Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग!

Share

स्वप्नाला नवी पालवी : तज्ज्ञ आशावादी, आता पूर्ततेची अपेक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर आणि जिल्ह्यातील उद्योगविकासाला चालना देण्याचा मार्ग नगरच्या आयटी पार्कमधून जातो, असा ठाम विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. आजवरची या प्रकल्पाची कासवगती आणि प्रशासकीय आडकाठी या बाबी नजरेसमोर असल्या तरी आपण आशावादी आहोत, असे ते म्हणतात.

‘सार्वमत संवाद कट्टा’ या उपक्रमात ‘नगरचे आयटी पार्क : भविष्य काय?’ या विषयावरील चर्चेत या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे उद्योजक हरजितसिंग वाधवा आणि आयटी उद्योजक अजित रोकडे यांनी सहभाग नोंदविला. ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांच्याशी केलेल्या गप्पांमधून त्यांनी अडचणी आणि विलंब यामुळे गारठलेले हे स्वप्न दृष्टीपथात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 19 वर्षांपूर्वी या पार्कची इमारत उभी झाली, तेव्हा राज्यातील हा अभिनव प्रयोग होता. त्यावेळी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारनेही एक पाऊल पुढे टाकले होते.

पण प्रशासनाचे कागदकज्जे आणि भाडेदराबाबत तद्दन सरकारी दष्टिकोनामुळे नगरचा आयटी पार्क रखडला. आयटी या शब्दाबद्दल राजकीय इच्छाशक्तीचे आकलनही कमी पडले. त्यामुळे मार्गक्रमणासाठी अपेक्षित दबावही तयार झाला नाही. त्यामुळे आजची स्थिती उद्भवली. आता आ. संग्राम जगताप काही नवे करू इच्छित असतील तर त्याचे स्वागत आहे. त्यानिमित्ताने हा विषय तर नगरकरांसमोर आला. आयटी पार्क विकसित झाल्यास केवळ नगर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील तरुणाईच्या आकांक्षांचे ते केंद्र ठरेल, त्यामुळे हा प्रश्‍न आता मार्गी लागावा, असे मत या तज्ज्ञांनी नोंदविले.

नगरच्या विकासाची वाढ खुंटली आहे. त्यास आयटी पार्क सकारात्मक ऊर्जा बहाल करू शकतो. 19 वर्षापूर्वीच काही कंपन्या उत्सुक होत्या. मात्र अनपेक्षित प्रशासकीत अडवणूक झाली आणि नाहक वर्षे वाया गेली. आज हे क्षेत्र 19 वर्षे पुढे सरकलेले असते. आता पुन्हा शून्यापासून सुरुवात असेल. आयटी पार्कच्या निमित्ताने नगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक सकारात्मक चेहरा मिळू शकतो. मानसिकता बदलाचे काम आयटी कंपन्या नगरकडे आल्या तर औद्योगिक जगतात होऊ शकते. त्यासाठी आता नगरकरांनीही दबाव वाढविला पाहिजे.
-हरजितसिंग वाधवा, उद्योजक तथा उद्योगविकास कार्यकर्ते

नगर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध आहे. येथील तरूणांच्या हुशारीच्या जोरावर पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी प्रगती केली. आता या तरुणांना आपल्याच जिल्ह्यात, शहरात संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आम्ही अनेक वर्षापासून आयटी सेवाक्षेत्रात कार्यरत आहोत. नगरचे आयटी तंत्रकौशल्य आता पुढचे पाऊल टाकण्यासाठी उत्सुक आहे. रोजगार निर्मितीचे उत्तम साधन हे क्षेत्र ठरणार आहे. पुणे, नाशिक, मुंबई या शहरांची वाढ आता खुंटत आहे. या काळात आपल्या शहराची, जिल्ह्याची दावेदारी मजबूत करायची असेल आता सामूहिक प्रयत्नांतून आयटी पार्कला उर्जितावस्था देणे आवश्यक आहे. बाकी त्यातील राजकीय अंगात जनतेला स्वारस्य नाही.
-अनिल रोकडे, उद्योजक व आयटी सेवाक्षेत्र तज्ज्ञ

सार्वमत संवाद कट्टा

सार्वमत संवाद कट्टाविषय – नगरचा आयटी पार्क – भविष्य काय?- श्री. हरजितसिंग वाधवा, उद्योजक- श्री. अजित रोकडे, उद्योजकयांच्याशी सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी साधलेला संवाद

Daily Sarvmat यांनी वर पोस्ट केले सोमवार, २२ जुलै, २०१९

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!