Type to search

Featured Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी – महिला मंडळ ते विधिमंडळ : आमदार स्नेहलताताई कोल्हे

Share

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ

माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांचे सुपुत्र बिपिनदादा कोल्हे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या कोल्हे घराण्याच्या सूनबाई झाल्या. शंकरराव कोल्हे यांचे राजकीय व सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित. समाजातील सर्व स्तरांतील मंडळींसाठी त्यांच्याकडून होणार्‍या कार्याच्या प्रेरणेने स्नेहलताताईंच्या मनावर एक छाप पडली. याच प्रेरणेतून गोरगरीब महिलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या विचारधारेतून महिलांना संघटित करीत महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून एक व्यापक चळवळ त्यांनी उभारली. या चळवळीतून हजारो महिला आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायला लागल्या. असुशिक्षित महिला बँकांचे व्यवहार करायला लागल्या. महिला अधिकाधिक संघटित होऊ लागल्या. अशा माध्यमातून कुटुंबीयांच्या सहकार्याने कर्तृत्व सिध्द करण्याची संधी मिळाली आणि आक्टोबर 2014 मध्ये आमदार या नात्याने कोपरगाव मतदार संघाचे नेतृत्व करून दातृत्व जोपासता आले. अशा पध्दतीने महिला मंडळ ते विधिमंडळ असा प्रवास सुरू झाला.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविलेल्या स्नेहलताताई कोल्हे यांचा जन्म राहाता तालुक्यातील सात्रळ येथील कॉम्रेड कडू पाटील घराण्यात झाला. कडवी विचारसणी असलेल्या कुटुंबात जन्म झाल्याने स्नेहलताताईंना संघर्षाचे बाळकडू घरातूनच मिळाले. वडील संपतराव कडू हे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे वाटील सहकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. वडिलांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील व आ. राधाकृष्ण विखे पाटील अशा तीन पिढ्यांबरोबर कार्य केले. त्यांच्या दैनंदिन कार्याचे संस्कार स्नेहलताताई यांच्यावर आपोआप होत गेले.

सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कारानिमित्त आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. संस्कृत मध्ये श्‍लोक आहे की यत्र नार्यस्तु पुजयन्ते, रमन्ते तत्र देवता, अर्थात जेथे महिलांचा सन्मान व आदर होतो, तेथे परमेश्‍वराचे वास्तव्य असते. स्त्रियांमध्ये प्रचंड शक्ती आहे, ऊर्जा आहे, क्षमता आहे…होती…आणि राहणारच. त्यात वाढच होत आहे. परमेश्‍वराने स्त्रीला सहनशीलतेचे सुंदर वरदान दिले आहे, त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे, दु:खाचे प्रसंग आले तरीही चटकन सावरणारी, खंबीरपणे उभी राहणारी आणि कुटुंबाला आधार देणारी स्त्रीच असते. स्त्री ही प्रसंगी दुर्गा होते तर कधी महाकाली. प्रसन्न असेल तेव्हा तिच्यात सरस्वती आणि लक्ष्मीही दिसते, अशा शब्दांत स्त्रीच्या महतीचे महत्त्व पटवून देत समाजाभिमुख कामातून मिळणारे समाधानातून पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते.

स्त्रीची महानता आहे. तिचे आरोग्य चांगले असेल, ती समाधानी असेल, घरात खूप नाही परंतु आनंदाने जीवन जगण्यासाठी आमदनी असेल तर ते कुटुंब सुखासमाधानाने जगते. ज्या कुटुंबात स्त्री समाधानी नाही तेथे लक्ष्मी वास करीत नाही. म्हणून सर्वात प्रथम महिला व मुलींसाठी आरोग्य शिबिरे, महिला उद्योग मेळावे, त्यांच्यासाठी प्रदर्शने, संस्कार शिबिरे आदी बाबींचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांना सावित्रीबाई फुले, समाजभूषण, उद्योगिनी पुरस्कार देऊन त्यांना प्रेरणा दिली.

