शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

0
दोन दिवसात केंद्र व शाळास्तरावर होणार पुरवठा
अहमदनगर (प्रतिनिधी) – शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील पाच लाख सात हजार 202 विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत. दरम्यान बहुतांश तालुक्यामध्ये पुस्तके उतरविण्यात आली असून दोन-तीन दिवसांत केंद्र व शाळानिहाय पुस्तके पोहोच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिली.
सर्वशिक्षा अभियानातंर्गत नवीन शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात येते. यंदा पुस्तकांसाठी नऊ कोटी 62 लाख 72 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. बालभारती पुणे यांच्याकडून जिल्ह्यात 92 टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला आहे. अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यातील उर्वरित पुस्तके उद्यापर्यत जिल्ह्यात दाखल होणार आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी शासन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.
मोफत पाठ्यपुस्तके त्याचाच एक भाग असून यामुळे विद्यार्थ्याची संख्या वाढीस मदत होत आहे. यंदा सातवीच्या अभ्यासक्रमात बदल झालेला आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर पाठ्यपुस्तके मिळणार का? असा प्रश्‍न पालकांसह शाळांना पडला होता. मात्र सदर पुस्तकांची छपाई पूर्ण झाल्याबरोबर जिल्ह्यात पुस्तकांचा पुरवठा करण्याचे चोख नियोजन शिक्षण विभागाने केल्याने वेळेत पुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पहिली ते पाचवीची एकूण विद्यार्थी संख्या दोन लाख 96 हजार 893 इतकी आहे. तालुकानिहाय संख्या अशी- नगर-20321, संगमनेर-34814, नेवासा-27991, पाथर्डी-19093, पारनेर-18489, राहुरी-24569, कर्जत-16942, जामखेड-11896, कोपरगाव-21267, श्रीरामपूर-18843, अकोले-21169, श्रीगोंदा-21653, शेवगाव-19134, राहाता-20712. तर सहावी ते आठवीची एकूण विद्यार्थी संख्या एक लाख 96 हजार 147 इतकी आहे. तालुकानिहाय अशी- नगर-12852, संगमनेर-23290, नेवासा-18507, पाथर्डी-13022, पारनेर-12020, राहुरी-14531, कर्जत-10833, जामखेड- 7610, कोपरगाव-14868, श्रीरामपूर- 12637, अकोले-14337, श्रीगोंदा- 13672, शेवगाव- 13338, राहाता-14630 आदी.

सन्मानपूर्वक होणार वाटप
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोफत वाटप करण्यात येणारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना सन्मापपूर्वक देण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांपासून सर्व शासकीय यंत्रणा, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थित थाटामाटात विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहे. दरम्यान पहिलीच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षीप्रमाणे स्वागत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*