शनिवारी वाडियापार्कच्या मैदानावर मेगा इव्हेन्ट !

0

जनसेवा फाउंडेशनचा उपक्रम : चंदेरी दुनियेत खुलणार स्वरमयी संध्याकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून नगरमध्ये आयोजित सांस्कृतिक महोत्सव रसिकांना नवे आकर्षण ठरणार आहे. शनिवारी वाडिया पार्कच्या मैदानावर भव्य सांस्कृतिक मेगा इव्हेन्ट होणार आहे. यावेळी चंदेरी दुनियेतील कलाकारांच्या उपस्थितीत स्वरमयी संध्याकाळ साजरी करण्यात येणार आहे. वाडीया पार्कच्या या पटांगणात अजय अतुल यांच्या सांगितीक मैफलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी केलेली सजावट संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे.

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून लेक वाचवा अभियाना अंतर्गत या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी लोणी येथे अजय अतुल यांच्या उपस्थितीत अशाच पध्दतीने झालेल्या मेगा इव्हेंटचा आनंद उतर नगर जिल्ह्याने घेतला होता. आता नगर दक्षिण मधील रसिकांना या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून डॉ. सुजय विखे पाटील यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव पहायला मिळणार आहे.

जनसेवा फाउंडेशन गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवून कार्यरत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या संधी मिळाव्यात यासाठी फाउंडेशनचे प्रयत्न आहेत. पण याबरोबरच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधन अशा पध्दतीच्या सांस्कृतिक उपक्रमांतून करण्यासाठी फाउंडेशनचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता वाडीया पार्कच्या भव्यदिव्य अशा प्रांगणात या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरात प्रथमच आशा पध्दतीचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. वाडीया पार्कचा चेहरा मोहरा या महोत्सवाच्या निमित्ताने बदलण्यात आला असून वाडियापार्कमध्ये दुर्लक्षित झालेल्या सेवा-सुविधा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नानमुळे नवीन रूपात दिसू लागल्या आहेत. सुमारे पाच लक्ष रुपये खर्च करून वाडियापार्कच्या वैभवात भर घालण्यात आली असून आकर्षक रंगसंगतीमध्ये अजय अतुल यांच्याबरोबर मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, अभिजित सावंत, स्वप्नील बांदोडकर, इत्यादी लोकप्रिय मराठी कलावंतांच्या उपस्थितीत सांगितिक मैफलीचा आनंद नगरच्या रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरेल.

भव्यदिव्य अशा व्यासपीठावरून रम्य अशा संध्याकाळी… स्वरांची बरसात.. नृत्य कलेचा अविष्कार आणि सोबत कॉमेडी किंग कडून होणारा हास्यकल्लोळ या महोत्सवाची उंची वाढविणारा असेल. या महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा होणारा सन्मान हे आहे. सोळा महिलांना जनसेवा फाउंडेशनच्यावतीने गौरविण्यात येणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. या महोत्सवाच्या निमित्ताने नगर शहरासह जिल्ह्यातून येणारे मान्यवर, रसिक याची होणारी गर्दी लक्षात घेता सर्वाच्या बैठकीचे सुयोग्य नियोजन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*