Type to search

Featured Karmayogini

कर्मयोगिनी – रुग्णांची काळजी वाहणार्‍या डॉ. हेमांगी पोतनीस

Share

डॉ. हेमांगी एम. पोतनीस

एमबीबीएस, डीडीव्हीएमडी (ए.एम.)
स्त्री रोग तज्ज्ञ, त्वचा रोग तज्ज्ञ
योगोपचार व निसर्गोपचार तज्ज्ञ. पुरस्कार –
आंतरराष्ट्रीय चरक पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार
महिला गौरव पुरस्कार

जन्म पुण्यात, बालपण पुण्यात, शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात आणि वैद्यकीय शिक्षणही पुण्यात. एवढे सगळे पुण्यात असतानाही शेवगाव सारख्या ग्रामीण भागात लग्न होऊन आल्या. शेवगावमध्येही पतीचा व्यवसाय वैद्यकीय असल्याने दोघांनी पोतनीस हॉस्पिटलद्वारे वैद्यकीय सुविधा दिली. जिल्ह्यात पहिले सोनोग्राफी मशीन आणण्याचा मान या रुग्णालयाचा आहे. गावोगावी, खेड्यात, वाड्या वस्त्यांवर जाऊन सेवा देणार्‍या म्हणून डॉ. हेमांगी पोतनीस यांच्याशी रुग्णाचे नाते जवळकीचे निर्माण झाले. शेवगाव सोडून अनेक वर्षे उलटले तरी आजही पोतनीस डॉक्टर मॅडमची आठवण तेथील लोकांना कायम आहे.

आपण डॉक्टर आहोत म्हणजे सर्वगुणसंपन्न आहोत, असा कोणताही गैरसमज मनात न धरता सतत नवनवीन शिकण्याची ओढ डॉ. पोतनीस यांना आहे. आजही वयाच्या 70 व्या वर्षी त्या योग निसर्गोपचार शास्त्राचा अभ्यास करत आहेत. एवढे शिक्षण घेण्यामागे एकच कारण, ते म्हणजे कोणत्या ना कोणत्या उपचाराचा रुग्णांना फायदा व्हावा, हाच एकमेव हेतू. वास्तविक पन्नास वर्षांपूर्वी पुणे सोडून शेवगावसारखे खेडेगाव स्वीकारणे, हेच मोठे धाडस होते. मात्र वैद्यकीय शिक्षण ग्रामीण रुग्णांवर उपचार करण्यासाठीच मिळविले असल्याची जाणीव ठेऊन त्या शेवगावात आल्या. त्या काळी रुग्ण स्वतः होऊन दवाखान्यात येण्याचे प्रमाण फार कमी. त्यातही स्त्रिया शक्यतो दुखणे अंगावरच काढत असे. अशा काळात त्यांना तपासून पुढील उपचारांसाठी त्यांची मानसिकता तयार करण्याचे मोठे आव्हान असे. ते डॉ. हेमांगी पोतनीस यांनी केले. रस्ते धड नसलेल्या गावी त्या उपचारासाठी जायच्या. पावसामुळे अनेकदा नद्या नाले भरून वाहायचे. पावसाळ्यात उपचारासाठी एखाद्या गावी गेल्यानंतर आपला परतीचा प्रवास सुखकर होईलच, याची शाश्‍वती नसतानाही त्यांनी आपले कर्तव्य कायम बजावले.

स्त्री रोग तज्ज्ञ आणि त्वचारोग तज्ज्ञ या दोन्ही पदव्यांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले. एवढेच नव्हे, तर योगगुरू रामदेव बाबा यांना मध्यंतरी आंतरराष्ट्रीय मानाचा चरक पुरस्कार मिळाला होता. डॉ. पोतनीस यांना हा पुरस्कार 2002 मध्ये मिळाला. रेड स्वस्तिक सोसायटीमार्फत हा पुरस्कार दिला जातो. एफ एम रेडिओतर्फे होलिस्टिक हेल्थ केअर एक्सलन्स, माई गुजराथी संस्थेतर्फे महिला गौरव पुरस्कार, शेवगाव मेडिकल असोसिएशनतर्फे जीवन गौरव आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. केवळ वैद्यकीय व्यवसायातच त्यांनी गुंतवून घेतले नाही, तर सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा हातभार लागला. महिला मंडळातर्फे त्यांनी प्राथमिक शाळा चालविली. तसेच महिला व सर्वसामान्यांना गुंतवणुकीची सवय लागावी म्हणून अल्पबचतसाठी त्यांनी जनजागृती केली. या कामात त्यांचा पुढाकारही वाखाणण्याजोगा होता.

