पोषण आहाराचे धान्य खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला

0

राज्य शासन : जुन्या पुरवठादाराचा ठेका संपला

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्य पुरवठा करण्यार्‍या ठेकेदाराचा राज्य पातळीवरील ठेका संपलेला आहे. यामुळे ठेका संपलेल्या ठेकेदाराकडून पोषण आहाराच्या धान्याची खरेदी करण्यात येऊ नये. पोषण आहाराचे धान्य संपले असले तर शाळा पातळीवर असणार्‍या शालेय व्यवस्थापन समितीने धान्य खरेदी करावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये राज्य सरकारच्यावतीने पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा करण्यात येतो. यासाठी राज्य सरकार पातळीवरून निविदा प्रक्रिया करून धान्यांचा पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून पोषण आहाराबाबत तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी पुराव्यानिशी याबाबत तक्रार केली होती.

त्यानंतर तातडीने जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी हा विषय मुंबईला जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

त्यानंतर अशी तक्रार जळगाव जिल्ह्यातून माजी मंत्री आ. विनोद तावडे यांनी त्यावेळी केली होती. यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या पोषण आहाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, पोषण आहाराचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराचा एक वर्षाचा ठेका संपला आहे.

यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांनी जुन्या ठेकेदाराकडून पोषण आहार खरेदी करू नये, अशा स्पष्ट सुचना सरकार पातळीवरून देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांमध्ये पोषण आहारचे धान्य संपले असले त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती मार्फत स्थानिक पातळीवरून धान्यांची खरेदी करण्यात यावी. त्यांना शालेय शिक्षण विभागा मार्फत खरेदीची रक्कम अदा करण्यात येणार आहे.

  दरम्यान, श्रीगोंदा येथील शालेय पोषण आहाराबाबत तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पोषण आहाराचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोग शाळेने पोषण आहाराच्या नमुन्याला क्लीनचीट दिली आहे. याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी काटमोरे यांनी दिली. 

LEAVE A REPLY

*