याचबरोबर तरुण पिढी भारताचा भविष्यकाळ आहे, म्हणून त्यांच्यासाठीही आपल्या आदर्श संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी केवळ सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील अनेक मंडळींना शासनाने त्यांच्यासाठी देऊ केलेल्या योजना माहीत नसतात. अशा अनेक योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. प्रधानमंत्री ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत 34 मुलींना नर्सिंग अभ्यासक्रमासाठी तर हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी 70 मुलामुलींना नाशिक येथे पाठविण्यात आले होते. आज हे विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे असून अर्थार्जन करीत आहेत.

आमदार म्हणून कार्य करीत असताना घरच्या व्यक्तींकडून कसा पाठिंबा मिळतो? या प्रश्‍नावर उत्तर देताना सौ. कोल्हे म्हणाल्या, घरातून मिळणार्‍या पाठिंब्याबाबत मी खूपच भाग्यवान आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचे पावलोपावली मार्गदर्शन, आईच्या प्रेमातून सतत मार्गदर्शन व प्रेम देणार्‍या सासू सौ. सिंधुताई कोल्हे, दीर नितीनदादा कोल्हे व जाऊ सौ. कलावती कोल्हे यांचे संस्कार आणि राजकारण व समाजकारण करताना पती बिपिनदादा कोल्हे यांची भक्कम साथ, या सर्व बाबी माझ्यासाठी खूप जमेच्या आहेत. सर्वजण आपापल्या ठिकाणी पाठिंबा देत असतात.

याचबरोबर, आज युवकांंकडे सर्वजण आशेने बघत असतात. आमच्या घरातील तरुण पिढीतील अमितदादा, सुमितदादा, विवेकदादा व ईशान हे सर्वजण तरुणांचे संघटन करतात. तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन, व्हॉलिबॉल, क्रिकेट, अशा विविध खेळांच्या स्पर्धा त्यांच्या पुढाकारने घेतल्या जातात. तसेच काळाची गरज म्हणून सामुदायिक विवाहांचेही आयोजन करण्यात येते.

सर्व समावेशक प्रश्‍न म्हणून आपण कोणत्या प्रश्‍नांकडे बघता व ते सोडविण्यासाठी आपले कसे प्रयत्न आहेत? या प्रश्‍नावर बोलताना सौ. कोल्हे म्हणाल्या, शेती व पिण्यासाठी पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि रोजगार हे मुख्य प्रश्‍न आहेत. शेती व पिण्यासाठीचा लढा अखंड चालू आहे. त्यासाठी अनेकदा शासन पातळीवर आवाज उठविला आहे. जलसंधारणासाठी संजीवनी उद्योग समूह कायम पुढे असतो. चालू पंचवार्षिकमध्ये सर्वांनाच योग्य दाबाने व पुरेशी वीज मिळावी म्हणून मतदारसंघात अनेक ठिकाणी वीज उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे.

अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही प्रगतिपथावर आहेत. संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, एमबीएच्या दरवर्षी सुमारे 800 ते 900 विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. गोरगरीब, शेतकर्‍यांची मुलेमुली स्वावलंबी होत आहेत. तसेच शासकीय सेवेत जाण्यासाठीही संजीवनीच्या माध्यमातून प्रयत्न करून ग्रामीण भागातील अनेक नवतरुण-तरुणी उच्चपदावर कार्यरत आहेत.

बिपिनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले बीपीओ कॉल सेंटर मध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आरोग्यासाठी संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. शहरातील नगरपालिका, एसटी स्टॅण्ड व इतर प्रशासकीय इमारतींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. स्वच्छ व सुंदर शहर, सर्वांना सर्व सुविधा, आणि सर्वांच्याच समस्या सोडविण्यासाठी आपण भविष्यात कटिबद्ध राहू असेही आमदार सौ. कोल्हे म्हणाल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!