Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शुल्क वाढीला स्थगिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शुल्क वाढीला स्थगिती

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या शुल्क वाढीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी आकारले जात असलेले जुने शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली. विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयाअंतर्गत शिकवल्या जाणार्‍या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्क वाढीला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत शनिवारी एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या काही महिन्यांपूर्वी शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली. त्यात विद्यापीठ प्रशासनातर्फे सादर करण्यात आलेल्या शुल्कवाढी संदर्भातील प्रस्तावाला एक मताने मंजुरी मिळाली. विद्यापीठाच्या शुल्क नियमन समितीने गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्व अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुमारे 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती.

त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने शुल्क वाढीचे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. करोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क वाढीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली.तसेच यापूर्वी आकारले जात असलेले जुने शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली. विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयाअंतर्गत शिकवल्या जाणार्‍या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्क वाढीला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनामुळे घ्याव्या लागणार्‍या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भातील प्रारुप आराखड्यास मान्यता घेण्यात आली. मात्र,परीक्षेचे स्वरूप नंतर ठरविले जाणार आहे. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याची खबरदारी विद्यापीठ प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे. परदेशी विद्यार्थी,परराज्यातील विद्यार्थी किंवा काही कारणास्तव परीक्षा न देऊ शकलेले विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागणार असल्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता आपले अभ्यासक्रम किती तकलादू आहेत. तसेच करोना सारख्या साथीचा सामना करण्यासाठी आपली आवश्यक तयारी असणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा व विविध अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे, अशी चर्चाही या बैठकीत करण्यात आली.

दरम्यान, या बैठकीत विद्यापीठातर्फे सुमारे पन्नास सुधारित अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली.त्यात फाईन आर्ट सारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच दहा ते बारा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संशोधन करणार्‍या पीएचडीच्या विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या