पन्नास वर्षे त्यांनी शेवगाव येथे मॅटर्निटी होम चालविले. अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले. दवाखान्यात जागा नसल्यास स्वतःच्या घरात रुग्णांना अ‍ॅडमिट करून त्यांच्यावर उपचार केले. असे असतानाही एखाद्या रुग्णाला उपचाराचा फरक पडला नाही, तर त्या स्वतःच असमाधानी असत. त्यामुळेच वैद्यकीय व्यवसाय करत असतानाही प्रामाणिक विचार केला गेला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. एखाद्या रुग्णाला आराम पडत नसेल, त्याचे समाधान होत नसेल तर स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी येथे पाठविले जाते. मात्र तेथून आल्यानंतरही संबंधित रुग्णाच्या व्याधीचे प्रश्‍न कायम असतात. तेच प्रश्‍न घेऊन रुग्ण पुन्हा दवाखान्याची पायरी चढतो. यातून मार्ग काढण्यासाठी त्या सातत्याने विचार करत असत.

अशा आलेल्या अनुभवातूनच त्यांनी निरनिराळ्या आस्तित्त्वात असलेल्या पॅथी म्हणजे पर्यायी उपचार पद्धतीचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. जी शास्त्रे निसर्गाच्या नियमानुसार किंवा निसर्गाच्या जवळ जाऊन कार्य करतात. त्यामध्ये रुग्णांना उशीरा का होईना पण व्याधीतून मुक्तता मिळते, असे त्यांच्या लक्षात आले. विविध पर्यायी उपचार पद्धतीचा अभ्यास करताना त्यांना हे जाणवले. निसर्ग या शब्दाची फोड नि अधिक सर्ग अशी आहे. ज्याला मर्यादा नाही, असा अमर्याद म्हणूनच असा निसर्गोपचार कालांतराने का होईना मान्य करावाच लागतो, यावर त्यांचे आता ठाम मत आहे.

अ‍ॅलोपॅथीमध्ये नवनवीन येणार्‍या अ‍ॅन्टिबायोटिक्समुळे मॉडर्न सायन्समध्ये क्रांती झाली. एक्स-रे, अल्ट्रोसोनोग्राफी, लेसर टेक्नोलॉजी, कॉम्प्युटराईजड केमिकल रिपोर्ट यामुळे निदान चिकित्सा सोपी झाली. हृदयरोपण, किडनीरोपण, बोनमॅरोरोपण या शस्त्रक्रियांमुळे नूतन जिवनाची संधी उपलब्ध करून दिली. मात्र एवढे सगळे असूनही व्यक्तिगत पातळीवर माणूस सुखी नाही. या पातळीवरच योग निसर्गोपचार शास्त्र उपयोगी पडणार असे डॉ. पोतनीस सांगतात. प्रकृतीला विकृतीकडे जाण्यासाठी सध्याच्या जगात खूप प्रदुषणे आहेत. त्यात एक औषध प्रदूषणही असल्याचे त्या मानतात. त्यामुळे डॉ. पोतनीस यांनी आता पूर्णतः योग निसर्गोपचार पद्धतीला वाहून घेतले आहे. 70 व्या वर्षातही त्या या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करत आहेत. त्याच्या परीक्षाही त्या देत आहेत. आरोग्यवर्धिनीतर्फे त्यांनी योग- निसर्गोपचाराची शिबिरेही घेतली आहेत.

एकीकडे नवनवीन उपचार पद्धतीचा अभ्यास करून रुग्णांना समाधान देण्याचे काम करत असतानाच दुसरीकडे महिला बचत गटांना त्यांचे काम वाढण्यासाठी, नवनवीन उत्पादने तयार करून त्याला बाजारपेठ मिळविण्याबाबत मार्गदर्शन डॉ. पोतनीस करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!