शानदार सोहळ्यात ‘सार्वमत कर्मयोगिनीं’चा गौरव!

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- सायंकाळी दिवस कलायला लागला तसतशी माऊली सभागृहाच्या दारात मांदियाळी जमायला लागली. सनईच्या मंजूळ सुरावटीने त्या कातरवेळीच्या वातावरणाला उत्फुल्ल करून टाकलं. आकर्षक कमानी, प्रवेशद्वारावरील आदरातिथ्य, भव्य व्यासपीठ, त्यावर नजाकतीने केलेली सजावट.. जागोजागी लागलेले फलक कर्मयोगिनींच्या कार्याची साक्ष देत होता. मास, दिन सरला होते. आता जवळ समीप आली होती घटिका. शेवटची काही राहिलेली पळेही कटता कटत नव्हती. कर्मयोगिनींसह प्रत्येकजण ती मोजत त्या सोहळ्याची वाट पाहत होता. जस जसा क्षण जवळ येत गेला तस तशी प्रत्येकाच्या मनात उत्कंठा दाटली. कोण.. विजेती कोण, अंदाज सुरू झाले. आणि अखेर तो सुहाना पल आलाच. एकेका पुरस्काराची घोषणा झाली अन प्रत्येकाच्या तोंडून शब्द बाहेर पडले सार्थ.. कृतार्थ…उपस्थितांनी कर्मयोगिनींच्या निवडीला अशी साद दिली…तर दुसरीकडे गौरवचिन्ह हातात पडताच कर्मयोगिनींना कृतार्थ झाल्यासारखे वाटले. कारण त्यांच्या डोळ्यांतून हळूच अश्रू ओघडळे, ते जणू याचीच साक्ष देत होते. 

‘सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कार 2018’ सोहळा अशा वातावरणात बुधवारी नगरमधील माऊली सभागृहात पार पडला. भाव-भावनांची स्पंदने निर्माण करून या सोहळ्याने सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. सिनेअभिनेत्री पूनम शेंडे आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार घेताना प्रत्येक कर्मयोगिनीचा उर भरून येत होता.

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे, प्रभात उद्योग समूहाचे अध्यक्ष सारंगधर निर्मळ, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्रीताई घुले, नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे, वृंदावन येवला पैठणीचे संचालक मनोज रंधे, सार्वमत-देशदूत समूहाचे संचालक विक्रमभाऊ सारडा, संचालक सुनीताताई सारडा, चंदूकाका सराफ अँड सन्सचे संचालक आनंद कोठारी या मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याला वेगळीच रंगत आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिया ओगले यांच्या नृत्यझंकार ग्रुपने सादर केलेली गणेशवंदना रसिकांना भावली. पहिल्या पुरस्काराची घोषणा झाली ती न्याय व विधी विभागाची. त्यानंतर क्रीडा, बँकिंग, वैद्यकीय, कला-संस्कृती, साहित्य, शिक्षण, प्रशासन, सामाजिक, कृषी व अन्य अशा विभागांतील कर्मयोगिनींची नावे पुढे आली. पुरस्कार विजेत्यांच्या चेहर्‍यावर आनंद असंडून वाहत होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सार्वमत-देशदूत मीडिया ग्रुपचे संचालक जनक सारडा यांनी सोहळ्यास ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.
‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील कार्यक्रमाचा हेतू सांगताना म्हणाले की, गेल्या चार दशकांपासून ‘सार्वमत’ची नाळ नगर जिल्ह्याशी जुळली आहे.

वाचकांच्या पाठबळावर ‘सार्वमत’ येथपर्यंत पोहोचला आहे. ‘कर्मयोगिनीं’चे काम मोठे आहेच, त्याची दखल हे आम्ही कर्तव्य समजतो. कर्मयोगिनी पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कार्याचा सन्मान करत आहोत. समाजात वावरणार्‍या कर्मयोगिनींनी कठोर मेहनतीच्या बळावर आणि अनेक संकटांवर मात करून समाजासमोर आपल्या कामातून आदर्श मांडला आहे. त्याचे हे यथोचित कौतुक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध आरजे चैत्राली जावळे यांनी केले तर आभार सार्वमतचे जाहिरात व्यवस्थापक राहूल भिंगारदिवे यांनी मानले.

कर्मयोगिनी लाईव्ह – 
सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळ्याचे फेसबुकवर, ट्विटरवर लाईव्ह प्रक्षेपण केले जात होते. ते पाहण्यासाठीही अनेकांनी सोशल मिडियावर आवर्जून हजेरी लावली. कमेंट करून पसंती दिली जात होती. ते शेअरही केले जात होते. अनेकांनी हा सोहळा अनुपम असल्याची भावना व्यक्त केली. देशविदेशातील ‘सार्वमत’च्या वाचकांनी हा सोहळा फेसबुकद्वारे पाहिला.

सार्वमत कर्मयोगिनी 2018 –   राजकारण – जयश्रीताई ससाणे, ऑनलाईन लोकप्रिय – शालिनीताई विखे पाटील
सामाजिक – डॉ. सुचेता धामणे, ऑनलाईन लोकप्रिय – डॉ.वंदनाताई मुरकुटे
शिक्षण – डॉ. गीता राऊत. ऑनलाईन लोकप्रिय – मीनाताई जगधने.
प्रशासन – ज्योती कावरे, ऑनलाईन लोकप्रिय – रूबल अग्रवाल.
कला-संस्कृती – अंजली गायकवाड, ऑनलाईन लोकप्रिय – कांताबाई सातारकर
विधी व न्याय – अ‍ॅड.. करूणा शिंदे, ऑनलाईन लोकप्रिय – अ‍ॅड.ज्योती मालपाणी
क्रीडा – श्वेता गवळी, ऑनलाईन लोकप्रिय – श्रद्धा घुले
अर्थविश्व – सुशीलाताई नवले, ऑनलाईन लोकप्रिय – मेधाताई काळे
वैद्यकीय – डॉ. अंजली आगाशे, ऑनलाईन लोकप्रिय – डॉ.ज्योत्स्ना तांबे.
उद्योग – उषाताई देशमुख, ऑनलाईन लोकप्रिय – श्वेता गांधी
कृषी – राहीबाई पोपेरे / अन्य (आर्किटेक्ट)- शीतल भुतडा.

नगरचे नवे राजकारण – सर्वाधिक उत्सुकता होती ती राजकीय क्षेत्रातील कर्मयोगिनीची. परंतु हा पुरस्कार सर्वात शेवटी असल्याने उपस्थितामध्ये उत्सुकता आणि चलबिचल वाढली होती. सार्वमत-देशदूत परिवाराच्या संचालक सुनीताताईंनी या विभागातील कर्मयोगिनीचे नाव जाहीर केले. ते होते श्रीरामपूरच्या राजश्रीताई ससाणे यांचे. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. याच विभागात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी ऑनलाईन लोकप्रिय विभागात बाजी मारली. हा किताब पटकावणार्‍या श्रीमती ससाणे आणि विख या कार्यक्रमाला काही कारणामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्या दोघींचे पुरस्कार डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी स्वीकारले. गौरवचिन्ह हाती घेताना म्हणाल्या, ‘हे नगरचं नवं राजकारण आहे.’ त्यांच्या या कोटीवर उपस्थितांनी हसून दाद दिली.

 

LEAVE A REPLY

*