Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सातारा डोंगर परिसरात मद्यपींकडून अस्वच्छता

Share

ग्रामस्थांनी केली कारवाईची मागणी

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील सुगाव व रेडे परिसरातील सर्व्हे नं नंबर 38 मध्ये असलेल्या वनक्षेत्रात काही लोक मद्यपानासाठी एकत्र जमून शांततेचा भंग करीत आहेत. तसेच तेथील परिसर अस्वच्छ करीत असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनाला आली आहे. याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

सुगाव-रेडे शिवारात सातारा डोंगर परिसरात गायरान क्षेत्र आहे. याच परिसरात अमृतसागर दूध संघाच्या मालकीची जागा आहे. या परिसरात काही लोक सायंकाळी एकत्र मद्यपान करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. या परिसरात उघड्यावर मद्यपान केले जात असून, खाण्यासाठी आणलेले पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या या उघड्यावरती फेकून देऊन परिसर मोठ्या प्रमाणात अस्वच्छ केला जात आहे. सकाळी या परिसरात अकोले शहरातील अनेक नागरिक फिरण्यासाठी येत असतात.

त्यांनाही सकाळी सकाळी या अस्वच्छतेचा त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे. या परिसरातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांना तेथे दोघे जण झोपलेले आढळून आले. तालुक्यातील एका संस्थेचे ते कर्मचारी असल्याचे उघडकीस आल्याने ग्रामसेवक सुनील सोनार व लिपिक संदीप वैद्य यांनी त्यांना तेथुन काढून दिले. त्यांना योग्य ती समज दिली. काही स्थानिक नागरिकांनी येथे मद्यपानासाठी येणार्‍या काही तरुणांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दाद दिली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. या व्यतिरिक्त ही अन्य गंभीर प्रकार या परिसरात घडत आहे.

गावच्या हद्दीत सातारा डोंगर परिसरात फॉरेस्ट क्षेत्र आहे. म्हणून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याही ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे संबंधितावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दीपक ढोमने, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जाधव, जे. डी. गोंदके यांच्याही कानावर ग्रामस्थांनी तक्रार घातली आहे. सुगाव ग्रामपंचायतची आज ‘आपला गाव, आपला विकास’ची ग्रामसभा होत आहे. त्यात या विषयावर चर्चा केली जाणार आहे. ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी अस्वच्छता पसरविणार्‍यांविरुध्द कडक कारवाई करण्यासंदर्भातील सुचना फलक लावण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक श्री. सोनार यांनी सांगितले.

पोलीस करणार कारवाई
नागरिकांनी यासंबंधी घडणार्‍या प्रकाराबाबत निवेदन केले आहे. याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून, बेकायदेशीर एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी आणि उघड्यावर मद्यपान केल्याने व परिसर अस्वच्छ केल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. जोंधळे यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!