अहमदनगर(कर्मयोगिनी) | सौ. संगीता अरविंद मालकर : समाजोपयोगी चळवळींची बांधणी

0

टाकळी, ता. कोपरगाव
कार्य- स्त्रियांचे प्रश्‍न, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्य. शाळाबाह्य मुलांच्या पालकांचे समुपदेशन आणि मुलांचा शाळाप्रवेश घडवून आणणे, गट : सामाजिक

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान या संस्थेमार्फत अहमदनगर, नाशिक मधील सर्व डॉक्टर्स, शिक्षिका, परिचारीका, समाजक्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांना एकत्रित करून महिलांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. समाजकार्यातील काही घडामोडी सुप्त आणि लहान भासत असल्या तरी त्यांचे महत्त्व मोठे असते. दूरगामी परिणाम करणार्‍या अशाच अनेक चळवळी कोपरगाव तालुक्यात संगीता मालकर राबवतात. विविध समाजिक चळवळींद्वारे समाजबांधणीत योगदान देण्याचा हा प्रयत्न निश्‍चितच दखलपात्र आहे. 

ग्रामीण भागामध्ये काम करताना ताईंच्या असे लक्षात आले की, अनेक शालेय विद्यार्थ्यांची घरे अगदी शेतामध्ये, वाड्यावस्त्यांवर असतात. जाण्या येण्याची गैरसोयीमुळे दहावी नंतरचे शिक्षण त्यांचे पालक घेऊ देत नाहीत. 5 ते 6 कि.मी. पायी चालणार्‍या मुली पाहिल्या, काही मुली तर परिस्थिती अभावी त्यांचे पुढचे शिक्षण इच्छा असूनही सोडून देत असल्याचे दिसून आले. त्यांच्या महाविद्यालयाच्या तासिका जर दुपारच्या वेळेमध्ये असतील तर बसमधून उतरून पायी चालण्यासाठी पुन्हा 4 ते 5 कि.मी. चालत जावे लागते.

सुनसान रस्ते, उंच वाढलेली उसाची शेती, असुरक्षीत वातावरण याचा परिणाम ग्रामीण भागातील मुलींवर होतो. हा विचार करून मुलींच्या शिक्षणासाठी मोफत सायकल वाटप उपक्रम राबविला. गावपातळीवर लोकांना आवाहन करून त्यांच्याकडील जुन्या, टाकाऊ सायकल्स जमविल्या. त्या दुरुस्त करून गरजू, हुशार, होतकरू मुलींना दिल्या. दरवर्षी हा उपक्रम दि.3 जानेवारी रोजी राबविला जातो आणि आजीवन हा उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

राज्यशासन, केंद्र शासनाच्या विविध प्रकारच्या योजना सरकारकडून राबविल्या जाणार्‍या योजना गरजू व लाभार्थी व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने महिलांसाठी, निराधार, अनाथ, अपंग महिलांच्या मेळाव्याचे आयेाजन केले. त्यांनी पहिली कार्यशाळा 20 मे 2016 रोजी घेण्यात आली. महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 1500 महिलांचा त्यात समावेश होता. त्यांनतर दरसाल 8 मार्च आणि 10 मार्च रोजी ग्रामीण भागामध्ये मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यामध्ये महिलांना कार्यशाळा घेण्यामागील उद्देश, मोफत मार्गदर्शन, तसेच त्यांना शासकीय विविध योजनांचे फॉर्मस्, झेरॉक्स प्रतींचे वाटप करून महिलंाकडून फॉर्म भरून घेण्यात येतात.

शासनस्तरावर त्यांच्या अर्जावर योग्य कार्यवाही होण्यासाठी प्रयत्नही केले जातात. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, स्त्री आधार केंद्र पुणे आणि ताईंनी सुरू केलेला शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करून शाळेत न पाठविणार्‍या पालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यातील बहुतांशी मुले शाळेमध्ये नियमित हजर रहातात. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून, ग्रामीण भागातील महिलांकडून प्रती नग 3 रु. प्रमाणे कापडी पिशव्या शिवून घेतल्या जातात. हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून या पिशव्यांचे वाटप केले जाते.

पर्यावरणाचा समतोल राखा व पॉलीथीन पिशवी वापर टाळा असे आवाहन करण्यात आले. जिल्हा महिला प्रवर्तिका-अहमदनगर बारामती येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन कोपरगाव तालुक्यामध्ये कृषी महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली.

अशा बचत गटांना व्यवसाय मार्गदर्शन केले. ग्रामीण भागामधील महिलांना कॅशलेस व्यवहारांची माहिती व्हावी, बँकेचे व्यवहार समजावेत, यासाठी राहाता येथे आर्थिक साक्षरता तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोपरगाव या बँकेच्या शाखेमार्फत ग्रामीण भागामध्ये गरजू, निराधार, शेत मजुरी करणार्‍या महिलांची बँकांमध्ये बचत खाती उघडून राष्ट्रकार्याला हातभार लावण्याचे स्वप्न पूर्ण केले. कर्करोग, आरोग्यनिदान, रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केलेे.

ग्रामीण भागामध्ये मोतीबिंदू तपासणी शिबीरांचे आयोजन करून 150 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. समाजातील गरीब, विधवा, परित्यक्ता महिलांसाठी सक्रांत सणानिमित्त हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला. ग्रामीण भागामधील महिलांना काम करताना प्रोत्साहन मिळावे, शहरी भागामधल्या महिलांच्या कार्याचे कौतुक होते.

मला वाटतं स्त्रियांचे प्रश्‍न हे त्या स्त्रियांचे नसून ते संपूर्ण समाजाचे, देशाचे प्रश्‍न आहेत. खर्‍या अर्थानं जर देश सशक्त, समृध्द करावयाचा असेल तर ग्रामीण भागातला एवढा मोठा घटक दुर्लक्षित होता कामा नये, तो दुर्बल तर मुळीच राहू नये त्यासाठी ही सुरुवात त्यांनी खेड्यापासून केलीय. आरोग्य, अर्थ तसेच सुशिक्षीत स्त्री ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे ताई मानतात.

LEAVE A REPLY

*