शनिवारपासून नाटकांची मेजवाणी

0

नगर टाइम्स,

शाहू मोडक करंडक स्पर्धा,  20 संघांचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- कलायात्रिक आणि नाट्यजल्लोष यांच्यावतीने आयोजित नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दि.1 व 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत नगरसह नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील महाविद्यालयांतील 20 संघ अंतिम फेरीत एकांकिका सादर करणार असल्याची माहिती प्रविण कुलकर्णी व अमित खताळ यांनी दिली. महाविद्यालयीन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांच्या उर्जेला, कलागुणांना संधी मिळण्यासाठी नटश्रेष्ठ शाहू मोडक यांच्या नावाने एकांकिका स्पर्धा आठ वर्षांपूर्वी सुरु केली. दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेमुळे अनेक महाविद्यालयांमध्ये बंद पडलेली कला मंडळे पुन्हा सुरु झाली.

हक्काचे व्यासपीठ मिळाल्याची भावना तयार होवून अनेक गुणी कलाकार पुढे येवू लागले. एकांकिकेसाठीची खास अशी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच या स्पर्धेतून अनेक नवोदित कलाकार पुढे येण्यास मदत होत आहे. नगरमध्ये सध्या सुरु असलेल्या मकट्टी बट्टीफ मालिकेतही या स्पर्धेतून आपली कला सिद्ध केलेले कलाकार यात काम करत आहेत हे या स्पर्धेचे आणि नाट्यचळवळीचे यश आहे. या स्पर्धेच्या निमित्त नव्या कलाकारांसाठी लेखनापासून ते सादरीकरणापर्यंत संपूर्ण माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात येते. सन 2015 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले होते.

त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळेच वलय प्राप्त होण्यास मदत झाली. स्पर्धेत नगर शहर आणि जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या नावाने पारितोषिके दिली जातात. यातून स्पर्धकांना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रसाद बेडेकर व अमोल खोले यांनी सांगितले. यंदाच्या अंतिम फेरीतही दर्जेदार एकांकिका सादर होणार असून नगरकर नाट्यरसिक, कलाप्रेमींनी स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*