बचत गट चळवळीमुळे महिला सशक्तीकरण

0

शालिनीताई विखे : महिला बचत गटांना कर्ज वितरण 

अहमदनगर (प्रतिनिधी) – महिला बचत गट चळवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी चळवळ आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या याआधीच्या कार्यकाळात बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा उपक्रम सुरू केला. त्याला मिळालेल्या प्रतिसादातून अनेक महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे.
महिलांनी नियमित कर्जफेड करून आपली पत निर्माण करावी. त्यामुळे त्यांना भविष्यातील उपक्रमांसाठी बँका आणखी कर्ज उपलब्ध करून देतील, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नगर तालुका पंचायत समिती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील देहरे येथे महिला बचत गट मेळावा व बँक लोन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षा विखे बोलत होत्या.
यावेळी खा.दिलीप गांधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, पं.स.समिती सभापती रामदास भोर, जि.प.सदस्य संदेश कार्ले, प्रताप शेळके, गट विकास अधिकारी डॉ.वसंत गारूडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दायमा, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक विनोद रणवीर, दिलीप पवार आदी उपस्थित होते. यावेळी महिला बचत गटांना कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली तसेच बँकांच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. एकूण 52 लाख 75 हजार रुपये कर्ज येथील बचत गटांना मंजुर करण्यात आले आहे.
अध्यक्षा विखे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेमार्फत महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राहाता तालुक्यात महिला बचत गट चळवळ चांगली रूजली असून जिल्ह्याच्या अन्य भागातही महिलांना आर्थिकदृष्टया सशक्त करण्यासाठी जाणीवपूर्वक काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खा. गांधी डॉ.अशोक कोल्हे, रामदास भोर आदींची भाषणे झाली. डॉ.वसंत गारूडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव गावातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

*