Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शालेय विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती नको; शिक्षण आयुक्तांचे परिपत्रक

Share

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणूचा धोका वाढत चालल्याने शिक्षण विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये करोनाबाबतची जनजागृती करण्याच्या सूचना शाळांना करतानाच विद्यार्थ्यांना शाळेत मास्क लावून येण्याची सक्ती न करण्याचे आवाहनही केले आहे.

विद्यार्थ्यांना मास्क घालून येण्याची सक्ती करण्याऐवजी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी एक पत्रक काढून शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना केल्या आहेत. करोना व्हायरसबाबत जनजागृती करा. विद्यार्थ्यांना श्वसनासंबंधीचे शिष्टाचार पाळायला सांगा. वारंवार हात धुणे, शिंकताना, खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करणे, आजारी असताना शाळेत न येणे, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि नाक व तोंडाला वारंवार हात न लावणे आदींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी.

तसेच आजारी व्यक्तींपासून एक मीटर दूर राहण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना करा. मात्र सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्क लावून येण्याची सक्ती करू नये, अशा सूचनाही सोळंकी यांनी दिल्या आहेत. करोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याला रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही सर्व शाळांना करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!