जिल्ह्यातील 330 शाळांचे होणार बाह्यमुल्यांकन

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा सिध्दी उपक्रमातून सन 2020-21 या वर्षात स्वयंमूल्यमापन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यमापन करण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यात 330 शाळांचा समावेश आहे. स्वयंमूल्यमापन केलेल्या शाळांपैकी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील शाळा निवडण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान संबंधित शाळांना भेटी देऊन त्यांचे शाळासिध्दी बाह्य मूल्यमापन करण्यात येणार असून ऑनलाईन माहिती अपलोड केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

विद्यार्थ्यांना शाळांचा दर्जा समजावा, यासाठी शाळासिध्दी उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानुसार शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात येत होते, परंतु उपक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत शाळांचे बाह्य मूल्यमापन झाले नव्हते. यावर्षी राज्यातील 11 हजार 851 शाळांचे बाह्य मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यातून 330 शाळा निवडण्यात आल्या आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळासिध्दी उपक्रमातून (2020-21) शाळांचे स्वयंमूल्यमापन झाले.

आता त्याच शाळांमधून प्राथमिक स्तरावरील 10 हजार आणि माध्यमिक स्तरावरील एक हजार 851 शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यात प्राथमिकच्या 278, तर माध्यमिकच्या 52 शाळा आहेत. या शाळांचे बाह्य मूल्यमापन करण्यासाठी शाळा व निर्धारक निश्चित करण्यात येणार आहेत. त्या निर्धारकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून 24 फेब्रुवारीला ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी प्रतिशाळा 490 रूपये निधी निर्धारकांना दिला जाणार आहे.

शाळांच्या भौतिक विकासाठी प्रयत्न शाळासिध्दी हा केंद्र शासनाचा मूल्यांकनाचा कार्यक्रम असून, याअंतर्गत शाळांना दरवर्षी स्वयंमूल्यमापन करायचे असते व त्याची नोंद न्यूपा नवी दिल्ली यांच्या शाळासिध्दी वेबपोर्टलवर केली जाते. त्यानंतर बाह्य मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आहे. शाळेचा भौतिक विकास होऊन विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढावी यासाठी शाळासिध्दी मूल्यांकनाची 46 मानके आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *