टंचाईमुळे कोलमडले अर्थकारण

0

तळेगाव भागातील स्थिती, शेतकरी हवालदिल

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण तळेगाव दिघे परिसरामध्ये सध्या सर्वत्र टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. चारा व पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहेत. तळेगाव प्रादेशिक योजना असूनही पिण्याचे पाणी नियमित मिळत नाही. टंचाईच्या साडेसातीने तळेगाव भागात होरपळ सुरू असून शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
अवर्षणप्रवण तळेगाव भागात वर्षानुवर्षे टंचाईचे सातत्य आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला असून हिरवा चारा मिळणे मुश्कील झाले. विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतात कामच नसल्याने मजुरांना रोजगार मिळणे मुश्कील झाले. त्यामुळे चरितार्थाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
जनावरांसाठी चारा खरेदी करणे अवघड झाल्याने शेतकरीवर्गापुढे पशुधन वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. चारा विकत घेऊन जनावरे जगविण्याची धडपड सुरू आहे. टंचाईमुळे रोजंदारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ आली असून टंचाई सातत्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले. टंचाई स्थिती गंभीर बनली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र टंचाईने पशुधन विक्रीचा धडाका सुरु आहे. शासनाकडून टंचाई उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
चारा टंचाईमुळे जनावरांना अर्धपोटी ठेवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. जनावरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. तळेगाव भागात चारा टंचाईमुळे मुक्या जनावरांचे कुपोषण होत आहे. तळेगाव भागात वर्षानुवर्षे टंचाईचे सातत्य कायम आहे. त्यास यंदाचे वर्षही अपवाद नाही. जनावरांच्या चारा-पाण्याबाबत प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
जनावरांची गुजराण कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहेत. दुभत्या जनावरांना पुरेसा चारा देण्याकडे लक्ष दिले जाते. मात्र बिनकामाच्या भाकड जनावरांना थोडाफार चारा दिला जातो. अशी बहुतांशी जनावरे अर्धपोटी राहत असल्याने त्यांचे कुपोषण सुरु आहे. लिंब, विलायती बाभळीचा पाला, वडाच्या झाडांची पाने खाऊ घालून जनावरे जगविण्याची शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे.
चार्‍या बरोबरच जनावरांना पाण्याची टंचाईही भासते. तळेगाव, निमोण, पिंपळे, नान्नजदुमाला, काकडवाडी, पारेगाव खुर्द, चिंचोलीगुरव, देवकौठे, पारेगाव गडाख, भागवतवाडी, वडझरी, कासारे, लोहारे, मिरपूर, मेंढवण, कौठेकमळेश्‍वर, तिगाव, करुले सहित अन्य ठिकाणीही टंचाई स्थिती दिवसेंदिवस तिव्र होत चालली आहे. टंचाईच्या समस्यांनी मुक्या जनावरांच्या हालअपेष्टा होत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. प्रशासनाने जनावरांच्या चारा व पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
उन्हाळ्यामुळे पोटभर चारा व पाणी मिळत नसल्याने उष्मघाताचेही प्रकार सुरु आहेत. जनावरांच्या चारा व पाण्याबाबत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहेत. टंचाईच्या साडेसातीने शेतकरी हतबल झाले आहेत.

LEAVE A REPLY

*