Type to search

Featured सार्वमत

सातभाई मर्चंट्सच्या मालमत्ता विकून देणार ठेवीदारांचे पैसे

Share

अवसायक त्रिभुवन यांच्या लेखी अश्‍वासनानंतर ठेवीदारांचे उपोषण मागे

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – सातभाई मर्चंट्स बँकेच्या कोपरगाव व कोळपेवाडी येथील इमारतीचा लिलाव करून येणार्‍या रकमेतून पतसंस्थांची देणी देण्यात येतील असे लेखी अश्‍वासन बाळासाहेब सातभाई मर्चंट्स बँकेचे अवसायक आर. एल. त्रिभुवन यांनी उपोषणकर्त्यांना मंगळवारी दिल्यानंतर पतसंस्था संचालकांनी सहा.निबंधक कार्यलयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले. राज्य पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना रस देऊन उपोषण सोडण्यात आले.

कोपरगाव अवसायनातील सातभाई मर्चंट्स बँकेत 35 पतसंस्थांच्या अडकलेल्या 10 कोटींच्या ठेवी मिळाव्यात यासाठी पतसंस्थांचे संचालकांचे कोपरगाव सहायक निबंधक कार्यालया समोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू होते. सन 2007 साली सातभाई मर्चंट बँक अवसायनात गेली आहे. या संस्थेत राहाता व कोपरगांव तालुक्यातील 35 पतसंस्थांच्या 10 कोटी रुपयांच्या ठेवी गेल्या 15 वर्षापासून अडकून पडल्या आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांसह पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. अवसायनाचे काम चालू असून डीआयसीजीसी अ‍ॅक्ट या सहकार कायद्यानुसार बँकेचे काम चालू आहे असे सांगून वेळोवेळी या पतसंस्थांना केवळ आश्वासन दिले गेले.

कायद्या प्रमाणे अवसायनाची मुदत 10 वर्ष असते. ती संपूनही पतसंस्थांना ठेवी परत मिळालेल्या नाही. वाढीव मुदतही 2020 साली संपत असून सदर संस्थांच्या ठेवी देने बाबत कोणतेही नियोजन झाले नाही. त्यामुळे सदर पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. या पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी व्याजासह परत मिळाव्या या मागणीसाठी सोमवारपासून सहायक निबंधक यांच्या कार्यालयासमोर राजेंद्र वाबळे, डॉ. के. वाय. गाडेकर, साहेबराव निधाने, पुखराज पिपाडा, ज्ञानेश्‍वर गायकवाड, राजेंद्र शिंदे, आदींसह राहाता व कोपरगाव तालुक्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद बेमुदत उपोषणाला बसले होते. मंगळवारी अवसायक आ.एल. त्रिभुवन यांनी उपोषकर्त्यांची भेट घेऊन मर्चंट्स बँकेच्या कोपरगाव व कोळपेवाडी येथील स्वमालकीच्या दोन्ही इमारती विकून त्यातून मिळणार्‍या रकमेतून डीआयसीजीसीची रक्कम आदा करून उर्वरीत रक्कम प्राधान्याने पतसस्थांना देण्यात येईल असे लेखी अश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. राज्य पतसंस्थोफेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते उपोषण कर्त्यांना रस देऊन उपोषण सोडण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!