लग्न मंडपात तीन हजार पुस्तकांचा रुखवत

0
अमर कळमकर यांच्या आदर्श लग्नाची कहाणी 
अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावीला पुस्तके खरेदी करता आली नाहीत, म्हणून शिक्षण अधुरे राहिले. ती खंत मनात बाळगून शेतकरी व कष्टकर्‍यांच्या मुलांना मोफत पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांनी स्वत:च्या लग्नमंडपात तीन लाख रुपयांच्या तीन हजार पुस्तकांनी स्टेजची सजावट केली. मंडपात कोणतेही भांडे किंवा रुखवत न लावता पुस्तकांची मांडणी करुन समाजाला नवा आदर्श निर्माण करुन दिला आहे.

महादेव कळमकर यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलांना फारसे शिक्षण देऊ शकले नाहीत. मात्र मुलांच्या पंखात इतकी जिद्द भरली की, त्यांनी चार वर्षे लोटल्यानंतर स्वत:च्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षणासाठी जो संघर्ष करावा लागला, तो इतर शेतकर्‍यांच्या मुलांना करण्याची वेळ येऊ नये. यासाठी त्यांनी स्वत:च्या लग्नात ग्रंथालय उभे करण्याचे ठरविले होते. हे धेय्य सत्यात उतरविण्यासाठी सामजिक, राजकीय, उद्योजक, व्यापारी यांच्या मदतीने तीन लाख रुपयांची पुस्तके जमा केली. त्यात आध्यात्मिक, सरळरसेवा, युपीएससी, एमपीएसी अशा विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत.

विशेष म्हणजे कळमकर हे आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून शेकडो शिबिरे व हजारो विद्यार्थी व्यसनमुक्त केले आहेत. पंढरपूर एकादशीनंतर चंद्रभागा नदी स्वच्छ करणे, नगर जिल्ह्यातील सार्वजानिक ठिकाणे स्वच्छ करणे, वृक्षारोपण, शौचालय यांसाठी जागृती करणे असे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. महिन्यापूर्वी कर्जत येथील राणी मेघनाथ तोरडमल यांनी कमळमर यांना जीवनभराची साथ देण्याचे वचन दिले. दोघांच्या संमतीने गुरुवारी (दि.15) दोघांचा विवाह पार पडला. यावेळी पोपटराव पवार, माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांच्यासह हजारो मान्यवरांच्या हस्ते हा आदर्श विवाहसोहळा साजरा झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश काकडे यांनी अथक परिश्रम घेतले.

शेतकर्‍यांची मुले शिकून अधिकारी व्हावेत, तसेच भ्रष्टाचारमुक्त भारत घडावा यासाठी हा उपक्रम आहे. ही तीन हजार पुस्तके येणार्‍या काळात तीन लाख व्हावीत यासाठी मी प्रयत्नशील राहीन. सामाजसेवक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी उपक्रमासाठी मदत करावी.
– अमर कळमकर (वर)

मी एका संस्थेत प्राध्यापक आहे. कळमकर यांच्यातील माणूस मी ओळखला आहे. आम्ही अभ्यासातून मुले घडवितो जे व्यवहारिक जीवन जगू शकतात. मात्र कळमकर हे असे शिक्षण देतात, जे सुलभ, सुंदर, सौजन्यपूर्ण, समायोजित परिपूर्ण आयुष्य जगू शकतात. अशा व्यक्तीला अर्धींगिनी म्हणून मला साथ द्यायला नक्की आवडेल.
– राणी तोरडमल (वधू)

रविशंकर महाराजांकडून कौतुक
कळमकर यांच्या विवाह सोहळ्यातील उपक्रमाचे श्री श्री रविशंकर महाराज यांनी कौतुक केले आहे. तसेच या वधुवरांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिला आहे. समाजाला हेवा व आदर्श निर्माण होईल असा उपक्रम राबविल्यामुळे रविशंकर यांनी दोघांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*