवर पाहण्यास पसंती देतात. जर आपण स्मार्टफोनच्या आहारी गेला असाल तर आपण प्रत्येक गोष्ट स्क्रिनवर पाहण्यापेक्षा वाचण्याचा पर्याय निवडावा. याशिवाय मोबाईलवर चित्रपट पाहण्याऐवजी आठवड्यातून एकदातरी आपण चित्रपटगृहात पिक्चर पाहण्याचा विचार केला पाहिजे.

बेडरुममध्ये उपकरण नको : डिजिटल उपकरणांनी आपण वैतागला असाल तर आपण बेडरुममध्ये या उपकरणांना जागा देऊ नका. दिवसभराच्या कामाच्या व्यग्रतेतून आपण घरी जेव्हा पोचतो तेव्हा बेडरुममध्ये जाताच सेलफोन बंद करा.

नवीन छंद शोधा : जर आपण टेबल टेनिस खेळत असा किंवा आपल्याला पोहता येत असेल किंवा सायंकाळी मैदानावर धावण्याची सवय असेल तर या सवयी किंवा छंद पुन्हा सुरूकरा. जर एखाद्या व्यक्तीने कोणताही छंद किंवा आवड जोपासली नसेल तर तो दिवसभर मोबाईलला चिटकलेला दिसतो. तो दिवसभर मित्रांना मोबाईलमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जीवनात नवीन रंग भरायचे असेल तर नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. तेव्हाच आपल्याला स्मार्टफोनच्या दुनियेतून मुक्त झाल्याचा आभास होईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com