Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाराष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिककर श्रुती राठीला सुवर्ण तर वरुण वाघला...

राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिककर श्रुती राठीला सुवर्ण तर वरुण वाघला रौप्यपदक

नाशिक | प्रतिनिधी

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित अखिल भारतीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नारायणपूर (आंध्रप्रदेश) येथे 13 ते 16 जानेवारी दरम्यान झालेल्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत के टी एच एम कॉलेजचे विद्यार्थी श्रुती अरविंद राठी हिने मुलींच्या गटात सुवर्णपदक तर वरुण संजय वाघ याने मुलांच्या गटात अतिशय दिमाखदार व चातुर्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करून सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.

- Advertisement -

या स्पर्धेत भारतातील 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील तुल्यबळ खेळांडूंनी सहभाग घेतला होता. ज्यात मुलींच्या गटात 51 तर मुलांच्या गटात 84 खेळाडू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त होते. मुलींच्या गटात सर्वोच्च गुणांकन 1924 होते.

तर मुलांच्या गटात 2296 हे सर्वोच्च गुणांकन होते.  यावरून स्पर्धेच्या काठीण्य पातळीचा व भारताच्या विविध राज्यातून आलेल्या बुद्धिबळपट्टूच्या कौशल्याचा अंदाज येतो.

श्रुतीचा व वरुणचा बुद्धिबळाचा पाया मोरफी चेस अकादमीत नाशिकचे सुवर्णपदक प्राप्त राष्ट्रीय खेळाडू व नामवंत प्रशिक्षक विनोद भागवत यांच्याकडे तयार झाला असून श्रुती मागील 13 वर्षापासून तर वरुण मागील 8 वर्षापासून बुद्धिबळ खेळत आहे.

मागील वर्षी वरुणने भारतातील प्रतिष्ठेची आंतर्राष्ट्रीय मुंबई महापौर बुद्धिबळ स्पर्धा (सी गट) जिंकून खेळातील प्रावीण्य सिद्ध केले होते. तसेच खेळातील प्रविण्याबरोबरच 10 वी तही त्याने 96 % गुण मिळविले होते. श्रुती हीसुद्धा अतिशय मेहनती खेळाडू असून खेळाबरोबरच अभ्यासातही तिने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविले आहेत.

पालकांचे प्रोत्साहन ठरले उपयुक्त

श्रुती सध्या 12 च्या विज्ञान शाखेत तर वरुण 11 च्या विज्ञान शाखेत (डिलीजेंट बॅच – के टी एच एम) शिकत आहे. सामान्यत नववी नंतर विद्यार्थी अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याच्या हेतूने मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे टाळतात परंतु श्रुती व वरुणच्या पालकांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून त्या दोघांना अभ्यासाबरोबर विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

त्यामुळे श्रुती व वरुणचा आत्मविश्वास वाढून त्यांना खेळातील आपले कौशल्य सिद्ध करता आले. बुद्धिबळ खेळाचे व्यक्तिमत्व विकासात महत्व लक्षात घेता पालकांनी मुलांना बुद्धिबळसारखा उपयुक्त खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही प्रशिक्षक भागवत यांनी यावेळी केले.

या दोन्ही खेळाडुंचे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस नीलिमा पवार, के टी एच एम कॉलेजचे प्राचार्य वी बी गायकवाड, क्रीडा शिक्षक हेमंत पाटील, दिनकर आहेर, एन सी सी च्या सौ शिला मेघनाने, विज्ञान शाखेचे आहेर सर, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजचे संचालक मंडल तसेच सर्व क्रीडाप्रेमीनी कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या