भारतात भूगर्भातील पाण्याचा सर्वात जास्त वापर : डॉ. इयान स्मॉट

0
राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) – जगाच्या तुलनेत आशिया खंडात सर्वात कमी पाणीसाठे आहेत. भारत देशात भूगर्भातील पाण्याचा सर्वात जास्त वापर होतो. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर, शेतीला सूक्ष्म सिंचनाची जोड, पाणी वाटपाच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, पाणी गळतीचे प्रमाण थांबविणे, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले तरच पाण्याची शाश्‍वती राहू शकते, असे प्रतिपादन युनायटेड किंगडम येथील लॉगबोरॉग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. इयान स्मॉट यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून युनायटेड किंगडम येथील लॉगबोरॉग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. इयान स्मॉट होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता (पम) वानेसा स्मॉट, डॉ. जगन्नाथ पाटील, डॉ. डी. डी. पवार, डॉ. राजेंद्र पाटील, विजय कोते, प्राचार्य डॉ. हरी मोरे, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. एम. जी. शिंदे उपस्थित होते.
डॉ. स्मॉट म्हणाले, भारत देशात पाण्याचा सर्वात जास्त अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर पाणी व्यवस्थापन आणि वाटप व्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, पाण्याच्या दुर्भिक्षानंतरच पाण्याचे महत्व कळते. जगातील एकूण पाणी साठ्यापैकी फक्त तीन टक्के पाणी वापरायोग्य आहे. म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे. अन्न सुरक्षेनंतर पाणीसुरक्षा अतिमहत्वाची आहे.
प्रास्ताविक आणि स्वागत कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनील कदम यांनी केले. डॉ. एम. जी. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*